गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
वामन द्वादशीच्या दिवशी महाप्रसाद; संस्थान श्री देव गणपतीपुळेतर्फे उत्तम नियोजन

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमी शके १९४६ बुधवार (४ सप्टेंबर) रविवार (८ सप्टेंबर) या कालावधीत तालुक्यातील गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांचा श्री गणेशा ४ सप्टेंबरला श्रींच्या महापूजा आरती आणि मंत्रपुष्पांजलीद्वारे समस्त ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषात आणि सर्व ग्रामस्थ कर्मचारी वृंद आणि भक्तगणांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात करण्यात आला. झाला. ही महापूजा संस्थान श्री देव गणपतीपुळेचे विश्वस्त नीलेश कोल्हटकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
आज (५ सप्टेंबर) दुपारी ११ ते १२ या वेळेत श्रींना सहस्र मोदक समर्पण करण्यात आले. त्याचबरोबर दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत आरती आणि मंत्रपुष्प कार्यक्रम आयोजित केला आहे. दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० या वेळेत हभप सौ. रोहिणी माने परांजपे (पुणे) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आस्वाद भक्तगणांना घेता येणार आहे.
रविवारी (१५ सप्टेंबर) वामन जयंती म्हणजेच वामन द्वादशीच्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत महाप्रसादाच्या माध्यमातून उत्सवाची सांगता होईल. यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या सर्व विश्वस्त कमिटी सर्व कर्मचारीवृंद तसेच सर्व ब्रह्मवृंद यांच्यामार्फत त्याचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली.