खंडाळा येथील ट्रिपल मर्डर एकमेकांसोबत जोडलेल
चार संशयितांना बेड्या, एक मृतदेहाचा शोध सुरू

रत्नागिरी:– तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे संशयित दुर्वास पाटीलने आपल्या मित्रांच्या मदतीने भक्ती मयेकर,सिताराम किर आणि राकेश जंगम या तिघांचेही खून हे अत्यंत थंड डोक्याने केेलेले आहेत. या तिन्ही खूनांचा एकमेकांशी संबंध असल्याची माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ‘ट्रिपल मर्डर’ प्रकरणात पोलिसांनी दुर्वास पाटील,विश्वास पवार,निलेश भिंगार्डे आणि सूशांत नरळकर या चार संशयितांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. तर राकेश जंगमचा खून होउन एक वर्षापेक्षा जास्त कालावधीत उलटला आहे. तसेच दाट जंगल असल्यामुळे कसून शोध घेउनही राकेशचा मृतदेह मिळून आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दुर्वास पाटीलने त्याची प्रेयसी भक्ती मयेकर ही सतत लग्नासाठी तगादा लावत असल्याने तिचा 16 ऑगस्ट 2025 रोजी विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या दोघांच्या मदतीने आपल्याच सायली बारमधील वरच्या मजल्यावर वायरने गळा आवळून खून केला. नंतर तिचा मृतदेह आंबा घाटात नेउन फेकला. दरम्यान,ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेताना तिचे दुर्वासशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली आणि हा गुन्हा उघडकीस आला.
याप्रकरणात अधिक तपास करताना पोलिसांना सिताराम लक्ष्मण किर (55,रा.कळझोंडी) हा भक्तीशी फोनवर अश्लिल बोलत असल्याच्या रागातून दुर्वासने विश्वास पवारच्या मदतीने त्याला 29 एप्रिल 2024 रोजी आपल्याच बारमध्ये बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. तसेच या खूनाची माहिती आपण पोलिसांना देउ अशी वारंवार धमकी देणार्या राकेश जंगमचाही काटा काढण्यासाठी दुर्वास पाटीलने विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डेच्या मदतीने राकेशला कोल्हापूरला नेण्याच्या बहाण्याने 6 जून 2024 रोजी त्याचाही गळा आवळून खून करत त्याचा मृतदेही आंबा घाटात फेकला. अशा प्रकारे दुर्वासने आपल्या साथिदारांच्या मदतीने एकूण तीन खून केल्याची माहिती उघड झाल्याचेही पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.