रत्नागिरीचा ॲडजेस्टेबल फेटा होणार अमेरिकेतील गणपती बाप्पाच्या डोक्यावर विराजमान
सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदविली महेश बने यांच्याकडे मागणी; यंदाच्या हंगामात ५०० च्या वर फेटे ठिकठिकाणी रवाना

कोमल कुळकर्णी-कळंबटे
महाराष्ट्राच्या फेट्याची भुरळ तर सर्वांनाच पडते म्हणूनच कोणत्याही सणा-समारंभात हल्ली फेटे बांधणारे आवर्जून बोलावले जातात. सधन कुटुंबातील असून पण केवळ छंद म्हणून फेटे बांधायला जाणाऱ्या रत्नागिरीच्या सुपुत्राने आपल्या कल्पकतेने ॲडजेस्टेबल फेटे ही संकल्पना बाजारात आणली आणि आता त्यांचा ॲडजेस्टेबल फेटा अमेरिकेतील मिशिगन शहरात राहणाऱ्या मराठमोळ्या कुटुंबातील गणपतीच्या डोक्यावर विराजमान होणार आहे. महेश दत्ताराम बने असे या कलाकाराचे नाव असून ते रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या कर्ला या गावचे रहिवासी आहेत.

महेश बने यांचा सुरुवातीपासूनच फेटे बांधण्यात हातखंडा होता. त्यांच्या या कौशल्यामुळे ते पूर्वी लग्नात नवरदेवाला किंवा अन्य सदस्यांना छंद म्हणून मोफत फेटे बांधून देत. ते २५ वर्षांपासून फेटे बांधायचे काम करत आहेत; मात्र त्यांच्या अंगी असलेल्या या कौशल्याला हेरून त्यांच्या मित्रांनी त्यांना या छंदाला व्यावसायिकतेची जोड देण्याचा सल्ला दिला. गेली १५ वर्षे ते व्यावसायिक फेटेवाले म्हणून काम करत असून, त्यांनी ‘राणा फेटा’ हा स्वतः चा ब्रँड विकसित केला आहे. या ब्रँडला त्यांनी सोशल मीडियावर आणले आणि ते सातासमुद्रापार पोचले. अमेरिकेतील मिशिगन शहरात राहणाऱ्या मुंबईच्या नेहा सावंत- कुर्डे यांनी सोशल मीडियावर महेश बने यांच्या फेट्यांचे फोटो पाहिले. हे फेटे त्यांना आवडले आणि त्यांनी तात्काळ महेश यांना संपर्क साधून फेट्याची ऑर्डर दिली. त्यानंतर महेश यांनी गणपतीच्या डोक्याचे माप घेऊन त्यानुसार आकर्षक फेटा तयार केला आणि पाठवला. आता हा फेटा सौ. नेहा यांच्या अमेरिकेतील घरी येणाऱ्या गणपतीच्या डोक्यावर सजणार आहे.
सहा वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा गणपतीला बाप्पाला फेटा बांधला. फेटा बांधल्यानंतर ती मूर्ती आणखी सुंदर दिसायला लागली. हे बघून आणखी काही जणांनी असा फेटा आपल्याही बाप्पाच्या मूर्तीला बांधून द्यावा अशी विनंती केली. त्यानुसार गेल्या ६ वर्षांपासून ते रत्नागिरीतील सर्व मूर्ती शाळांमध्ये जाऊन मागणीनुसार गणपती बापाच्या मूर्तीला फेटा बांधून देत आहेत. अंतर जास्त असेल तर प्रत्यक्ष जाता येत नाही किंवा मूर्ती रंगवून व्हायला वेळ लागणार असेल तर अशा परिस्थितीत काय करायचे म्हणून ॲडजेस्टेबल फेटे ही कल्पना त्यांना सुचली आणि त्यानुसार मूर्तीच्या डोक्याचे माप घेऊन मोत्यांनी, खड्यांनी, लेसने सजवलेले आकर्षक फेटे त्यांनी तयार करायला सुरुवात केली. यंदाच्या गणपती उत्सवात महेश यांनी ५०० च्या वर फेटे तयार करून पाठवले आहेत.

महेश यांनी यापूर्वीही एका नाटकासाठी फेटे बनवून अमेरिकेला पाठवले आहेत; मात्र गणपतीसाठी जाणारा हा पहिलाच फेटा आहे. महेश यांनी रत्नागिरीतील अनेक होतकरू तरुणांना फेटा बांधायला शिकवले असून, हे सर्व आता यशस्वी अर्थाजन करत आहेत. २०१९ मध्ये उदय सामंत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीत फेटे बांधण्याची ऑर्डर श्री. बने यांना मिळाली. त्यांनी १० जणांच्या टीमच्या सहकार्याने दोन हजार लोकांना केवळ दोन तासांत फेटे बांधले आहेत.
आज आता कुशल कारागीर मिळत नसल्याचे सांगून मूकबधीर, गतिमंद मुलांना फेटे बांधण्याची कला शिकविणार आहे जेणेकरून ते कोणावरही अवलंबून न राहता स्वतः चे अर्थार्जन करू शकतील, असे श्री. बने यांनी सांगितले. घरची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच साधन होती. त्यामुळे फेटा बांधल्यावर समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर जे समाधान दिसायचे तिच बिदागी होती, असे सांगतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील अहिल्यादेवी नगर (अहमदनर), हुबळी येथे ही फेटे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या शिमग्याला आडवे ,लांजा गावातील पालखीतील देवांबरोबर पालखीलापण फेटा बांधला. त्याचा व्यास १.५ मीटर होता. यावर्षी दिल्लीवरून अचानक ५०० ॲडजेस्टेबल फेट्यांची ऑर्डर आली होती; मात्र ऑर्डर उशीरा म्हणजे अगदी ८ दिवसांपूर्वी आल्यामुळे ती पूर्ण करू शकलो नाही याची खंत आहे; मात्र पुढच्या वेळी तयारीने उतरणार असल्याचेही श्री. बने यांनी सांगितले.