वक्त्याने स्वतःची वक्तृत्व शैली विकसीत करावी – अभिजित हेगशेट्ये
मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेचे उत्फुर्त प्रतिसादात उदघाटन

रत्नागिरी– पाठांतर म्हणजे वक्तृत्व नव्हे. श्रोत्याला खिळवून ठेवत त्यांना संमोहित करतो तोच खरा मोठा वक्ता असतो. आज वक्तृत्व ही अत्यावश्यक कला बनली असून आजच्या जेन जी च्या काळात मृणाल हेगशेट्ये स्मृति आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा अभिव्यक्तीचे व्यासपीठ बनले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःची वक्तृत्व शैली जोपासावी असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. ते मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मृणाल हेगशेट्ये स्मृति राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन एस एम जोशी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. यावेळी संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ संजय गवाळे, प्राचार्य उल्हास सप्रे, परीक्षक राजेश कांबळे,डॉ सोपान जाधव, नेत्रा आपटे , अनुप्रिता कोकजे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक सचिन टेकाळे यांनी प्रास्ताविक करताना मागील 40 वर्षाच्या दीर्घ परंपरेचा आढावा घेतला. प्राचार्य संजय गवाळे यांनी वक्तृत्व ही व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारी कला आहे असे सांगितले.
जिल्हास्तरीय माध्यमिक गटाची स्पर्धा पहिल्या दिवशी पार पडली. मराठी व इंग्रजी माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या गटामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. शनिवार दिनांक 13 रोजी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण जेष्ठ निवेदक, दुरदर्शनचे माजी निर्माते जयु भाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.