अशा लाल मातीत

उदय विकास पर्व

उदय सामंत आणि रत्नागिरी हे गेल्या दोन दशकांतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राशी जोडलेले एक अतुट नाते आहे. जनसंघ आणि भाजपचा पारंपरिक मक्तेदारी असणारा ज्याला कोकणची सदाशिवपेठ असा उपरोधाने उल्लेख केला जातो असा संघाच्या हार्डकोअर कोठ्यातील विधानसभा मतदारसंघ उदय सामंत या उदयोन्मुख तरुणाने ना. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने काबीज केला आणि तो उदय पर्व होत प्रस्थापित झाला. वाढत्या वयाबरोबर येणारी परिपक्वता प्रत्येक निवडणुकीत अधिकाधिक प्रगल्भ होत गेली आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी आणि कोकणच्या विकासाच्या मुलभूत विकासाचा व्हिजनरी आराखडा कोट्यवधींच्या निधीतून आकार घेऊ लागला.

या संकल्पित आराखड्याच्या दृष्य स्वरूपाच्या संकल्पना चित्र आविष्काराचा क्षण तमाम रत्नागिरीकरांच्या सोबतीने उदय पर्व म्हणून आकारात असताना त्यांना महाराष्ट्रातील आणि देशातील कला, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची पाठीवर थाप पडत दाद मिळावी, हा विलक्षण त्रिवेणी संगम, रत्नागिरीकरांना या महनीय व्यक्तींच्या तितक्याच अनमोल शब्दांच्या विचारांचा ठेवा मिळावा ही या निमित्ताने उदय आणि त्यांच्या कार्यासाठीची एक सुवर्णमय पावतीच आहे.

विकास आमटे हे नाव आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्याशी थेट जोडले गेलेले आहे.

शापल्या शिळेत प्राण जागवीत आला!

पांगळ्या मुठीत जि­द्द जखमातून ज्वाला !

आणि धंदु वादळास कोठला किनारा !

लिहिणारे मरणासन्न कुष्ठरोग्यात मानभावीपणे जगण्याचा अंगार फुलविणारे बाबा आमटे यांचा मुलगा इतकीच विकास आमटे यांची ओळख नाही, तर बाबांचे काम पुढे नेताना या पांगळ्या हातांना त्यांनी संशोधन आणि कल्पकतेच्या माध्यमातून विविध कला, उद्योग याची जोड देत त्यांना स्वावलंबी केले, उद्योजक केले ते फार विलक्षण आहे. आनंदवनातील या आंधळ्या पांगळ्याना सोबत घेऊन त्यांनी उभारलेला ॲार्केस्ट्रा हा प्रोफेशनल ॲार्केस्ट्रापेक्षाही उच्च दर्जाचा आहे. ना. उदय सामंत यांनी त्यांना कोकण आणि महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमात जोडून घेतले. सध्या तब्येत बरी नसतानाही डॉ. आमटे रत्नागिरीत येणे हे विशेष होते.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ मालशेकर हे या देशाचे विज्ञान वैभव आहे. देश आणि जागतिक पातळीवर संशोधनात मोठं नाव असणारा शास्त्रज्ञ, त्यांच्या पदव्या आणि डॅाक्टरेट यांची मोजदाद करणे कठीण… इतके प्रचंड काम आहे. भारतातील हळदीला पेटंट मिळविण्यासाठी ज्यांनी अमेरिकेला दाद दिली नाही असा लढवय्या. भारतरत्न डॅा. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स गॅलरीचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले. उदय पर्वानिमित्ताने त्यांनी कॅलिफोर्नियापेक्षा सुंदर रत्नागिरीचे वर्णन करताना सामंत यांच्या शैक्षणिक योगदानाचे विशेष कौतुक करत विज्ञानेश्वर आणि ज्ञानातून लक्ष्मीची निर्मिती हा विवेकाचा संदेश दिला. आपण येथे येऊन अत्यंत आनंदीत झालो हे त्यांचे सांगणे हे सामंत यांच्या आजवरच्या विकास कामाला एका वैज्ञानिकाने दिलेली फार मोठी पोच होती.

या त्रिवेणी संगमातील एक लखलखता हिरा होते, ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि तितकेच साधेपणाने राहणारे मात्र सडेतोड आणि फटकळ स्वभावाचे नाना पाटेकर. नाना पाटेकर कधी कोणाची विकेट घेतील हे सांगता येणार नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा संवाद फारच गाजला होता. नानांचे आजोळ कोकणातले. आत्मियता आणि जिव्हाळा याची नाळ जोडलेली. तोच जिव्हाळा त्यांना उदय सामंत यांच्याबाबत असल्याचे त्यांच्या शब्दातून प्रकट होत होता. कोकणातील पूर परिस्थिती आणि नाम फाऊंडेशनसोबत चिपळूण ते अन्य भागात केलेले काम त्यासाठी उदय सामंत यांची शासन म्हणून सकारात्मक भूमिका याचे पडसाद त्यांच्या संवादात उमटत होते. आपल्या कार्याचा अहवाल देणे ही फार महत्त्वाची बाब नोंदविताना एकही खोटी बाब आढळली, तरी मी जाहीरपणे बोलेन हे त्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकले. सावरकर नाट्यगृहातील सद्यपरिस्थितीवर नाना इतके खूष होते की आत्ता ”पुरुष” नाटकाचा प्रयोग सुरू करावा अशी त्यांना इच्छा झाली. उदय येथील मुलांसाठी शासकिय मेडिकल, इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करतो हे फार मोठे काम आहे, हे त्यांनी सांगितले. या कार्यकमात उदय पर्व ह्या ना. उदय सामंत यांच्या कार्याचा अहवाल तपशीलाने आणि अत्यंत आकर्षक फोटोसह देण्यात आला. यातील मंजूर, पूर्ण आणि सुरू असणाऱ्या कामांची संख्या इतकी प्रचंड आणि तितकीच आश्चर्य चकीत करणारी आहे. गेल्या दोन वर्षांत विशेषतः कोविड काळात ना. उदय सामंत यांचा कोकणातील आणि मतदारसंघातील कार्यशैलीचा वेग प्रचंड गतिमान झाला. शिक्षण मंत्री असताना त्यांनी रत्नागिरीला शैक्षणिक हब बनविण्याचा संकल्प केला आणि गेल्या तीन वर्षांत त्याचा पाठपुरावा करत आज एका विशिष्ठ टप्प्यावर या जिल्ह्याचे नाव आणून ठेवले. शासकिय मेडिकल कॅालेज हा त्याच्यातील अत्यंत अवघड आणि अशक्यप्राय टप्पा होता; मात्र मिळालेल्या राजकीय संधीचा लाभ जिल्ह्याला करून देण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुवर्णाक्षरांनी लिहावा इतका महत्त्वाचा आहे. सोबत शामराव पेजे यांच्या नावाने शासकिय इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि अनेक प्रकल्प आणताना त्यांनी समाज आणि जात यांचे इंजिनिअरिंगही परफेक्ट जोडले आहे.

मागील दोन वर्ष ना. उदय सामंत यांची पत्रकार परिषद म्हणजे करोडोंच्या घोषणांची मांदियाळीच असे. शिंदे सरकारात त्यांना मिळालेली मोठी स्पेस पाहता पश्चिम महाराष्ट्राच्या मंत्र्याप्रमाणे त्यांनी आपली कारकिर्द राबवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, एसपी ऑफिस, एसटी डेपो आणि अनेक ठिकाणी सुरू असणारी कोट्यवधींची प्रचंड कामे त्याचे साक्षीदार आहेत.

या कार्याची पोच देण्यासाठी डॉ. विकास आमटे, डॉ. रघुनाथ माशेलकर आणि नाना पाटेकर अशा दिग्गज लोकांनी आपलेपणाने प्रेमापोटी यावे आणि कौतुकाची थाप द्यावी हे सामंत यांच्या आजवरच्या मंत्रीपदाच्या सन्मानापेक्षाही कित्येकपटीने मोठे आहे. त्याचे मोल होऊच शकत नाही, ही त्यांची खरी कमाई आहे जी त्यांच्या भविष्यातील नव्या स्वप्नांची शिदोरी ठरेल. या निमित्ताने नाना पाटेकर यांनी आपल्या मुस्लिम कुटुंबासोबतच्या बालपणीचा किस्सा सांगताना, जातीचा सलोखा तुम्ही नाही टिकविणार, तर कोण टिकवणार? इथली माणसं पहिली माणसं आहेत असा सर्वधर्म सलोख्याचा विचार असणाऱ्या रत्नागिरीचा आणि सांमत यांचा गौरव केला. दुर्देवाने याचवेळी या शहरात तथाकथित हिंदूयोध्दा काही भलतेच जहर पेरत होता. या निमित्ताने ना. उदय सामंत यांची नैतिक जबाबदारी या उदय विकास पर्वात अधिक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button