कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला.

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देऊन त्यांच्या कोकण रेल्वेच्या अभूतपूर्व योगदानाचे महत्व कायमस्वरूपी अधोरेखित केले याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार 🙏
जागतिक पातळीवरील विचारवंत अभ्यासक संसदपटू अशी देशाच्या राजकिय इतिहासात प्रा. मधु दंडवते यांची कोकणातील लोकप्रतिनिधी म्हणून नोंद आहे. बॅ. नाथ पै यांच्या नंतर प्रा. मधु दंडवते यांनी तो वारसा तितक्याच प्रगल्भ वैचारिक क्षमतेने पुढे नेला. आपल्या पाच टर्मच्या कारकिर्दीत मतदारसंघातील छोट्या मोठ्या कामांची नोंद घेतांनाच त्यांनी कोकणसाठी एक अदभूत अशक्यप्राय आणि कल्पनातीत संकल्पना राबविली ती कोकणरेल्वेची . ब्रिटिश सरकारने कोकणचा दऱ्या डोंगर प्रदेशाचा विचार करुन हा प्रकल्प होणारच नाही असा निष्कर्ष काढला होता. तो प्रा. मधु दंडवते यांच्या कल्पकता आणि इच्छाशक्तीतून निर्माण झाला. देशाच्या पश्चिम किनारपट्टीला आणि सोबत कोकण देशाला जोडणारा हा प्रकल्प ना. मधु दंडवते, जॅार्ज फर्नांडीस आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष हेगडे आणि त्यांच्या सोबत प्रामाणिक आणि सर्वस्व झोकून काम करणारे ई.श्रीधरन यामुळे तो वेळेत पुर्ण झाला आणि आज देशाची काश्मीर ते कन्याकुमारी जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे.
प्रा, मधु दंडवते यांच्या नावाने स्वतंत्र ट्रेन सुरु करावी अशी मागणी होती. परंतू तिची दखल घेतली नाही. मध्यंतरी आम्ही दंडवतेंचे चाहते कार्यकर्ते या नात्याने अनेकवार मागणी केली होती. रत्नागिरी चे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रा. दंडवते यांचे तैलचित्र अत्यंत महत्त्वाचे मध्यस्थानी लावून या कोकणरल्वेच्या शिल्पकारांना बहूमान दिला होता. आज सावंतवाडी स्टेशनला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देऊन त्यांच्या नावाचा , कोकण रेल्वेच्या शिल्पकाराचा सन्मान हा संपुर्ण कोकणवासीयांचा सन्मान आहे.
प्रा. मधु दंडवते यांचे सर्वाधिक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. मातृमंदिर संस्था आणि संस्थापिका इंदिराबाई मावशी हळबे यांचे सोबत. अर्थमंत्री असतांना ते शासकीय वसतीगृहात न रहाता. मातृमंदिरच्या छोट्याशा खोलीत रहात. सकाळी आंघोळ त्यानंतर स्वतःचे कपडे स्वत:च धुवत आणि मावशींच्या हातचे कांदेपोहे नाष्टा करुन पुढील दौऱ्यावर निघत. आज ही जीवनातील निरपेक्षता, साधेपणा आणि निस्सीम प्रेमभावना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आश्चर्य वाटावी इतकी दुर्मिळ झाली आहे. नानांचा राजकीय, सामाजिक आदर्श पुढील पिढीला सदैव प्रेरणादायी आहे


