शिक्षण पद्धतीत नाट्यशास्त्राचा अंतर्भाव आवश्यक : ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव
संस्कृत सप्ताहाची उत्साहात सांगता

रत्नागिरी : नाटक अर्थात नाट्य हे सर्वदूर पसरलेले आहे. शाळेपासून अगदी व्यावहारिक जीवन इथपर्यंत सर्वत्र नाट्य आहे. शिक्षण क्षेत्रात देखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव यांनी केले.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात संस्कृत सप्ताहाच्या समापन कार्यक्रमाचे आयोजन १ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
आपल्या मनोगतात ज्येष्ठ पत्रकार चक्रदेव म्हणाले की, शालेय पाठ्यक्रमात एखादा विषय अल्पावधीत मुलांना शिकवण्यासाठी काही ठिकाणी नाट्याचा वापर होतो आहे मात्र याला सार्वत्रिकपणा येणं आवश्यक आहे. कुटुंबापासून समाजापर्यंत नाटक सर्वत्र आहे. आपल्या परंपरेतील नाट्यशास्त्र आणि त्याचे रचयिते भरतमुनी यांनी नाटकाचे हेतू सांगताना लोककल्याण साधणारे नाटक हवे असे आवर्जून सांगितले आहे. त्याचा विचार होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात कामिनी महाडिक, सोनिया पाटील, अनघा नागवेकर तसेच श्रावणी नागवेकर आणि रुची पाष्टे यांनी नृत्य सादर केले. या नृत्याचे दिग्दर्शन शिवानी केळकर यांनी केले होते. स्वरूप काणे यांनी गणेश स्तोत्र गायले. तसेच उपकेंद्रातील शोध छात्र कौशल जोशी यांनी एकपात्री नाटक सादर करते. तसेच डॉ. शशांक पाटील दिग्दर्शित, कौशल जोशी आणि प्रा. अविनाश चव्हाण लिखित संस्कृत नाट्यशास्त्राची महती सांगणारा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या कार्यक्रमात नाट्यशास्त्र प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक डॉ. शशांक पाटील यांनी नाट्यशास्त्र आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. संस्कृत सप्ताहाचे औचित्य साधून ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी संस्कृत भाषेची कालपरत्वे वाढत जाणारी उपयोगिता यावर प्रकाश टाकत उपकेंद्राच्या साहाय्याने संस्कृत अध्ययन करण्याची एक सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना उपलब्ध आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कश्मिरा दळी यांनी केले.



