कचराः रत्नागिरी आणि स्वच्छ भारत
हाती धरुन झाडू , तू मार्ग झाडलासी स्पर्षे तुझ्या महात्म्या , ये थोरवी श्रमासी तण उच्चनीचतेचे , निपटून काढिले तू तट धर्मकल्पनांचे , उलथून पाडले तू

हाती धरुन झाडू , तू मार्ग झाडलासी
स्पर्षे तुझ्या महात्म्या , ये थोरवी श्रमासी
तण उच्चनीचतेचे , निपटून काढिले तू
तट धर्मकल्पनांचे , उलथून पाडले तू
ग. दि. माडगूळकर यांनी लिहीलेल्या या काव्यपक्तींची आठवण व्हावी आणि सभोवताली पसरलेल्या तण, तणाव, कचरा आणि दुर्गंधी यांनी मन विषण्ण होऊन जावे अशी परिस्थिती रत्नागिरी शहरातील नागरीक आज जगत आहेत. या उद्वीग्नतेतूनच आपल्याच सरकारच्या विरोधात अत्यंत ताशेरे ओढणारे पत्रक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते थेट नगरपरिषदेवर धडक मारतात त्यावेळी आश्चर्याने डोळे विस्फारतात. सत्तेत असणार्यांनीच सत्तेच्या कारभारा विरोधात अन्याया विरोधात दाद मागावी असा फार मोठा विनोदी प्रसंग आजकाल रत्नागिरी शहरात वारंवार घडत असतो. आणि प्रश्न बाजूला रहातो मात्र जनमानसाची छान करमणूक होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतीप्रधान व्हीपी सींग यांची स्वच्छ भारत अभियान या २०१२ पासून आणि त्या आधीपासून राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहीमेला ” निर्मल भारत अभियान” असा अत्यंत नवा आयाम देत २०१४ साली याचे जबरदस्त लाँचीग आणि ब्रँडींग केले. सारा देशच चकचकीत अत्यंत स्वच्छ, निर्मळ, नितळ आणि सुंदर करण्याचे अभियान हे फार जोरदारपणे राबविले जाणार याची कल्पना त्याच्या पहिल्या ब्रँडीग टप्यातच आली होती. या पहिल्या स्वच्छ भारत चे ब्रँड ॲम्बेसेडर होते. सार्या देशाचा सर्वाधिक प्रिय लिटल मास्टर सचिन तेंडूलकर सोबत प्रियंका चोपडा, अनिल अंबानी, बाबा रामदेव, सलमान खान, शशि थरुर, मृदला सिन्हा, कमल हसन, महेंद्रसींग धोनी आणि तारका मेहता यांची ”उल्टा चश्मा ”या प्रसिध्द मालिकेची सारी स्टारमंडळी. या स्वच्छतेचे प्रतिक महात्मा गांधी यांचा गोल काडीचा चश्मा ही उल्टा चश्मा टीम सोबत स्वच्छ भारत अभियान घेऊन आली. त्या काळात तर टीव्ही वरील प्रत्येक बातमीत देशातील बहुतांश सेलीब्रिटीज, राजकीय नेते हातात झाडू घेऊन सारा देश स्वच्छ करत आहेत हे चित्र दिसत होते. प्रत्येक व्यक्तीने १०० तास श्रमदान करावे असे थेट आवाहन होते. फार आशादायी , उत्साहवर्धक आणि प्रेरणादाई चित्र होते. रत्नागिरी जिल्ह्यात आणि शहरातही याचा मोठा इम्पॅक्ट होता. २ ॲाक्टोबर हा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी तर झाडू आणि स्वच्छता ह्या प्रतिमा “स्टेटअस “ सिम्बॅाल झाले होते.
आज ११ वर्षाचा कालावधी उलटून गेला मात्र स्वच्छता अभियानातील मुलभूत प्रश्नच रत्नागिरी शहरात सुटलेला नाही. रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन हे गेल्या काही वर्षात म्हणजे प्रशासनाच्या हाती कारभार आल्यापासून अधिक कार्यक्षम झाले आहे. नगरसेवकांचा हस्तक्षेप नसल्याने मुख्याधिकारी हा एकमेव बॅास आहे. रत्नागिरी शहरातील कचरा स्वच्छता , घंटा गाडीच्या प्रत्येक वार्डवार फेरी याचे नियोजन खूपच छान असते. शहरात कचरा साठलेले ढीग कोठेच निसणार नाहीत. मात्र जमणार्या हजारो टन कचर्याची विल्हेवाट कशी लावावी हा एक नसुटणारा प्रश्न आहे. रत्नागिरीचा कचरा प्रश्न म्हणजे या समुद्र किनारी असणार्या अत्यंत विहंगमय , सुंदर शहराला असणारा जणू शाप आहे. अश्वत्थाम्याच्या भळभळणार्या जखमेसारखा!
शहराच्या प्रवेश द्वारापाशी पाण्याच्या टाक्यांच्या जवळ असणारी मोकळी जागा ही सध्या शहराच्या हजारो टन कचर्याचे डंपींग ग्राऊंड झाले आहे. येथे संपुर्ण शहरातील कचरा टाकला जातो. कचरा गोळा करतांना तो सुका, ओला अशा अगदी वेगवेगळ्या कॅटेगरीत गोळा होतो. मात्र अखेर तो या डंपींग ग्राऊंडवर येतो आणि तेथे तो जाळला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा जाळल्याने त्याचा प्रचंड धुर त्यातही अनेक विषारी अंश असणार्या या धुराने या परिसरातील लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. यामुळे अनेकांना खोकला , ब्रॅान्कायटीस आदी अजार झाल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्या आहेत.
या कचर्याच्या समस्येला जोडूनच अस्वच्छता त्यातून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव त्यातुन होणारे विविध आजार या समस्या येत्या काही काळात आणि विशेषतः पावसाळ्यात अधिक उग्र रुप धारण करतील. सोबत शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तर अधिक गंभीर झाला आहे. एका बाजूला सतत सुरु असणारी रस्ता सुधारणा, काँक्रीटीकरणाची कामे त्यातून कसरत करत जाणारी वाहने आणि मध्ये असणारे भटके कुत्रे , मोकाट जनावरे हे प्रश्न रत्नागिरीकरांसाठी मोठी समस्या होत आहेत.
२०२५ च्या अंदाज पत्रकात १२९९२ कोटीची तरतूद स्वच्छ भारत अभियान यासाठी आहे. यांतील ५००० कोटींची तरतूद ही शहरी भागांसाठी आहे. तसे रत्नागिरी शहरातील कोणत्याच रचनात्मक आणि सुधारणात्मक कामासाठी निधींची कमतरता नाही. कोट्यावधीचा निधी हे या शहराचे आणि तालूक्याच्या विकासपर्वाचे वैशिष्ठ्य आहे. या परिस्थितीत कचरा निर्मुलन हा प्रश्न इतका का जटील व्हावा हा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडावा? हे सर्वसामान्य रत्नागिरी करांसाठी एक आश्चर्य आहे.
देशात सर्वशक्तीमान पंतप्रधान हे भाजपचे, केंद्रातील सरकार हे भाजपचे, महाराष्ट्रात मुख्यंमत्री देवेंद्र फडणविस आणि सरकार भाजपचे असे केंद्र ते राज्य भाजप आणि भाजपच असतांना रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्यांना कचरा प्रश्नावर आांदेलनात्मक कृती का करावी लागते? ते थेट मुख्यमंत्र्याना सांगून हा प्रश्न का मार्गी लावू शकत नाहीत. तसे नसेल तर सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे आऊटपुट काय? जे विरोधकांनी करणे आवश्यक आहे ते आधीच आपण करत त्याचे क्रेडीट घ्यायचे ! हे कशासाठी!। जनतेने सत्ता कामे करण्यासाठी दिली आहे. तक्रारी करत बसण्यासाठी नाही. त्यांनी हा प्रश्न येत्या पावसाळ्यापुर्वी धसास लावणे महत्वाचे आहे. या शहरातील कचरा प्रश्नावर जनतेने रस्त्यावर उतरावे लागू नये असा मेसेज मुख्यमंत्र्याना देणे हे खरे काम भाजप कार्यकर्त्यांचे असणे महत्वाचे आहे.
अभिजित हेगशेट्ये


