अशा लाल मातीत

बहूजन चळवळीचा आधार हरपला!

नंदकुमार मोहिते

नंदकुमार मोहीते हे नाव कोकणातील बहुजन चळवळीशी आणि विशेषतः कुणबी समाजाच्या बेदखल कुळांचे प्रश्न आणि आंदोलन यासोबत घट्ट जोडले गेलेले!  नंदकुमार मोहीते यांचे दुःखद निधन झाल्याच्या वृत्ताने प्रचंड धक्का बसला. कोकणच्या गेल्या चार दशकाच्या  बहूजन चळवळीचा आधारस्तंभच कोसळून पडला!

नंदकुमार मोहीते म्हणजे सामान्यातील सामान्य असणारे असामान्य व्यक्तीमत्व. आयुष्य समाजकार्यासाठीच भिरकवून द्यावयाचे या त्यागमय भूमिकेतूनच त्यांनी कोकणातील बहूजन चळवळ अधिक संघटीत व्हावी यासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अत्यंत बिकट आर्थिक पस्थितीत कुटुंबाचा विचार न करता, सतत रानोमाळ फिरत रहात कुणबी समाजाला जोडत रहाणारा आणि त्याला संघटीत करत या सामाजातील तरुणांचा , महिलांचा आणि भावी पिढीच्या भविष्याचा विचार करणारा एक समर्पीत तेजस्वी कार्यकर्ता. २००८ साली नंदूमोहीते यांच्या सहकार्याने रत्नागिरीत शिर्के हायस्कूलच्या मैदानावर भव्य बहुजन  परिषद आम्ही घेतली होती. त्यावेळी डॅा. भालचंद्र मुणगेकर, खासदार शरद यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या भव्य अशा परिषदेच्या आयोजनाचे श्रेय होते नंदकुमार मोहीते यांचे.

कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा ८५ टक्के बहुजन समाज असणारा आणि त्यातही ६५ ते ७० टक्के कुणबी समाज असणारा. मात्र येथील कुणबी समाजाला विकासाची संधीच मिळाली नाही , प्रतिनिधीत्वच मिळत नाही, शिक्षण , रोजगारापासून तो वंचीत रहातो. या साठी या समाजाने संघटीत झाले पाहिजे. त्यांच्या वर्षानुवर्ष कसणार्या कुळांच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या झाल्या पाहीजेत यासाठीचा पहिला लढा डॅा.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने १६ मे १९३८ रोजी चिपळूण खेर्डी येथे  कुळहक्क परिषदेने सुरु झाला होता. त्यानंतर कुणबी समाजाच्या प्रश्नांना अग्रक्रमावर घेत शामराव पेजे यांनी संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रान पेटविले. याची दखल त्याकाळातील काँग्रेस नेतृत्वाने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि शामराव पेजे खासदार म्हणून निवडून गेले तर रत्नागिरी जिल्हयातील बहूतांश विधानसभा मतदारसंघातून कुणबी नेतृत्व उदयाला आले. तु बा कदम, जी डी सकपाळ, शिवाजीराव जड्यार,मामी भूवड, मंत्रीमहोदय ल र हातणकर, आदी सर्व नेतृत्व राज्याच्या अणि देशाच्या सभागृहात कुणबी समाजाचा आवाज घेऊन पोहोचले. त्या नंतरचा काळ हा  ॲड.  सुजीत झीमण आणि त्यांच्या सहकार्यांचा याच काळात रत्नागिरी जिल्ह्यात नंदुकुमार मोहीते,  सुरेश भायजे, विलास होडे , चंद्रकांत परवडी, ॲड. डीके आदी  तरुण नेतृत्व कार्यक्षम झाली. यांतील नंदकुमार मोहिते यांनी त्यांच्या सहकार्यांच्या सोबतींने रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाची आणि बहूजन समाजाची संघटना बांधली. यातं गावागावातील अनेक तरुण कार्यकर्त्यांना जोडून घेतले. त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक संघर्षाची  लढाई होती ती बेदखल कुळांच्या प्रश्नावरील आंदोलन, मोर्चे, धरणे , मुंबई गोवा महामार्ग रोखणे अशी अनेक आंदोलने त्यांनी उभारली , मोठे मोर्चे काढले थेट मंत्रालयापर्यंत लढा पुकारला आणि या लढ्यात शेकडो बेदखल कुळांना न्याय मिळवून दिला.

मोहिते यांच्या जनआंदोलन संघटना, प्रामणिक कार्यकर्त्याची निष्ठा याचा फायदा विविध राजकीय पक्षांतील प्रमुखांनी उठविला , निवडणूक आणि मतदान यासाठी त्यांना वापरुन घेतले. मात्र राजकीय हकदारी आणि राजकीय निर्णयतेतील सहभागात सतत दुर्लक्षीत राहीले, ही सल त्यांना कायमच होती.  बहूजन चळवळीचा एल्गार पुकारला गेला मात्र राज्यसत्ता वतनदारांकडेच वर्षानुवर्षे चालत राहिली.

नंदकुमार मोहीते यांना शाहू फुले आंबेडकर  वैचारिक चळवळीत मोठे योगदान दिले होते. त्या माध्यमातून बहूजन परिषद आणि विविध आंदोलने मोर्चे यात त्यांचा मोठा सहभाग आणि योगदान होते. लोकनेते शामराव पेजे यांच्या नावे शिक्षण संस्था आणि उच्च महाविद्यालय सुरु करुन त्यांनी शेकडो बहूजन ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालन खूले केले. बहूजन आणि कुणबी समाजाचा वैचारिक आणि सामाजिक आधार असणारा मुख्य शिलेदारच हरपल्याची भावना सर्वसामन्यांच्या मनात आहे. बहूजन चळवळीचे त्यांचे अधुरे काम पुढे नेणे हीच नंदकुमार मोहिते यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

अभिजित हेगशेट्ये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button