पतितपावन मंदिर हडप करण्याचा घाट

रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तूंग व्यक्तीमत्व, मुंबई इलाख्यांतील ऐतिहासीक वारसा स्थळांचे शिल्पकार, भक्तिभूषण , दानशूर भागोजी शेठ कीर यांनी वि दा सावरकर यांना सामाजिक कार्यात प्रतिष्ठा देण्यासाठी त्यांच्या विनंतीवरुन बहूजन आणि दलित समाजाला इश्वराच्या चरणी मान्यता मिळावी. नतमस्तक होण्याचा आणि श्रध्देने पुजा अर्चा करावयाचा , भक्तीरसात तल्लीन होत भजन करण्याचा आणि जातीभेद, उचनिचता विसरुन सहभोजन करण्यासाठी पतितपावन मंदिराची उभारणी पुर्णतः स्वखर्चाने केली. आज हे मंदिर येथील ट्रस्टी जणू स्वतःच्या बापजाद्यांची मालमत्ता असल्या प्रमाणे मनमानी करत येथे येणार्या भक्तजनांना त्यांच्या भक्तीमय भजनाच्या मुलभूत हक्कालाच नाकारत त्यांना देवळातील प्रवेश नाकारतात हे विलक्षण संतापजनक आणि रत्नागिरीच्या संस्कृतीचा आणि भागोजीशेठ यांच्या दिर्घ परंपरेचा अवमान करणारे आहे. या ट्रस्टींचा यामागील मंदिर मालमत्ता हडप करण्याचा तर नाही ना! असा संशय व्यक्त होत असून याबाबत पोलीस स्थानकात याची तक्रार झाली आहे. या सर्वसामान्य भक्तगणांना न्याय मिळणार का? हा प्रश्न आज गेल्या शतकाच्या अनमोल आणि ऐतिहासीक परंपरेची साक्ष देणारा आहे.
भागोजीशेठ कीर हे रत्ननगरीचे आभूषण आहे. या शहरात आणि तालूक्यात मागील शतकात असा अभूतपूर्व उंचीचा माणूस होऊन गेला यावर विश्वास बसणार नाही. आणे – दोन आण्यासाठी महाग असणारे कौटुंबीक दारीद्र्य या गरीबी आणि दारीद्र्यावर मात करत उत्तूंग आत्मविश्वास , प्रामाणिकपणा, सचोटी, अपार कष्ट या क्षमतांवर मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठीत आणि श्रीमंत उद्योगक होण्याची त्यांची वाटचाल मती गुंगवून टाकणारी, अचंबीत करणारी आहे. अफाट पैसा मात्र मनु स्मृती आणि चातुर्वणाने वेढलेला जात्यांध समाजवास्तव त्यांना त्यांच्या मनातल्या भक्तीमय देवासमोर नतमस्तक होण्याची संधी लाथाडत होते. देवाच्या मुर्तीसमोर नतमस्तक होत बहूजन समाजाला थेट पाया पडता यावा यासाठी मंदिर प्रवेश नसणार्या काळात १८९९ साली त्यांनी भगवती किल्यावर जागा खरेदी करत लाकडाचे भागेश्वर मंदिर बांधले आणि रत्नागिरी परिसरातील आणि संपुर्ण जिल्ह्यातील बहूजन दलीत समाजाला प्रथम मंदिर प्रवेश दिला. या देशातील सामाजिक क्रांतीचा तो पहिला एल्गार होता. त्यानंतर त्यांनी १९२२ साली भागेश्वर मंदिराचा जिणोध्दार करत पक्के चिरेबंदी आणि अत्यंत कलात्मक असे मंदिर बांधले. तेथेच १९२४ साली अनाथमुलांसाठी अनाथालय बांधले आज १०० वर्षे झाली तरी या बांधकामाचा दर्जा किती मजबूत आहे याचा प्रत्यय येतो.
भागेश्वर मंदिर विशेष प्रसिध्द होते ते येथे शिवरात्रीला होणार्या जंगी भजनांनी, तो काळ मुंबई गोवा महामार्ग नव्हता. भागोजी शेठ मुंबईतून २५-३० भजनमंडळे घेऊन बोटीने येत. पुर्ण बोटच ते बुक करत. सलग तिन दिवस ही भजनी मंडळी येथे रहात हजारोंच्या संख्येने काळबादेवी, गणपतीपुळे पासून रत्नागिरी या भजनाला लोटत असे. फार मोठा उत्सवाचा जल्लोष साजरा होई. याची ख्याती पार विदर्भ मराठवाडा पर्यंत पोहोचली होती. याच शिवरात्रीच्या महोत्सवात चौंडे महाराज , संत गाडगेबाबा भागोजी शेठ कीर यांचा सोहळा पहाण्यासाठी आवर्जून येत. महाराष्ट्रातील सर्वाधीक मोठा दानशूर व्यक्तीमत्व म्हणून भागोजी शेठचा परिचय होता. यातूनंच गाडगेमहाराजांच्या आग्रहाखातर त्यांनी आळंदी येथे चंद्रभागेच्या काठी दोन एकर जागा खरेदी करत १९३० साली भागेश्वर धर्मशाळा उभारली. पंढरपूरला जाणारा वारकरी हजारोंच्या संख्येने येथे रहात होता त्यांचे जेवण नाष्टा , कपडा, सारी सारी व्यवस्था भागोजीशेठ कीर स्वखर्चाने करत असत. तेथून पुढील वाई येथे चौंडे महाराजाच्या आग्रहाखातर १९३० मध्ये ५० हजार खर्चून गोशाळा बांधून दिली. आजही ही गोशाळा उत्तम प्रकारे सुरु आहे. असे अनेक ठिकाणी दान धर्म मदत देत भागोजीशेठ कीर स्वतःचे नाव पुढे नआणता निरपेक्षपणे दान धर्म करत असत.
पतितपावन मंदिराची पुर्ण उभारणी आणि स्वतःच्या अखेरच्या दिवसापर्यंत सहभोजन उपक्रम भागोजी शेठ आपल्या खर्चाने चालवीत होते. मात्र याचे श्रेय भटमंडळी सावरकरांना सातत्याने देत रहातात. हे भागोजीशेठ यांच्या कार्यावर आणि वास्तव इतिहासावर केलेला अन्याय अ्राहे. १९३४ मध्ये भागोजीशेठ यांच्यावर सावरकर यांनी लिहीलेल्या लेखात याचा उल्लेख स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षात तर पतितपावन मंदिर म्हणजे आपली कौटुंबीक जहागीरीच असल्याप्रमाणे हे ट्रस्टी वागत आहेत. त्यांनी येथून भागोजीशेठ कीर यांचे नाव दुर करत मंदिरच सावरकर यांनी बांधल्याचा प्रचार सुरु केला भाजपच्या एक आमदार येथे तसे बोलूनही गेल्या आणि आठवीच्या पुस्तकातील पाठात त्याची साक्ष आहे.
सावरकरनां त्या काळात येथील अभिजनांनी बहिष्कृत केले होते. त्यावेळी भागोजीशेठनी त्यानां आधार दिला. आज तेच मंदिर आपलाच वारसा असल्याचे सांगत येथे येणाऱ्या भजनी बुवानां मंदिर प्रवेश नाकारण्याची हिंमत येथील ट्रस्टी दाखवत असतील तर अशा मनमानी आणि मुजोरीला तेथेच लगाम घालणे आवश्यक आहे. याच प्रवृत्तींनी हे मंदिरच पाडून त्याचा नव्याने जिर्णोद्धार करण्याचा आणि इतिहास पुसण्याचा घाट घातला होता. मात्र या जिल्ह्याला समंजस आणि प्रगल्भ राजकीय नेतृत्व लाभल्याने ते संकट टळले. एका बाजूला रत्नागिरी शहराचा ऐतिहासीक अभिमान, सन्मान, शान म्हणून भागोजीशेठ कीर यांचा पुतळा उभारत असतांना त्यांच्या कार्याला मातीमोल करण्याचे कारस्थान उधळून लावणे गरजेचे आहे. भक्तीभावे भजन करणार्या भजनी मंडळाचा देवळात भजन करण्याचा अधिकार आहे तो कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. याची दखल प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
अभिजित हेगशेट्ये


