आर्टिकल

१जून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी च्या वर्धापन दिना निमित्त

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीची पहीली बस १ जून १९४७ नगर ते पुणे अशी धावली. तदनंतर राज्य परिवहन महामंडळ दौडतच राहीले.

महाराष्ट्र राज्य, अखंड भारतातील एक विकसशील प्रगतशील राज्य, कला साहीत्य, संस्कृती यांची जोपासना करुन सातत्याने अग्रेसर राहणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या नावातच महा म्हणजे मोठेपणा समावलेला आहे. असे मोठे राज्य! या आपल्या राज्याच्या नावाप्रमाणेच त्याचा भौगोलिक विस्तार खुप मोठा आहे.

तर अशा या महाकाय राज्याचा सर्वांगीण विकास साधताना राज्यातील दळणवळण व वाहतुकीची साधने यांचा विचार करताना क्षणभर का होईना चक्रावल्यासारखे होते. मग विचार मनात येतो की वाहतुकीचा जटील प्रश्न किंबहुना जिल्ह्यातुन, शहरातुन, खेड्यामधुन सातत्याने फिरत असणारे हे वाहतुकीचे महाकाय चक्र कोण बरे सक्षमपणे फिरवत असेल ? तरी या प्रश्नाचे एक आणि एकच उत्तर म्हणजे राज्य परीवहन महामंडळ म्हणजे आपली एस. टी. होय. ग्रामीण भाग व शहरी भाग यांचा समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य हे एस.टी महामंडळाचेच! मुंबई शहराच्या नाड्या नसा म्हणजे सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे. परंतु संपुर्ण महाराष्ट्राच्या नसांचे जाळे म्हणजे एस. टी. ची अविक्रांत सेवा. अशी ही सेवा जर ठप्प झाली तर संपुर्ण महाराष्ट्राचे; जनजीवन विस्कळीत होवुन त्याचा विपरीत परीणाम जनसामान्य माणसावर होवु शकतो. तर अशी ही राज्य परीवहन महामंडळाची सेवा ही आशिया खंडातील एक अव्वल दर्जाची सेवा मानली जाते.

मंडळाचे कार्यक्षेत्र सेवेचा दर्जा, फेऱ्यांची नियमितता, बस थांबे आगार,कार्यशाळा सुरक्षितता आणि अल्प मोबदल्यात प्रवासी सेवा, प्रवासी सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी ठेवुन विद्यार्थी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ नागरीक, महीला यांना राखिव आसने अशा अनेक योजना राबवित असते. हे सर्व करीत असताना गाव तिथे एस. टी. हे ब्रीद जोपासत असते.मग तेथे व्यापारी विचार ठेवुन नफ्यापोटी ठराविक मार्ग चालविणे हे ध्येय नसुन केवळ आपला सामाजिक वसा जपण्यासाठी नुकसानिचे मार्गही चालवण्याचे धाडस इतर कोणीही करू शकत नाही. पण एस. टी. मात्र हे करते.

आपल्या या प्रचंड कारभाराचा गाडा हा अतिशय सक्षमपणे चालविण्याचे संपुर्ण श्रेय एस. टी. महामंडळालाच द्यावे लागेल.

मुंबई सारख्या शहरातील लोकांना , एस. टी. शी फारसा संबंध नसला तरी वर्षातुन एकदा का होईना गावाला जाते वेळी प्रथम आठवण होते ती एस. टी. ची लाल साडी, पिवळा ब्लाऊज असा ठसठशीत साज करून एखादी लक्ष्मी बाहेर पडावी तशी ही एस. टी. ची गाडी चौपन्न पिल्लाना पोटात सामावुन रस्त्यावरून धावू लागली की मन कसे भरून येते. सणाचे महत्त्व लक्षात घेवून गणपती, होळी, दिवाळी, तसेच पंढरपुर यात्रा व इतर गावोगावच्या छोट्या यात्रा अशा वेळी प्रामुख्याने भाविकांची सोय एइ.टी. च करत असते. अशी ही गोरगरीब मध्यम वर्गीय सेवा पुरविणारी ही एस. टी. च होय. प्रवासी सेवेबरोबरच माल वाहतुकीतही एस. टी मागे नाही. खेड्यापाड्यातुन शिक्षणाचा प्रसार एस. टी. मुळे झाला. गावोगावी एस.टी. ची गाडी धावु लागली त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावत जावुन गोरगरीबांची मूले उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ लागली. सध्या एस.टी ची अवस्था फारच बिगट झाली आहे. शासन दरबदरी एस. टी. कडे दूर्लक्ष होत आहे. मंत्री महोदयांनी इकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  या दर्जाची सेवा ठप्प होते की काय अशी भिती वाटायला लागली आहे. सामान्य माणसांचे ही वाहतुक बंद होता कामा नये. खाजगीकरणा कडे ओढली गेलेली ही एस. टी. पुर्ववत होणे गरजेचे आहे.अशा या महामंडळाच्या प्रदिर्घ सेवेला ७८ वर्षे पुर्ण झाली आहेत. प्रवास करणारे प्रवासी दैवत यांच्याच सहकार्याच्या बळावरच ही आजपर्यंतची यशस्वी वाटचाल करताआली. या पुढेही अशीच कार्यक्षमपणे अविरत राहो यासाठी शुभेच्छा.

महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेच्या शिरपेचात खोचलेले एस. टी महामंडळरूप सुवर्णपीस हे मराठी माणसाला नक्कीच अभिमानास्पद आहे, यात शंका नाही.

१ जून २०२६ एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

✍🏻श्री. विजयराव शिंदे, अध्यक्ष तथा प्रादेशिक सचिव महाराष्ट्र (देवरूख- रत्नागिरी ) राज्य परीवहन निवृत्त कर्मचारी संघटना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button