समाजात ज्ञानेश्वरांबरोबर विज्ञानेश्वर ही हवेत : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
पालकमंत्री उदय सामंत या उदय पर्व या कार्य अहवालाचे प्रकाशन

रत्नागिरी : रत्नागिरी हे कॅलिफोर्निया पेक्षाही सुंदर आहे. रत्नागिरीतील लोकांमध्ये मनाची श्रीमंती, अध्यात्मिकता यासारखे चांगले गुण दिसून येतात. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी जे कार्य केले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या समाजावर ज्ञानाचा पगडा आहे. समाजात ज्ञानेश्वर हवेत पण त्याबरोबर विज्ञानेश्वर पण हवे आहेत, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उदय पर्व या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा आज (३० ऑगस्ट) स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक दीपक गद्रे, दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, रवींद्र उर्फ अण्णा सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले, आपण लक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा करतो; मात्र सरस्वतीकडूनच आपण लक्ष्मीकडे जातो. शिक्षण घेऊनच आपण धन कमवतो. म्हणजेच ज्ञानातून अर्थाजनाकडे जातो. स्टार्टअपमध्ये आपण आता चांगली प्रगती केली आहे. आपली बेडूक उडी आता हनुमान उडी झाली. आहे. ४७६ स्टार्टअप आता ७० हजार झाले आहेत. म्हणजेच मागील सहा वर्षांत आपण चांगली प्रगती केली आहे. मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे जन्मला, कुठल्या परिस्थितीत जन्माला, हे महत्त्वाचे नाही. तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे. शिक्षण हेच आपले भविष्य आहे. काम कोणतेही करा पण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून करा. माझा जन्म गोवा येथील माशेल गावी झाला. गरीब कुटुंबात जन्म घेऊन एका गरीब मराठी शाळेत शिकलो असलो तरी माझे काही बिघडले नाही. ज्या देशात शिक्षकाला मान सन्मान नाही त्या देशाचा विकास कधीच होऊ शकत नाही, म्हणून अशा शिक्षणामध्ये ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, विचार संवर्धन, क्षमता संवर्धन असणे गरजेचे आहे आणि याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे; मात्र आज गुगल हा आपला गुरू झाला आहे, अशी खंत डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली.
यावेळी नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करार करण्यात आला. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १५ नद्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असून, गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नाम फाउंडेशनचे प्रणेते अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आजपर्यंत मला कोणीही जात विचारली नाही कारण माझी जात कलावंताचे आहे. जोपर्यंत माझे कार्य चालू आहे, तोपर्यंत लोक मला सिनेमागृहात बघायला येणार आहेत. माझ्या चेहऱ्यावर स्वभावाला समाजाने स्वीकारला आहे. माझा स्वभाव तिरसट आहे. तरीही मी नाट्यक्षेत्रात टिकून आहे.
नाना म्हणाले, आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने काय केले आहे, हे सर्वांना समजले पाहिजे. कारण आम्ही या सर्वांना मते दिली आहेत. आपले कार्य फक्त उदय पर्वापुरते असू नये, असेही नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, सर्वांनी साहेब ही उपाधी काढून टाकली पाहिजे. साहेब म्हटल्याने आपल्यातील अंतर वाढलेले दिसते. माझे कपडे सदैव चुरगळले दिसतात. कारण समोरच्याला वाटू नये की, त्याच्यात आणि माझ्यात अंतर आहे. राजकारणी लोकांना कशाला पाहिजेत बॉडीगार्ड, आमच्या बोटाला लावलेल्या शिक्क्याने मत सुहागन होते; मात्र आज नवरे पळून जात आहे असाही टोला नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना लगावला. सरते शेवटी आपण काय घेऊन जाणार आहोत. जाळण्यासाठी सुखी लाकडेच लागणार आहेत. ओली लाकडे लावल्यास धूर येऊन लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये भेदभाव उपयोगाचा नाही. आपण सर्व एकत्रच राहणार आहोत. राजकारणी आप मतलबी असू शकतात, पण हे ओळखण्याची जबाबदारी आपली आहे. चार टकली आपल्यामध्ये भानगडी लावत असतील, तर त्यांच्यावर फुली मारा. आत्ताचे राजकारणी आपली तुंबडी भरण्याचे काम करत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण गेले, तेव्हा त्यांच्या खात्यात हजार रुपये देखील नव्हते. आज आपण संतांच्या जाती मांडायला लागलो आहोत, ज्या वारकरी संतांनी समाजाला एकत्रित बांधून ठेवले होते, त्याच्यावर वाद घालण्यास सुरुवात करत आहोत. आज अशी वेळ आली आहे की, आपण कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जायचे हे बघणे गरजेचे असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाला यायच्या आधी उदयला पहिल्यांदाच सांगितले होते की तू अहवाल प्रसिद्ध करत असशील आणि त्याच्यातील एक जरी गोष्ट मला खोटी आढळून आली, तर मी त्यावर जाहीररित्या बोलेन आणि ते चालणार असेल तर मला कार्यक्रमाला बोलाव. म्हणून त्याने अहवालाची ही चित्रफीत बनवून घेतली. असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकाने जनतेला सादर करायला हवा. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मत दिली, म्हणून ते विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काय केलं हे लोकांना कळायला हवे. हे केवळ “उदय” पुरत मर्यादित राहता कामा नये. कारण सरतेशेवटी तुम्ही सर्व आमच्यासाठी आहात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल जनतेला सादर करणे आवश्यकच आहे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.
उदयने कुष्ठरोग्यांच्या समस्या समजावून घेतल्या : विकास आमटे
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे म्हणाले, मी राजकीय कार्यक्रमांना जात नाही. मी चित्रपट पाहत नाही. मात्र उदय याने प्रेमळ धमकी दिल्याने मला यावे लागले. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो की उदय आमच्या आनंद वनात आला होता. त्याने तेथील कुष्ठरोग्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडविण्याचा मनोमन प्रयत्न केला. त्यासाठी अधिकाऱ्यांना सातत्याने आनंदवनात धाडले. आणि सातत्याने त्याच्याकडून आमच्या या आनंदवनातील कुष्ठरोग्यांसाठी मदत होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. उदयला सामाजिक भान खूप चांगले आहे, असेही आमटे म्हणाले.
पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले, दिग्गजांच्या हस्ते माझ्या कार्य अहवालाचे प्रकाशन होते आहे. हा मोठा सन्मान आहे. भाग्याचा क्षण आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर यांच्या माध्यमातून न्यू एज्यूकेशन पॉलीसी राज्यात आणली गेली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, नाना यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली.
आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले. यापुढेही असेच काम करीन. मेडिकल कॉलेज रत्नागिरीत होणार नाही असे अनेक जणांचे म्हणणे होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी शासकीय मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार केले. अभियांत्रिकी कॉलेज मिळाले. एक वर्षात वातानुकूलित मेडिकल कॉलेज उभे राहिले. रत्नागिरी आता एज्युकेशनल हब झाले आहे. विमानतळावरील धावपट्टी राज्यात उत्कृष्ट ठरली आहे. प्रवासी टर्मिनल साठी १०० कोटी मंजूर झाले आहेत. ३०८ कोटी क्रुझ टर्मिनल साठी काल रात्री मंजूर झाले. रत्नागिरीचा आमदार म्हणून जगात कुठेही सांगताना मला अभिमान वाटतो.शासकीय इमारतींना महान व्यक्तींची नावे दिली आहेत.राजकारण हा माझा व्यवसाय नाही, धंदा नाही, आणि उद्योग मंत्री असलो तरी राजकारण माझा उद्योग नाही, असेही सामंत म्हणाले.
यावेळी १०० वर्षे कार्यरत भारत शिक्षण मंडळ या संस्थेला २५ लाख मदतीचा धनादेश वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते देण्यात आला. सव्वाशे वर्षापासून कार्यरत श्री मारुती गणपती पिंपळ पार ट्रस्ट यांच्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळाला १० लाखांचा मदत निधीचा धनादेश समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य परिषदेला २५ लाखाचा धनादेश अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनलाही कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
रत्नागिरीतील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनानी आपल्याला भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. एमआयडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने अशी भवने उभारण्यासाठी रत्नागिरीत दहा भूखंडाचे १० सामाजिक संस्थांना यावेळी मोफत वितरण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.



