अशा लाल मातीत

संवेदनशीलतेला थिजवून टाकणारा ओरखडा

– अभिजीत हेगशेट्ये

बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांच्या बौद्धिक, संवेदनशील, प्रामाणिक, सत्यवचनी, प्रेममय, अहिंसक प्रतिमेचे प्रतिनिधीत्व करणारा राजापूर मतदारसंघातील वातावरण खऱ्या अर्थाने वेगळ्या वाटेने सुरू झाले ते १९९०च्या काळात. त्या काळातील तरुणाईला कॉँग्रेस, समाजवादी खादीधाऱ्यांच्या मुळमुळीत बौध्दिक उपदेशपर भाषणे आणि धोरणांचा कंटाळा आला होता. काहीतरी झणझणीत बेफाट, भन्नाट, क्रांतीकारी, मन चेतवणारे असावे यासाठी तरुणाईचे मन आणि हात सरसावत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणाईच्या या मनाचा अचूक वेध पकडला होता. दक्षिण भारतातील तरुणांनी मुंबईकरांच्या नोकऱ्या काबिज केल्याचा आक्षेप आणि आरोप चपखल बसला होता. “हटाओ लुंगी बजाओ पुंगी” ही घोषणा फार फेमस झाली होती. मुंबईतील शिवसेनेचा मराठी अस्मितेचा भगवा झंझावात नारायण राणे या युवकांच्या माध्यमातून कोकणात दाखल झाला होता.
नारायण राणे यांची कोकणची एन्ट्री अत्यंत जबरदस्त होती. विद्यमान खादीच्या कपड्यातील पुढारी त्यांच्या ढकलून स्टार्ट होणाऱ्या गाड्या या पारंपरिक राजकीय ड्रेसकोडला पूर्ण छेद देणारी राणे स्टाईल अत्यंत जबरदस्त होती. आलिशान गाड्यांच्या ताफा कणकवलीच्या बाजारपेठेतून सुसाट वेगाने आल की, राणे आल्याची खबर साऱ्या कोकणला होत होती. स्वच्छ पांढऱ्या कडक इस्त्रीच्या कपड्यातील नारायण राणे जेव्हा कारमधून उतरत, तो माहोल फार आकर्षक अगदी शाहरुख खानच्या डॉन स्टाईल असे. चालण्यातील जबरदस्त आत्मविश्वास, करारी नजर, समोर सहज कोणी येण्याची हिंमत करणार नाही असे करारी वातावरण. त्या काळातील शिवसेनेच्या नेत्यांची ती एक स्टाईलच होती. याचे आकर्षण तरुणांना प्रचंड होते. साहजिकच कोकणचा तरुण, मुंबईकर चाकरमानी शिवसेनेच्या या आक्रमक स्टाईलने भारावून गेला होता. सोबत बाळासाहेबांचे एक भाषण त्यांने ऐकले की तो परमनंट शिवसैनिक झाला ही बाळासाहेबांच्या भाषणाची अदभूत किमया होती.

प्रा. मधू दंडवते

१९९१ची निवडणूक प्रा. मधू दंडवते ५ टर्मनंतर सहाव्या टर्मसाठी लढत होते. १९८९मध्ये प्रा. मधू दंडवते यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागितली होती आणि बाळासाहेबांनी त्यांना सहकार्य केले होते. त्यामुळे कॉँग्रेसचे शिवरामराजे भोसले यांच्यापेक्षा ४० हजारांचे मताधिक्य घेऊन दंडवते विजयी झाले होते. तो विजय होता शिवसेनेच्या सहकार्याचा. १९९१साली शिवसेनेने येथून वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली. त्याची जबाबदारी नारायण राणे यांच्याकडे होती. या निवडणुकीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि निवडणुकीचा माहोलच बदलून गेला. या तिरंगी लढतीत कॉँग्रेसच्या या मतदारसंघातील मतांची टक्केवारी घटून ही कॉँग्रेसचे कर्नल सुधीर सावंत निवडून आले. शिवसेनेचा हा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला. यातून थेट वादाच्या अनेक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडत राहिल्या. सततचा जमाव, मारामाऱ्या, दगडफेक, दहशत, पोलीस स्थानकावर जमाव चालून येणे यातून कधी नव्हे इतका हा मतदारसंघ संवेदनशील झाला. या मतदारसंघात १९५२नंतर पहिल्यांदाच कॉँग्रेसला विजय मिळाला होता आणि त्याचे शिल्पकार प्रचारप्रमुख श्रीधर नाईक यांचे नाव घेतले जात होते. निवडणुकीनंतर संपूर्ण मतदारसंघातील वातावरण सतत संघर्षाचे आणि तणावाचे राहिले. पूर्वी राजकीय पक्षातील असणारा सलोखा बिघडून गेला आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाला शत्रू, दुष्मन स्वरूपात पाहू लागले.

कर्नल सुधीर सावंत

कर्नल सुधीर सावंत हे सैन्यदलातील. अत्यंत धाडसी आणि स्पष्ट वक्ता असणारे हे व्यक्तिमत्व, राजीव गांधी यांच्या खास विश्वासातील म्हणून ते थेट राजापूर मतदारसघांच्या निवडणुकीत कॉँग्रेस उमेदवार म्हणून उतरलेले तेही देशाचे अर्थमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच्या समोर आव्हान म्हणून; मात्र या निवडणुकीवर सर्वाधिक प्रभाव होता तो शिवसेनेचा आणि नारायण राणे यांचा. पाणी टंचाईवर प्रत्येक गावात स्वखर्चातून पाण्याचा टँकर पोहोचविणारे, तहानलेल्या कोकणला पाणी देणारे नारायण राणे अशी त्यांची तडफदार युवा नेता म्हणून ओळख होत होती आणि तितकाच प्रभाव मतदारांवर आणि संघटनेवर होता. बाळासाहेबांचा कोकणचा वाघ अशीच त्यांची अत्यंत आक्रमक इमेज येथील तरुणाईचे विशेष आकर्षण होती.

लोकसभेच्या या निवडणुकीनंतर या मतदारसंघातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण सतत काही ना काही कारणाने धगधगते राहिले. “कोठारावर काडी न पडो” अशी संवेदनशील परिस्थिती सतत राहिली, याचा पारा दिवसेंदिवस वाढतच राहिला आणि अखेर एक दिवस भर दुपारी कणकवलीच्या रस्त्यावर भर चौकात श्रीधर नाईक यांची तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्र स्तब्ध झाला. संपूर्ण कोकणात प्रचंड घबराट पसरली. कोकणच्या आपलेपणाच्या, मायेच्या परंपरेला, विचारधारेला, सदसदविवेकाला, संवेदनशीलतेला गोठवून टाकणारा तो ओरखडा एक अदृय भितीचा दहशतवाद घेऊन या मातीत आला. लोक मोकळेपणाने बोलायला घाबरू लागले. विजयी उमेदवार खासदार कर्नल सावंत यांच्या डोक्यावर थेट बंदूक रोखण्याचा प्रकारही चर्चिला गेला; मात्र या वातावरणातही कर्नल सावंत या धैर्यशील मिलिटरी मॅनने आपला करारी आणि संवेदनशील वसा आणि कॉँग्रेस संस्कृतीचा विचार येथे मांडत राहण्याचे प्रयत्न करत हा मतदारसंघ पुन्हा त्या भीषण ज्वालाग्रही परिस्थितीतून वर काढला. त्यांच्या काळातील सुमद्र यात्रा, येथील सैनिकांचे प्रश्न, येथील पाणी आणि मुलभूत गरजांचे प्रश्न लोकसभेच्या पटलावर मांडण्याचे कार्य महत्त्वाचे ठरले; मात्र त्या काळात या मतदारसंघाची संवेदनशीलता बदलली ती पुन्हा नव्याने संवेदनशील होण्यासाठी मोठा कालावधी गरजेचा ठरला. एका तात्विक मूल्याधिष्ठित मतदारसंघाच्या चारित्र्याची ती घसरणीची पहिली पायरी होती ही इतिहासातील नोंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button