मुख्य बातमी

महामानवांच्या विचारांचा वारसा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असावे : प्रा. नाईक 

रत्नागिरी : “महामानवांना एका जातीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या विचारांशी केलेली प्रतारणा असते. सर्व महामानवांनी समग्र मानवमुक्तीचा विचार दिला आहे. याच विचारांचा वारसा अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे,” असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते व साहित्य अभ्यासक प्रा. प्रकाश नाईक यांनी केले.
शहरातील टीआरपी येथील आदिनाथ सोसायटीत महामानवांचा संयुक्त जयंती समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय मारळकर यांनी भूषविले.
प्रा. नाईक म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी समतेवर आधारलेले स्वराज्य निर्माण केले तर महात्मा फुले व शाहू महाराजांनी समतेचा विचार अधिक बुलंद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विचारांच्या आधारेच भारतीय संविधान निर्माण केले. कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, संत गाडगेबाबा यांनी हा विचार प्रवाह अधिक गतिमान केला. सर्वच महामानवांचा खरा इतिहास समजून घेत आपण भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे.”
स्वागत व प्रास्ताविक संदेश चवेकर यांनी केले. कार्यक्रमास संजय कदम, तुषार जाधव, सिद्धार्थ सावंत, प्रा. सुकुमार शिंदे, सतीश कदम आदींसह ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button