अशा लाल मातीतलोकसभा २०२४

राऊतांचा जॅकपॉट

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी बाकी असतानाही महायुतीचा उमेदवार कोण, याची निश्चिती अजून होत नाही अशी परिस्थिती आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी हजारोंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचारांचे दोन राऊंड पुरे करत या मतदारसंघातून एकतर्फीच निवडणूक असल्याचे जल्लोशी वातावरण तयार केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सिंधुदुर्ग पूर्ण जिल्हा अधिक रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण असे पाच तालुके मिळून झाला आहे. जवळपास ३२५ किलोमीटर लांबीचा हा मतदारसंघ निवडणुकीच्या काळात फिरणे ही मोठी कसरत आणि आव्हान असते. सध्या महाराष्ट्राचे राजकारण आणि दिल्लीची नजर या मतदारसंघावर खिळून राहिल्याने या मतदारसंघातून कोण उमेदवार असणार हा प्रश्न मोठा जटील आणि तितकाच कळीचा बनला आहे. त्याच्या निर्णयाची अंतिम सूत्रे थेट अमित शहा यांच्या हाती सोपविण्यात आली आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. गेली २-३ वर्षे ते त्यासाठीची तयारी करत आहेत आणि त्यांनी हे यापूर्वीच जाहीरही केले होते. २०१९ च्या निवडणुकीत माजी खासदार नीलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) यांना पिछाडीवर टाकत शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी १ लाख ७८ हजार ३२२ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला होता. मधल्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे होत मा. नारायण राणे आणि त्यांचा परिवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने नारायण राणे यांना राज्यसभेवर संधी देतानाच केंद्रात लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री पद दिले. नुकतीच राणे यांची राज्यसभेची उमेदवारी संपली आहे; मात्र त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी न देता त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवावी, असे भाजपच्या केंद्रीय पातळीवर त्यांना सूचित करण्यात आले; मात्र नारायण राणे यांनी यावेळी आपली निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, असे मध्यंतरी सूचित केले होते. त्यामुळे किरण सामंत हेच येथील महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित होते.
“इस बार भाजपा चारशे पार” हे घोषवाक्य घेऊन भाजपचे निवडणूक राजनिती तज्ञ सर्वेसर्वा ना. अमित शहा मुंबईत आले आणि शिंदे गटाला त्यांच्या विद्यमान खासदारांना तिकीट मिळेल का? हाच मुख्य प्रश्न निर्माण झाला. कल्याण, ठाणे, रत्नागिरी कोणती जागा कोणाला? यात भाजपचे एकमेव केंद्रीय मंत्री या मतदारसंघात आहेत, त्यामुळे ही जागा कमळ चिन्हावरच लढली जाईल आणि नारायण राणेच उमेदवार असतील असे जवळपास शिक्कामोर्तब झाले. संपूर्ण भाजपची टीम कार्यरत झाली. नारायण राणे यांचा राजकीय प्रवास प्रदीर्घ अनुभवाचा आहे. मुंबई बेस्ट अध्यक्ष ते आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते विरोधीपक्ष नेते आणि आता केंद्रीय मंत्री असा अनुभव आणि कोकणच्या मतदाराची नस अन् नस ते ओळखून आहेत. कोकणी माणसाचे अलोट प्रेम त्यांनी अनुभवले आहे आणि त्याच कोकणी माणसाकडून पराभवाचा धक्काही त्यांनी पचविला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ नियोजन करून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारयंत्रणा जोरदारपणे सुरू केली आहे. त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही आहेत.
राणे यांच्या प्रचाराचा एकूणच माहोल पहाता तिकीटाच्या स्पर्धेत असणारे किरण सामंत यांनी फेसबुक पोस्ट करत या स्पर्धेतून माघात घेतली होती; मात्र ना. उदय सामंत यांनी पुन्हा स्पर्धेतील नाव मुकरर करत किरण सामंत यांना थेट नागपूर येथे उपमउख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या भेटीला पाठविले. उदय सामंत आणि देवेद्र फडणवीस यांचे गेल्या दशकातील व्यक्तिगत स्नेहाचे संबंध या राजकीय वाटचालीला नवा आयाम देण्याची शक्यता आजही किरण सामंत यांना तिकीट मिळवून देण्याची आशा जिवंत ठेवणारा आहे. यात कार्यकर्ते मात्र फार नाराज झाले आहेत. किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांची आणि पाठीराख्यांची फार मोठी फौज निवडणुकीसाठी तैनात केली आहे. गेले दोन महिने त्यांनी वाडी-वाडी आणि घर-घर याचे नियोजन केले आहे. भैया शेठ यांचे नाव कधी घोषित होणार याची एखाद्या चातकाप्रमाणे ते वाट पहात आहेत. खरं तर त्यांचा आता संयम सुटत चालला आहे. एकदा काय ते जाहीर करा, किती तिष्ठत ठेवणार अशा टोकाच्या मानसिकतेवर ते आले आहेत. त्यांच्या या संयमाचीच कोण तरी परीक्षा घेत आहे का? अशी शंकाही उपस्थित होत आहे. तयारी तर अशी बेफाट आहे की किरण सामंत यांनी तीन लाखांचे मताधिक्य घेत विजयाची खात्री देणारी मुलाखत दिल्याने विजयाच्या गुलालाची पोतीही ऑर्डर आहेत.
दुसऱ्या बाजूला भाजपची प्रचारयंत्रणा नारायण राणेच उमेदवार म्हणून वेगाने कार्यरत झाली आहे. रत्नागिरीत त्यांनी भाजपला शोभेल असे अत्यंत अद्यावत निवडणूक पक्ष कार्यालय सुरू केले आहे. या उद्घाटनाला शिवसेना पक्षाचे कोणीच आले नाही की बोलवले नाही याची चर्चा होती. महायुतीतील तिकीट जाहीर होण्यासाठी जितका उशीर होत आहे तितका राणे आणि सामंत यांच्या कार्यकर्त्यांतील संवादही दुरावला जात आहे.
मध्यंतरी राजकीय गोटात अशीही चर्चा होती की जोपर्यंत ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, तोपर्यंत रत्नागिरी महायुतीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करायचे नाही. समजा शिवसेनेला तिकीट नाही दिले आणि ते उद्धव ठाकरे गटात गेले तर? आता फक्त एकच दिवस हाती राहिल्याने महायुतीचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप ही जागा शिवसेनेचे किरण सामंत यांना देण्यास इच्छूक नाहीत. गेल्या दोन महिन्यांत बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे महायुतीच्या शिंदे गट अथवा भाजप यापैकी कोणालाही जागा मिळाली तरी त्यांचे एकमेकाला सहकार्य करण्याचे कार्यकत्यांची मानसिकता असेल असे वातावरण नाही, याचा परिणाम ‘उबाठा’चे खा. विनायक राऊत मात्र तुफानी घोडदौड करत आहेत. दीड ते दोन लाखाचे मताधिक्यांने निवडून येणार हा त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. दोन वेळा पूर्ण मतदासंघ त्यांनी पिंजून काढला आहे. त्यांच्या मतदारसघांत निर्भय बनो चळवळीच्या एकूण चार सभा झाल्या आणि त्याला असणारी उत्स्फूर्त हजारोंची उपस्थिती ही भाजपविरोधी मतदानाची हाक देणारी होती. त्याचा फायदा फार मोठा होणार आहे. विद्यमान सरकारच्या नाराजीचा सूर या माध्यमातून राऊत यांना सहकार्य करणारा आहे. सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कोकणातील तळागाळातील एकनिष्ठ कडवा शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जोडलेला आहे. एकप्रकारे खा. विनायक राऊत यांना तिसऱ्या टर्मचा जॅकपॉटच लागला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button