गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचा सूचना
नोडल पोस्टल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी : घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिल्या.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात निवडणूक कर्तव्यावर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील मतदारांना, तसेच ८५ वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदार यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघातील नोडल पोस्टल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण काल (ता. १७) आयोजित केले होते. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर प्रशिक्षण दिले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकडवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘घरी जाऊन मतदान घेताना सूक्ष्म निरीक्षक, पोलीस बंदोबस्त, चित्रीकरण तसेच केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहेत. उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी देखील उपस्थितीत असणार आहेत. त्यामुळे घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावयाची आहे. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मतपत्रिकेवर मतदान कसे नोंद करावयाचे आहे, हे मतदारांना सांगावयाचे आहे. त्याचबरोबर त्याची घडी कशी घालायची याबाबतही त्यांना कल्पना द्यायची आहे.’
या प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



