जिंदालची मनमानी

– अभिजीत हेगशेट्ये
जिंदाल कंपनीच्या गॅस प्रकल्पातून झालेल्या वायु गळतीने भीषण उत्पात घडविला आहे. येथील शाळकरी ६१ मुलांना विषबाधा झाली. त्यातील काही मुले अत्यंत गभीर स्वरूपात श्वास घेऊ शकत नव्हती. १९९२ पासून या भागात कार्यरत असणारा आणि जिंदाल स्टील म्हणून आलेला प्रकल्प आज येथील बालकांच्या जीवावर उठला आहे. या घटनेची दखल गांभीर्याने घ्यावी असे जिंदाल कंपनीला वाटत नाही. त्यांनी घेतलीही नाही, तर येथील ग्रामस्थ, पालक आणि खाजगी वाहन चालकांच्या तत्परतेमुळेच या मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले गेले. जिंदालचा हा मनमानीपणा आणि बेजबाबदार वृत्ती या जिल्ह्याच्या पर्यावरण आणि मानवीजीवनालाच धोकादायक ठरत आहे.
जिंदाल कंपनी जयगड परिसरात आली स्टील आणि वीज निर्मिती प्रकल्पाबरोबर जिंदाल पोर्ट घेऊन. कंपनीच्या येथे येण्याला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध होता. जयगड परिसरातील सर्वच किनाऱ्यावरील गावातून हा विरोध मोठ्या प्रमाणावर होता. या कंपीनीविरोधात अभूतपूर्व अशी जनआंदोलने झाले. त्यातील मुख्य प्रश्न होता येथील आंबा बागायतदारांचा. कोळश्यापासून वीज निर्मीती करताना निर्माण होणाऱ्या ॲशचा. हवा आणि पाणी प्रदूषणाचा येथील आंबा बागायतीवर परिणाम होईल आणि मुख्य उत्पन्न असणारी आंबा बागायतीच नष्ट होईल ही भीती व्यक्त होती आणि दुसरा प्रमुख मुद्दा म्हणजे पाणी प्रदूषणामुळे समुद्राचे पाणी कंपनीच्या उत्सर्जित गरम पाण्यामुळे मासे प्रजनानासाठी धोकायदायक ठरेल. या आंदोलनाची व्याप्ती थेट जमिनीपासून समुद्रापर्यंत होती. जिंदाल कंपनीवर मच्छिमार बोटींनी समुद्रमोर्चाद्वारे अभूतपूर्व आंदोलनाने साऱ्या देशाचे लक्ष व्यापून घेतले होते; मात्र कंपनीच्या अत्यंत चतूर व्यवस्थापनाने त्यांचा मॅनेजमेंट कौशल्य आणि स्थानिक विशेष सल्लागारांच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि आंदोलक नेतृत्व यांना मॅनेज करत सर्वांचे समाधान करत हा प्रकल्प येथे आणला आणि मोठ्या प्रमाणात विस्तारलाही. कोकणात उद्योग प्रकल्पांना विरोध होत असताना प्रकल्प येथे कसे एस्टॅब्लिश करावेत याचे उत्तम मॅाडेल सज्जन जिंदाल यांनी या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला दाखवून दिले.

आज जिंदाल कंपनी संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्वाधिक खोल आणि सुरक्षित असणाऱ्या नैसर्गिक बंदराचे मालक होऊन बसले आहे. जो या शासनाचा आणि कोकणाचे वैभव आणि अधिकार होता हे निसर्ग संपन्न बंदर आज पूर्णतः जिंदालच्या हातात जणू मोफतच मिळाले आहे आणि जयगड परिसरातील जनतेला येथील राजकीय नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना जिंदालच्या मनमानीला सामना करावा लागत आहे. आमच्याच जमिनीत प्रवेश करण्याचा आम्हाला अधिकार नाही. आमच्या देवळाची वाट आता आमची नाही, आमचा समुद्र आता आमचा नाही आणि आता तर आमची हवा आमचे पर्यावरण आमचे नाही. कोण जास्त वटवट करू लागला तर त्याच्या तोंडावर दोन कामाचे (ठेके) तुकडे फेकायचे आणि त्यांना पिटाळून लावायचे. कंपनीने येथील काही लोकांना वाहतूक ठेके देऊन कायमचे तोंड बंद करण्यास सांगितले आहे. शाळांना कोठे १०-२० बेंच देऊन मोठे सामाजिक कार्याचा आव आणतात, तर काही आतल्या गोटातल्या लोकांना काही लाखांच्या स्पॉन्सरशिप देऊन सांस्कृतिक, सामाजिक आवाज आपल्या बाजूला झुकता करून ठेवतात. हे सारे केल्यावर कोणतेही जल, वायू प्रदूषण करण्यास यांची मोकळीक. सर्वसामान्य जयगड परिसरातील माणसांना तेथे फिरकण्यासही बंदी आहे. त्यांचे सिक्युरिटी पार हाकलवून देतात. यापूर्वी अनेक वेळा येथील वायू आणि पाणी प्रदूषणाच्या घटना घडल्या आहेत. येथील अनेक वाड्या आणि महिलांना आंदोलन केले आहे; मात्र या आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी आज जिंदालच्या मालकांना यावे लागत नाही. ते त्याची साधी दखलही घेत नाहीत आणि त्यांना ती घ्यावीशी वाटतही नाही. कारण यांनी पोसलेली ट्रान्सपोर्ट लॅाबी इतकी जबरदस्त आहे की, तेच सारी यंत्रणा सांभाळत या विरोध परस्पर बाहेरच मोडून काढतात. त्यात अगदी सर्व राजकीय पक्षांना ते काही काही वाटा फेकत राहतात.
प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रदूषण महामंडळाचा कारभार तर लोकांना परिचित आहेच. विशेषतः लोटे पर्शराम येथील गेली ४० वर्षे प्रदूषित करणाऱ्या दाभोळ खाडी प्रश्नावर या जिल्ह्याला त्यांनी ते अगदी सिद्धच करून दाखविले आहे. या खाडीची ॲसिड खाडी झाली, तरी प्रदूषण महामंडळ म्हणणार यत्किचीतही नाही प्रदूषण! तोच फॉर्म्युला येथे. या मजबूत बांधणीमुळे आणि थेट पीएम ऑफिसपर्यंत रेप्यूटेशन मेंटेन केल्यामुळे जिंदालची मनमानी प्रचंड वाढली आहे. ती इतक्या टोकाची निर्दयता बाळगून आहे की, ही मनामानी फक्त कंपनी मालक आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्यापुरती मर्यादित न राहता ती थेट कंपनी व्यवस्थापनाच्या सिक्युरिटीपर्यंत झिरपत उतरली आहे. कंपनीच्या साठवणूक गॅस टॅंकमधील दुरुस्ती करताना वायू गळती होते. त्यात शेजारीच असणाऱ्या शाळेतील ६१ मुले बाधित होतात. गुदमरतात, मरणासन्न अवस्थेत येतात आणि कंपनीचा एकही अधिकारी येथे साधे पाहण्याचे अथवा या गॅसबाधित मुलांना उपचार देण्यासाठी धडपड करण्याचे प्रसंगावधान ही दाखवत नाही. या वायू गळतीबाबत कंपनीला काही भाष्य करण्याची गरज पडत नाही. इतका माजोरीपणा कसा काय येऊ शकतो? याचे प्रत्यंतर राज्याचे उद्यागमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रतिक्रियेतून अधीक जळजळीतपणे समोर आले आहे. ना. सामंत यांनी घटना स्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी बाधित मुलांना रुग्णालयात भेट दिली. त्यांनतर प्रतिक्रिया देताना सांगितले, इतक्या वर्षांत आश्वासन देऊनही जिंदाल कंपनी या परिसरात १०० बेडचे अद्यायावत रुग्णालय का उभारू शकली नाही! यापुढेही जाऊन त्यांनी म्हटले आहे याप्रकरणी संबंधित उद्योग मालकावर कडक कारवाई करा. यावरून जिंदालची मनमानी किती टोकाला गेली आहे याचे प्रत्यंतर येत आहे आणि ते फार धोकादायक आहे. ना. सामंत यापुढे जिंदालला कसे वठणीवर आणतात हे महत्त्वाचे आहे की आता जिंदाल त्यांनाही बायपास करण्याइतपत पुढे झेपावले आहेत हेही या निमित्ताने पुढे आले पाहिजे.
या निमित्ताने ठाकरे शिवसेना गटाचे संजय पुनस्कर यांनी जिंदालच्या बेबंदशाही विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा एल्गार पुकारला आहे. जिंदाल कंपनीला रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड परिसरातील अब्जावधी डॅालर किंमतीचे बंदर जागा समुद्र किनारा येथील जनतेने मातीमोल भावात दिला तो येथील जनतेला रोजगाराची संधी मिळावी, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळावी; मात्र प्रत्यक्षात किती रोजगार दिले हे कंपनीने सांगावे. येथील आरोग्य तर कंपनीमुळे धोक्यात आले आहे आणि त्याचवेळी कंपनीचा कोट्यवधींचा सीएसआर कंपनी कोणाच्या घशात टाकते? त्याचा येथील जनतेला काय उपयोग याचे उत्तरही कंपनीला द्यावे लागेल हे जनतेला कळले पाहिजे. वायू गळती निमित्ताने जिंदालचे अनेक प्रश्न पुढील काळात अधिक धगधगते होणार आहेत!


