रत्नागिरीत वक्फ बोर्ड कार्यालयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव येथे वक्फ बोर्ड कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७ ऑक्टोबर रोजी झाले.
रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय असावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती आणि त्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते वेळोवेळी पाठपुरावा देखील करत होते. कोणत्याही कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत होते. होणारी हेळसांड थांबण्यासाठी रत्नागिरीतील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मंत्री उदय सामंत यांच्या पुढे विषय मांडला आणि सामंत यांनी रत्नागिरी येथे वक्फ बोर्डाचे कार्यालय मंजूर करून घेतले. त्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ना. सामंत म्हणाले की आजच्या या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणे गरजेचे होते; मात्र ते कुठे आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे आगामी काळात सर्व बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी सुद्धा हिंदूच आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. या वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या संदर्भात काही गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे चुकीचे आहे.
या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शिरगावचे माजी सरपंच रज्जाक काझी, रत्नागिरी नगर पालिकेचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्वरी, रत्नागिरी शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक मुसा काझी, फय्याज मुकादम, मुज्जू मुकादम, इरफान साखरकर, मेहताब साखरकर, इल्लू खोपेकर, नदीम सोलकर, सुहेल लाला आदी मान्यवर उपस्थित होते.



