अशा लाल मातीत

मिर्या मरिन ड्राईव्ह आणि भागोजीशेठ कीर

१९६७ मध्ये रत्नागिरी भगवती बंदर, मिरकरवाडा बंदराची ब्रेकवॅाटर वॅाल उभारल्यानंतर मिर्या परिसरात समुद्रधूप वाढत गेली. मिर्या किनार्याची समुद्राच्या अतिक्रमणाने होणारी धूप हा गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबीत प्रश्न आहे. ही समुद्रधूप वाढल्यानंतर २०१२ साली जाकीमिर्या बंधार्याचे (Stengthening) सक्षमकिरणाचे ४.१५ कोटीचे काम सुरु झाले. नुकतीच मिर्या धूपप्रतिबंधक  बंधार्याला शासनाने  ४१ कोटीचा अतिरीक्त निधी मंजूर केला असून हा साडेतीन किलोमीटर लांबीचा किनारा मुंबईच्या मरिनड्रायव्ह नेकलेस प्रमाणे सुशोभीत होणार असून रत्नागिरीच्या पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण ठरणार आहे. शासनाची ही घोषणा रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रातील क्रांतीकारी बदलाचा आयाम ठरणार आहे. याचे स्वागत करतांना मुंबईच्या मरिनड्रायव्ह नेकलेस वॅालच्या बांधकामाचे मुख्य शिल्पकार रत्नागिरीचे सुपुत्र दानशूर भागोजी शेठ कीर यांची आठवण अत्यंत महत्वाच्या इतिहासाची नोंद देणारी आहे. यातील अनेक साम्य असणाऱ्या गोष्टींची उजळणी इतिहासाच्या अनेक आठवणींना उजाळा देणारी आहे.

भागोजीशेठ कीर हे रत्नागिरीतील एक युगपुरुष अशी नोंद असणारे, ब्रिटीश काळात पोटाची खळगी भरण्यासाठी खिशात एक दमडीही नसतांना मुंबई गाठणारा हा मुलगा कष्ट, सचोटी, प्रामाणिकपणा आणि कुशाग्र बुध्दीमत्ता या जोरावर मुंबईतील एक नामंकीत उद्योजक झाला. मुंबई दादर स्मशानभूमी, आळंदी येथील धर्मशाळा, वाई भागेश्वर गोशाळा,  रत्नागिरीत भागेश्वर मंदिर,  पतितपावन मंदिर  बांधले, सावरकरांच्या साथीने बहूजन आणि अस्पृष्यांसाठी सामुहीक सहभोजन उपक्रम सुरु करत देशातील सामाजिक क्रांतीपर्वात सहभाग घेणारे दानशूर व्यक्तीमत्व म्हणून रत्नागिरीकरांना आणि महाराष्ट्राला ते परिचित आहेत. शापुरजी पालनजी यांच्या कन्ट्रक्शन कंपनीतील एक भागीदार असतांना त्यांनी मरिनड्रायव्हच्या समुद्ररोधक भींतीचे बांधकाम केले. याची आठवण अत्यंत रोचक आणि दर्जाची अचूकता आणि सचोटी प्रामाणिकतेने स्वीकारलेल्या आव्हानाची साक्ष देणारी आहे.

मरिनड्राव्ह समुद्र मागे हटवत साडेचारशे एकर जमिन नव्याने तयार करण्याचा Back Bay Reclamation scheme महत्वांकाक्षी प्रकल्प ब्रिटीश सरकारने १९१५ साली हाती घेतला होता. ३३४० मिटर लांबीची समुद्ररोधक भिंत उभारण्याचा आराखडा होता. W.R. Davidge Consulting Town Planner टाऊन प्लॅनर होते. तर Sir. George Buchman हे ॲडवायजरी इंजिनिअर होते. तो काळ बैलगाडीतून माल वाहतूकीचा होता. कांदीवली येथून डोंगरातील दगड माती या भरावासाठी आणली जात होती. मात्र हे बैलगाडीने शक्य नव्हते. त्यासाठी थेट रेल्वे मार्ग येथपर्यंत टाकत रेल्वे वॅगनने हा भराव आणला गेला. त्या काळात या कामात पहिल्या कॅान्ट्रॅक्टरने दर्जा सांभाळला नाही. अत्यतं निकृष्ठ दर्जाचे काम केले. त्यामुळे हजारो टन भराव माती समुद्राच्या लाटांत वाहून गेली. या निकृष्ठ दर्जाच्या कामावर ब्रिटीश काळात फार मोठी टीका झाली. शासकीय पातळीवर टीकेचे आसूड ओढले गेले. ब्रिटीश पार्लमेट पर्यंत या भ्रष्ट आणि निकृष्ठ कामाची चर्चा झाली. त्या काळातील ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. या निकृष्ठ आणि भ्रष्ट कामाची निंदा करण्यात आली. “Lloyd Folly”,  “Buchman’s Blunder” अशी उपरोधिक टीका झाली. 

ही साडेतीन किलोमीटर भिंत पुर्ण करणे त्या काळात साधारण १०६ वर्षापुर्वी ब्रिटीशांना अत्यंत अवघड वाटत होते. त्यावेळी शापुरजी पालनजी या कंपनीने सदर काम पुर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले आणि भागोजीशेठ कीर यांच्या नेतृत्वात सदर काम अत्यंत दर्जेदार पणे उभे राहिले. आज १०० वर्षानंतरही ही समुद्ररोधक भिंत उन, वारा, पाऊस तुफाने खात कणखर पणे उभी आहे. हा दर्जा भागोजीशेठ कीर या रत्नागिरीच्या सुपुत्राचा होता. तोच तो मरिनड्राव्ह आणि नेकलेस ॲाफ मुंबई जो जगातील पर्यटकांचे आकर्षण असणारा…. वॅाक स्ट्रीट जेथे दिवसाला हजारो पर्यटक आणि गाड्या येत असतात.  

रत्नागिरी मिर्या धुपप्रतिबंध बंधारा गेल्या ३०-४० वर्षापासून चर्चेत आहे. अनेक वेळा बांधला जातो, पुन्हा त्याचे दगड समुद्राच्या लाटेत वाहून जातात आणि मिर्या हे गावच समुद्र गिळंकृत करणार अशी परिस्थिती निर्माण होते. यापुर्वी येथील गावच अन्यत्र स्थलांतरीत करावे असा विचारही पुढे आला होता. आता मात्र हा साडेतीन किलोमिटरचा धुपप्रतिबंधक बंधारा दर्जेदार पध्दतीने बांधण्यात येणार आहे. त्यावर मरिनड्राव्ह सारखा रस्ताही होणार आहे. यामुळे तो सारा परिसर नक्कीच जगातील पर्यटकांचे आकर्षण राहिल. त्या प्रत्येकवेळी तो मरिनड्रायव्ह आणि भागाजीशेठ कीर यांच्या दर्जेदार कामाच्या आठवणी जागत्या ठेवाव्या लागतील  हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button