एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा समारोप
विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात १४ ते २१ सप्टेंबर या कालावधीत हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त निबंध लेखन, काव्य लेखन, पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आणि सप्ताहाचा समारोप नुकताच आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, वाङ्मय विभाग प्रमुख प्रा. सचिन गिजबिले, वाङ्मय विभाग प्रा. स्वरा खामकर, कला शाखा विभाग प्रमुख प्रा. डॉ. पूजा मोहिते, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत वरिष्ठ गटात साक्षी आंग्रे, श्रवण घवाळी, आफ्रा वाडकर यांनी, कनिष्ठ गटात आदिना फणसोपकर, साक्षी बारगोडे, आलिशा सय्यद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यानंतर भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ‘भाषा दशा आणि दिशा’ या विषयावर बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले, “हिंदी भाषा ही सुंदर, मधुर भाषा आहे. अनेक भाषांमध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो. अनेक कवींचे योगदान या भाषेला लागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचे स्थान तिसरे आहे. हिंदी भाषेकडे राष्ट्रभाषा म्हणूनही पाहिले जाते. आजच्या इंटरनेटच्या माध्यमातून किंवा टीव्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही हिंदी भाषा बोलली जाते. विदेशी लोकही हिंदी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. जनसामान्यांची भाषा म्हणून हिंदी भाषा सर्व भारतीयांना एकत्र आणत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी मराठी, इंग्रजी भाषेबरोबरच हिंदी भाषेचाही वापर आपल्या रोजच्या कामकाजात केला तरच या भाषेचा विकास होईल आणि ती वाढेल असे मत व्यक्त केले.
हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका निकिता नलावडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अद्वैत शेटे या विद्यार्थ्याने केल, तर वैष्णवी बंडागळे हिने आभार मानले. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



