बळीराजाला पावसाची चाहूल देऊन पेरणी करण्याचे संकेत देणारा, निसर्गाचे मखमली कोंदण असणारा मृग ‘मिरग’ किडा

संगमेश्वर :- निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक आणि कोकणच्या कृषी संस्कृतीचा अनोखा साक्षीदार असलेला मखमली लाल मृग किडा दरवर्षी उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर या लहानग्या जीवाचे दर्शन घडते, ज्याला स्थानिक बोलीभाषेत मिरग म्हणून ओळखले जाते.
हा केवळ एक कीटक नसून निसर्गाने शेतकऱ्यांसाठी पाठवलेला पावसाचा अधिकृत संदेश वाहक मानला जातो.
रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात जमिनीतून अचानक वर येणारा हा तांबूस, मखमली कीटक आहे.
कोकणातील शेती आणि हवामानाचा अंदाज लावण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये या किड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या मिरगाच्या आगमनावरूनच पावसाच्या वेळेचे अंदाज बांधतात. हा किडा दिसला की काही दिवसांतच पावसाच्या सरी कोसळणार हा जेष्ठाचा अनुभव आजही बऱ्याच प्रमाणात खरा ठरतो. त्यावरून शेतकरी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करू लागतो.
वैज्ञानिक प्रगतीनंतरही या मखमली जिवाचे जीवनचक्र आजही एका गूढ रहस्यासारखे आहे,हा किडा नेमका कसा जन्माला येतो, जमिनीच्या पोटात तो वर्षभर कोणत्या अवस्थेत राहतो आणि मृग नक्षत्र संपताना त्याचे काय होते, या प्रश्नांची उत्तरे निसर्गाच्या गर्भातच दडलेली आहेत. रोहिणी नक्षत्रापासून मृग नक्षत्रापर्यंतचे अगदी अल्प आयुष्य लाभलेला हा जीव निसर्गाच्या कालचक्रात आपले संदेशवहनाचे मोठे कर्तव्य पार पाडतो आणि पावसाची वर्दी देऊन पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी लुप्त होतो.



