हा अत्याचार रत्ननगरीच्या चारित्र्यावर!

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रदीर्घ वारसा लाभलेल्या रत्नागिरी शहराची अत्यंत सुरक्षित शहर म्हणून ख्याती आहे. पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र आणि देश -परदेशाचे आकर्षण ठरणारे हे शहर त्यांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी बदनाम असले, तरी तेथील चारित्र्य आणि सुरक्षितेबल अत्यंत विश्वासार्ह मानले जात होते. मुलीबाळींनी अगदी रात्री १२ वाजता ही बिनधोक फिरावे असे हे शहर यामुळेच मुंबई-पुण्यापासून ते महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे रोजगार, शिक्षण यासाठी या शहरात स्थलांतरीत होत आहेत. संयमी शांत आणि संतुष्ट आनंददायी जीवन हा या शहराचा स्थायीभाव आणि स्वभाव आहे. अशा या शहरात नजीकच्या खेड्यातील शिक्षणासाठी शहरात आलेल्या मुलीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचा अत्याचार होतो. तिला एका निर्जन जागी बेशुद्ध अवस्थेत फेकून देण्यात येते, ही घटनाच अत्यंत संतापजनक आणि या शहराच्या चारित्र्यावर चिखलफेक करणारी, विश्वासार्हता धोक्यात आणणारी आणि मन उध्वस्त करणारी आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अन्यायग्रस्त मुलीला पाठबळ देण्यासाठी आणि हे कृत्य करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करा, फाशी द्या या मागणीसाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर आला. अगदी सिव्हिल हॅास्पिटलच्या दारात तळ ठोकून बसला. शहरात अत्यंत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. संतप्त जमाव नक्की काय करेल याचे काहीच भान नव्हते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या ”लाडकी बहीण योजना” सुरक्षेच्या ताफ्यात जावे लागल्याने परिस्थिती अधीकच गंभीर होती, या काळात रत्नागिरीतील असणारे रत्नागिरीकर आमदार राजन साळवी अत्याचारग्रस्त बहिणीच्या मदतीला धावून आले. सोबत आमदार शेखर निकम ही धावून आले. त्यामुळे परिस्थितीवर काही अंशी नियंत्रण मिळविण्यात पोलिसांनाही आधार मिळाला.
यापुढील तपासात पोलीस कार्यक्षमतेने काम करतील. घटनेच्या मुळात जातील, जरी त्यांचे काही सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले असले तरी, त्याचा शोध घेतील, गुन्हेगारांना पकडण्यातही यश मिळवतील; मात्र मुळात अशी घटना रत्नागिरी शहरात का घडावी? याचे आश्चर्य वाटते… ज्या शहराने देशाला स्वातंत्र्य चळवळीचा ”स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क” आहे हा नारा दिला, ज्यांनी चारित्र्य आणि त्यागाचे धडे दिले, लेखक, नाटककार, अभिनेते आणि संयमी नेतृत्व दिले त्या मातीत हा विकृतीचा विषाणू आला कोठून? याचे मूळ आहे आजच्या सत्तांध आणि मस्तवाल, मग्रुर शासन प्रशासनात. मध्यंतरी झालेली बदलापूर आणि अनेक घटनांचे मूळ यातच दडले आहे.
गेल्या दोन दशकांत राजकीय पातळीवर जो सत्ता आणि पैसा याचा अत्यंत थरारक विकृत खेळ सुरू आहे. या खेळात अधिकाधिक पैसा कमविण्यासाठी राजकीय नेते आणि त्यांचे चेले (त्यांना ते कार्यकर्ते म्हणतात) यांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत समोरच्या स्पर्धकाला चितपट करताना वैचारिक आयुधे न वापरता आर्थिक, सामाजिक, नैतिक आणि प्रसंगी ठार मारून संपविण्यापर्यंत स्पर्धा क्रुरतेची मजल गेली आहे. यासाठी या राजकीय चौकटीचा पहिला टप्पा असतो तो राज्य शासन चालविताना सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्या हाती लाचार करणे. यातील पहिला भाग या प्रशासन यंत्रणेला आर्थिक अपहार करण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन देणे. शासनाचे क्लास वन , क्लास टू ते अगदी सेक्रेटरीपर्यंतचे अधिकारी या राज्य यंत्रणेने इतके काही भ्रष्ट करून ठेवले आहेत की त्यांना आता या दुसऱ्या मार्गाने येणाऱ्या पैशाची अफाट चटक लागलेली असते. त्यासाठी ते कोणतेही खोटे काम करण्यासाठी तयार असतात. चारित्र्य , नीतिमत्ता याला तिलांजली देणे आणि निगरगट्ट मानसिकता तयार करणे हा या सिस्टिमचा मुख्य भाग राहिला आहे.
एकदा प्रशासकीय अधिकारी राजकीय नेत्यांसाठी लाचार आणि सर्वसामान्यांसाठी कर्दनकाळ हा फॉर्मुला जमून आला की, राजकीय नेते कोणतेही खोटे, भ्रष्ट काम करण्यास सज्ज. मग न केलेल्या कामाची कोट्यवधी रुपयांची बीले काढणे, १०० कोटींच्या कामातील १० कोटी खर्च करून ९० कोटी कसे ढापायचे याचा मार्ग हे अधिकारीच देतात. यातून राजकीय नेत्यांना चांगली अब्जावधींची कमाई होतेच त्याहीपेक्षा त्यांचे कार्यकर्ते अधिक गब्बर होतात. अशा कामातील भ्रष्टाचार काही कारणाने उघडकीस आल्यास त्याच्या समर्थनार्थ अधिकारी असतातच. त्याहीपेक्षा मंत्री, नेते अधिक आवेषात असतात आणि वाहिन्या, वृत्तपत्र जणू त्यांच्याकडे नोकरीला असल्याप्रमाणे मोठ्या आकारात प्राधान्याने दाखवितात. कारण त्यांचा हिशेब मिळणाऱ्या जाहिरातींवर असतो. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केलेला राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरातच कोसळून पडला. त्याचे समर्थन खारावारा आणि पाऊस यांने पडला, असे भाजपचे बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण करत होते. हे याचेच फलित आहे.
रत्नागिरी शहरातील ही घटना ही या शहरातील वाढलेली कायदा धाब्यावर बसवू पाहणाऱ्या मग्रुर, गुंडवृत्तीचे प्रतीक आहे. पोलीस आमचे काही ही करू शकत नाहीत, एक फोन आला की गप्प होतील, असा या मग्रुर मस्तवाल अत्याचारी वृत्तीचा ठाम समज असणाऱ्या त्यांना यत्किंचितही पोलिसांचा धाक वाटत नाही हे यातील अधिक भीषण वास्तव आहे. या वृत्तीच्या नांग्या वेळीच ठेचल्या गेल्या असत्या, तर हे धाडस झालेच नसते. मात्र आज येथील सत्ता आणि पैशाची मग्रुरी ही बेलगाम वाढत आहे. आम्ही पैसा आणि सत्तेच्या जोरावर काहीही करू शकतो, आम्हाला कोणीच रोखू शकत नाही ही बेदरकारता येथील काही घटकांच्या मनात भिनली आहे. त्यावर पोलीस आणि प्रशासन यंत्रणा दुर्लक्ष तर करत नाही ना? अशी सर्वसामान्यांना शंका उपस्थित करत आहेत. पोलिसांनी आपली जरब या घटकांवर ठेवणे हे कायदा सुव्यवस्था यासाठी महत्त्वाचे आहे. मोठे उद्योजक, नेते आणि कार्पोरेटवाले आपले बॅाक्सर ठेवू शकतात. सर्वसामान्य आणि महिला यांची सुरक्षा निव्वळ पोलीस यांच्यावरच अवलंबून आहे. आज नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाही रस्त्यावर उतरल्या. २४ तास विविध ड्युटी करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांना या शहरात सुरक्षित वाटत नाही हे नागवे सत्य आहे. आपल्या मुलींना शाळेत, महाविद्यालयात पाठविणे ही कुटुंबाला धोकादायक वाटावे अशी परिस्थिती होत आहे. पोलिसांबद्दल गुन्हेगारांना भीती आणि सर्वसामन्यांना आदर जोपासणे आज गरजेचे आहे. हा मस्तवालतेचा भस्मासूर वेळीच रोखणे गरजेचे आहे. ही घटना तर रत्नागिरीकरांवरील अत्याचार आणि बलात्कार आहे. रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले हे योग्य झाले. पोलिसांनी आता आपला खाकी अवतार धारण करणे गरजेचे आहे रत्नागिरीकरांच्या सुरक्षिततेसाठी!


