मुलाखतशैक्षणिक

पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी समाजकल्याणच्या वसतिगृहाला अचानक भेट

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलात तर घरी बसवणार पालकमंत्र्यानी दिला सज्जड दम

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर असताना अचानक रत्नागिरी येथील समाज कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वस्तीगृहाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणींना बाबत माहिती घेतली. पालकमंत्री वस्तीगृहाला अचानक भेट दिल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल पालकमंत्र्यांच्या नजरेत आले. विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल पाहिल्यानंतर पालकमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी समाज कल्याणच्या वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येथील विद्यार्थ्यांना असणारे निष्कृष्ट दर्जाचे जेवण पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच सुनावले.

रत्नागिरी समाज कल्याण वसतिगृहामध्ये एकूण ८५ विद्यार्थी राहत असून त्यांचे जेवण, नाश्ताचे एका कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. या कंपनीकडून निष्कृष्ट दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शासनाच्या जीआर अनुसार ज्या पद्धतीने मेनू ठेवून दिला आहे त्या मेनू प्रमाणे कोणतेही जेवण विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याचे पालकमंत्री सामंत यांच्या लक्षात आले. त्यांनी जेवणासंदर्भात आणि इतर समस्यासंदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चर्चा केली. यावेळेस विद्यार्थ्यांना शासनाकडून दिले जाणारे भत्ते, युनिफॉर्म आणि इतर सोयी सुविधांचा अभाव असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी पुरवत नसल्याने श्री. सामंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

समाज कल्याणच्या वसतिगृहाचा लेखाजोखा घेतल्यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी येथील विद्यार्थ्यांची कमिटी तयार करून त्यांच्याशी संवाद साधणार असून विद्यार्थी जेव्हा सांगतील जेवण चांगले होते त्यावेळेस संबंधित ठेकेदाराला बील अदा करण्यात यावे अशा सूचना समाज कल्याण अधिकारी संतोष चिकने यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी समजून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पालकमंत्री म्हणून पुरवण्याच्या आश्वासन पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, रत्नागिरी एमआयडीसीच्या आरओ वंदना खरमाळे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर, जनक थोत्रेकर, समाज कल्याण अधिकारी संतोष चिकणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button