अशा लाल मातीत

पत्रकारांची कार्यशाळा

पत्रकारिता, वृत्तपत्र, माध्यम  हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्याची ओळख आहे. कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्याला पत्रकारितेचा एक जाज्वल्य इतिहास आहे. बाळशास्त्री गंगाधर जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार, ते कोकणातील पोंभुर्ले येथील, मराठीतील पहिले वृत्तपत्र ”दर्पण” ६ जानेवारी १८१२ रोजी प्रकाशित धाले. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा ब्रिटिश सरकार विरोधात जळजळीत अग्रलेख लिहिणारे प्रसंगी तुरुंगवास भोगणारे लोकमान्य टिळक याच रत्नागिरीतील, चिपळूणकर, आगरकर ते निशिकांत जोशी, राजाभाऊ लिमये असा वैचारिक मुल्याधिष्ठतेचा आणि वास्तव ठसठशीतपणे मांडण्याचा प्रखर वारसा लाभलेली कोकणची पत्रकारिता अधिक समृध्द व्हावी म्हणून शासन आयोजित भव्य अशी पत्रकारांची कार्यशाळा रत्नागिरीत नुकतीच आयोजित केली होती. रत्नागिरीच्या पत्रकारितेला शासकिय प्रगल्भतेचा नवा आयाम देणाऱ्या या प्रकल्पाचे कोकणातील तमाम पत्रकारांनी मनापासून स्वागत करत उपस्थिती लावली हा त्यातील आनंदमय भाग होता.

शासनाच्या पत्रकार कार्यशाळेत कोकणातील पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन ज्येष्ठ पत्रकार- शासकीय अधिकारी मार्गदर्शनासाठी आले होते. यातील डॅा. गणेश मुळे हे धुळ्याचे मात्र त्यांचे शिक्षण आणि पत्रकारितेतील उमेदीचा काळ हा ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांच्या मार्गदर्शनात घडलेला. शासकिय सेवेत वरच्या श्रेणीत जाण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेतील शासनाचा सहभाग यावर त्यांची मास्टरी आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात येथील पत्रकारांना मार्गदर्शन करताना शासन आणि पत्रकार यांतील सुसंवाद यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. ”लाडकी बहीण” या योजनेबद्दल पत्रकारांनी कसे भरभरून लिहीले पाहिजे याबद्दल ते विस्ताराने बोलत होते.

या कार्यशाळेतील अत्यंत अभयासू वक्ते होते ते सतीश लळीत. सतीश लळीत ह्यांची बहुतांश सेवा ही माहिती विभाग कार्यालयात झाली. त्यांना मुख्यमंत्र्याचे सहसचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली; मात्र शासकिय सेवेत राहूनही शासकिय योजना त्यांतील प्रचार प्रसार या बाहेर विचार करून स्वतंत्र संशोधनात्मक लेखक म्हणून त्यांचे काम विशेष उल्लेखनीय आहे. वैचारिक स्पष्टता असणार हा लेखक आहे. त्यांचे कातळ शिल्प या विषयावर मोठे संशोधन आणि लेखन स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांना विषय होता फेक न्यूज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). या विषयावर त्यांनी छान माहिती दिली. “एआय”मुळे कसे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, फेक न्यूजमुळे कशा खोट्या बातम्या पसरविल्या जातात आणि अनेक राजकीय कार्यकर्त्याचे जीवन प्रसंगी उद्ध्वस्त होते.

राजकीय नेतृत्वाने पत्रकारांची कार्यशाळा घेण्याची माझ्या आठवणीतील ही तशी पहिलीच वेळ आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे पत्रकार या कार्यशाळेत पूर्णवेळ बसले आहेत अशीही पहिलीच वेळ. यापूर्वी पत्रकारांची कार्यशाळा घेण्याचा प्रयोग एन्रॅानचे संजीव खांडेकर यांनी केला होता. तसे ते नेहमीच पत्रकारांची शाळा घेण्याचा प्रयत्न करत असत. त्यांचा कार्यविस्तार राज्य आणि देश होता. त्यामुळे मुंबईतील पत्रकारांना दोन दिवस रानवीच्या माळावर दौऱ्यावर आणत त्यांची खान-पानाचा जोरदार बडदास्त ठेवत. अनेक पत्रकार तर त्यांनी विशेष कन्सल्टंट म्हणून कंपनीच्या स्टाफ लीस्टवरच ठेवले होते. एन्रॅान कंपनीचे ठीक होते त्यांना जनमताविरोधात तो प्रकल्प रेटून राबवायचा होता. त्यासाठी पत्रकारांच्या माध्यमातून सतत ते बिंबवायचे होते आणि दुसरे म्हणजे लोकांना त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी ६४ कोटींची गंगाजळी राखीव ठेवली होती; मात्र तरीही कंपनीला अपेक्षीत पत्रकारीता आपलीशी करून घेणे शंभरटक्के जमले नाही.

आज काळ बदलला आहे. पत्रकारिता हा चौथा स्तंभ राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करणारी परिस्थिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ते अगदी दोन दशकापर्यंत माधव गडकरी, गोविंद तळवळकर, अरुण टिकेकर ते कुमार केतकर यांच्यापर्यंत पत्रकारिता एक ध्यास, एक श्वास, एक समर्पण, विचार, मूल्य, सत्य, निरपेक्षतेचा जाज्वल्य आविष्कार होती. एन्रॅानने शासन, प्रशासन, पत्रकारिता आदी साऱ्याच लोकशाहीच्या स्तंभाना त्यांच्या त्यांचा मगदूराप्रमाणे आपलेसे करण्याचा आणि खरेदी करण्याचा जो फंडा वापरला आणि बऱ्याच अंशी यशस्वी केला. तेथून येथील पत्रकारिता आणि साऱ्याच यंत्रणातील अस्मितेचा अहंकार बोथट झाला. विरोधापेक्षा सहकार अधिक लाभदायक हे व्यवसायभिमुख तंत्र वृत्तपत्र , चॅनेल यांचे मालक, संपादक यांनी स्वीकारले. जगण्यासाठी त्याची गरज होती. ६ जानेवारीला कार्यक्रमासाठी बाळशास्त्री आणि लोकमान्य तर आहेतच.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तर पत्रकारितेची होती नव्हती ती न्यूसेन्स व्हॅल्यूही संपत चालली, प्रत्येकजणच पत्रकार झाला आहे. त्यातील फेक न्यूजचे कारखाने एखादा कार्पोरेट कार्यालयाप्रमाणे राजकीय पक्षच चालवितात हे आता लपून राहिलेले नाही. त्यात कोकणातील पत्रकारांना कार्यशाळा घेऊन काय सांगणार? शासकिय पत्रकारिता पुरस्कार कसे घ्यावेत अगदी राज्य, राष्ट्रीय स्तरावर यातील मास्टरी कोकणचीच आहे आणि ‘शासन आपल्या दारी’ त्याच्या योजना हे सांगण्यासाठी पूर्वी माहिती कार्यालयातील अधिकारी प्रभाकर कासेकर अत्यंत सुंदर भाषेत प्रेसनोट पाठवत असत आज त्याचीही गरज नाही. कारण प्रत्येत राजकीय नेतृत्व कॅमेरा सोबत प्रेस नोट रायटर सोबत ठेवणे हा एक महत्त्वाचा भाग मानतात. अशा वातावरणारत रत्नागिरीतील पत्रकारच खरे तर राजकीय नेत्यांचीच कार्यशाळा घेऊ शकतात. हा विनोदाचा भाग सोडला तरी या निमित्ताने पत्रकारांना फेक न्यूजचे मार्गदर्शन झाले आणि “एआय”चेही. आता पहाच या निवडणुकीत ते त्याचा करिश्मा दाखविणारच. महत्त्वाचा यातील भाग पत्रकार भवनाचा प्रश्न. स्वतंत्र जागा देऊन जिल्हा पालकमंत्री यांनी सोडविला आणि चक्क पत्रकार भवनासाठी आर्थिक एक कोटीची तरतूद केली त्याब­द्दल ना. उदयजी सामंत यांचे मनापासून आभार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button