नाना पटोलेंनी राजापुरात मागितली हाताला साथ

– अभिजीत हेगशेट्ये
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघातून विजयी झाल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी आता सिंधुदुर्गपुरते मर्यादित न राहता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा पण केला आहे. त्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांना पराभूत करण्याचे ऐलान त्यांचे पुत्र नीलेश राणे यांनी जाहीरपणे केले. त्यापाठोपाठ राजापूर विधानसभाही भाजपच काबीज करणार अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली आहे. सामंत-राणे यांच्या गदाराळोत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी राजापूर विधानसभा काँग्रेस लढणार आणि जिंकणार, असे ऐलान करत येथील काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांची उमेदवारी जाहीर ही केली. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा रंग भरू लागला आहे.
दक्षिण कोकणच्या राजकीय वर्चस्वाचा विचार केल्यास सामंत आणि राणे या कुटुंबाचे जबरदस्त राजकीय वर्चस्व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय क्षितीजावर आहे. मागील दशकापासून या दोन कुटुंबातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार झाला आहे. दोन्ही कुटुंबांची तुलना झाल्यास राणे यांच्याकडे ते आणि त्यांची दोन्ही मुले तिघेही राजकारणात पूर्ण ॲक्टिव आमदार मुख्यमंत्री ते खासदार या सर्व पदांचा अनुभव असणारे, तर सामंत कुटुंबात वडील आणि दोन भाऊ त्यात उदय सामंत प्रत्यक्ष राजकारणात, राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या स्पर्धेत आघाडीवर, वडील पूर्णतः ग्रामीण जनता आणि शेती यांच्यात रमलेले आणि दुसरा भाऊ व्यवसाय आणि सध्या खासदारकीसाठी इच्छूक.
आजच्या तुलनेत नारायण राणे स्वतः खासदार, माजी मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा आमदार असले, तरी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काही फार मोठी उलथापालथ घडविण्याची जादुई क्षमता त्यांच्यात असल्याचे जाणवत नाही. याउलट अनेक वेळा नारायण राणे यांना अडचणीत आणणारी आणि विनाकारण नवे वाद तयार करणारी विधाने आणि स्टेटमेंट कुटुंबातून होत रहातात. परिणामी ज्या वेगाने ते राजकीय परिस्थितीवर मुसंडी मारू इच्छितात त्याच वेगाने कदाचित त्यापेक्षा अधिक वेगाने त्यांना बॅकफुटवर जावे लागते. त्यामुळेच हाती असणारे केंद्रीय मंत्रीपदही मोदी ०३ मध्ये टिकू शकले नाही. आर्थिक पातळीवर राणे कुटुंबीय अफाट मजबूत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोलपंप, हॉटेल इंडस्ट्री, मुंबई-गोवा आणि संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेल इंडीस्ट्री आणि विविध व्यवसायतील त्यांची गुंतवणूक आणि उत्पन्नाचा स्त्रोत अफाट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंजिनिअरिंग ते मेडिकल अगदी पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमही त्यांचाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक यशस्वी उद्योगक आणि सर्वाधिक उत्पन्न असणारे म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमावर असेल.
तुलनेने उदय सामंत यांची राजकीय उंची आता खूपच वाढली आहे. राजकारणातील अत्यंत मुत्सद्दी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सत्तेतील मुख्य नेतृत्वासोबत नाते मेंटेन करणे आणि त्यांना आपली किती गरज आहे याची जाणीव देणे यांतील चरुस्त्रतेत उदयजी माहीर मानले जातात. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ज्या वेगाने गेल्या दोन दशकांतील त्यांच्या राजकीय प्रवासाचा चढता आलेख अनेक धुरींणांना विस्मयचीत करणारा आहे. उद्याच्या राजकारणातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होण्याची क्षमता म्हणून आज त्यांच्याकडे काही जण स्पर्धक म्हणूनही पाहतात. एका बाजूला सर्वपक्षीय राजकारणातील रिलेशनशीप मेंटेन करणे आणि त्याचवेळी मतदारसंघ अत्यंत ताकदीने सांभाळणे या कसरती ते फार उत्तमपणे सांभाळत आहेत. त्यांचे बंधुराज किरण सामंत हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. “सायलेंट किलर” म्हणून सकारात्मक पातळीवर त्यांचा उल्लेख करता येईल. पडद्याआड राहून काम करणे हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे. कन्स्ट्रक्शन व्यवसायाची व्याप्ती त्यांनी इतकी विशाल केली आहे, की मुंबई, पुणे या कॅास्मोपोलीटीन क्षेत्रातील ते एक बडे बिल्डर आहेत. कोकण तर त्यांचाच आहे. येथील सारी कन्ट्रक्शनची कामे त्यांचीच. यातून या कुटुंबाची आर्थिक संपन्नता इतकी अगणित आहे की ते राणे यांच्या धनशक्तीला मागे टाकू शकतात. किरण सामंत यांचा आणखी विशेष बाब म्हणजे त्यांची प्रशासनावर असणारी जबरदस्त हुकमत. मंत्रालयातील कोणत्याही मंत्र्याचा सेक्रेटरी त्यांना ओळखतो एवढेच नाही, तर सन्मान करतो. मंत्रालयातील काही मंत्रालयाचा कारभार, त्याची धोरणे ही यांच्याच कार्यालयातून होतात अशा चर्चा चालतात. यातील उपहास आणि विनोद सोडला तरी ही क्षमता ही सामंत कुटुंबियांचे शक्तीस्थान आहे.
रत्नागिरी लोकसभ मतदारसंघातून किरण सामंत १०० टक्के निवडून आले असते अशी त्यांची तयारी होती; मात्र त्यांना महायुतीने तिकीट नाकारले. आता राजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. यामुळे राजापूर मतदारसंघात राजकीय धुमशान होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील शिवसेनेचे (उबाठा) विद्यमान आमदार राजन साळवी आपल्या तिसऱ्या टर्मची तयारी करत आहेत. यात काँग्रेसने येथे थेट उमेदवार जाहीर केल्याने आणि तोही महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासमोर ‘मविआ’कडून कोण उमेदवार येणार हे निश्चित नाही. जे होते त्यांना उदय सामंत यांनी अगोदरच आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे राजन साळवी रत्नागिरीत सामंतासमोर उभे रहाणार अशा चर्चा सुरू आहेत.
नारायण राणे हे रत्नागिरी, राजापूर मतदारसंघांवर भाजपचा दावा करत आहेत. त्यांना खरा शह द्यायचा आहे तो उदय सामंत यांच्या वाढत्या वर्चस्वाला. यामुळे राणे विरोधात सामंत ही लढाई रत्नागिरी – राजापूर या दोन विधानसभा मतदारसंघात जोरदार होणार. महायुतीत हा संघर्ष असेल यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ही निवडणूक अधिक सोपी होण्यासाठी नाना पटोले यांनी राजापुरात हाताला साथ मागितली आहे.


