अशा लाल मातीतआज दिनांक(सदर)लोकसभा २०२४

पीएम मंगळसूत्राचा रत्नागिरी इफेक्ट

-अभिजित हेग्शेट्ये

“सबका साथ सबका विकास” भविष्यातील पाच ट्रिलीयन इकोनॉमीचे स्वप्न, प्रत्यके तरुण, महिलांच्या विकासाची आणि सुरक्षेची “मोदी गॅरेंटी” ह्या अत्यंत जादूई, आकर्षक घोषणांनी लोकसभा निवडणुकांचा प्रचार रंगत असताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे मंगळसूत्र खेचून घेत ते अधिक मुले असणाऱ्यांना कॉंग्रेस देईल असा अत्यंत निचतम पातळीवरील हिंदू-मुस्लिम विद्वेषाचा अंगार पेटविणारा मुद्दा राजस्थानमधील प्रचार सभेत उपस्थित केला आणि सारा देश हादरून गेला. मागील दहा वर्षे सत्तेत असणारे देशाचे महागुरू अशी आपली प्रतिमा सतत विकसित करू इच्छिणारे या देशाचे पंतप्रधान इतक्या पातळीवर प्रचाराची रणनिती कशी काय आणू शकतात. भाजप आणि त्यांचे सहयोगी पक्षही यामुळे अस्वस्थ आणि शब्दहीन झाल्याचे आज सोशल मिडीयावर जाणवत आहे. पीएम यांच्या मंगळसूत्र विषयाचा परिणाम रत्नागिरीच्या लोकसभा मतदारसंघात थेट नारायण राणे यांना सोसावा लागणार का?
विद्यमान केंद्रीय मंत्री आणि कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून प्रथमच लोकभेची निवडणूक लढत आहेत. गेली ४० वर्षे नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द राजकीय परिघात उच्चस्तरावर सतत बहरत राहिली आहे. कोकणात शिवसेना रुजविण्यातील महत्त्वाचे योगदान बाळासाहेबांच्या या निष्ठावान सैनिकांचे आहे. त्यांची बक्षिसी म्हणून मुख्यमंत्री पदाचा सरताज बाळासाहेबांनी त्यांना देवून सन्मानित केले होते. मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता ते केंद्रीय मंत्री अशी त्यांची वाटचाल आणि अफाट लोकसंपर्क, तितकीच अफाट आर्थिक सुबत्ता, प्रचंड असा लोकसंग्रह, कार्यकर्त्यांचे फार मोठे संघटन ही त्यांची राजकीय शक्ती फार मोठी आहे. या लोकसभा निवडणुकीला मनापासून उभे रहाण्याची दादांची इच्छा नव्हती. तसे त्यांनी सुरुवातील बोलूनही दाखविले; मात्र दिल्लीश्वरांनी रत्नागिरी काबीज करावयाची असेल, तर नारायण राणे यांच्याशिवाय पर्याय नाही याची नोंद सुरुवातीलाच केली होती. हे सारे संचित घेऊन नारायण राणे या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. अखेरच्या क्षणी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली, तरीही फक्त २४ तासांच्या अवधीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना जो जनसागर रत्नागिरीच्या रस्त्यावर उतरविला तो अचंबित करणारा होता. रत्नागिरी शहरात येण्याचे सारे मार्ग वाहनांच्या गर्दीने पार भरून गेले होते. आधीच रत्नागिरी शहरातील सारेच रस्ते कॉंकिटीकरणाच्या ओझ्याखाली पार दबून गेले आहेत. स्कूटर चालवायला जागा मिळत नाही. वाटोवाट गाड्या उभ्या करत नागरिकांना आपले घर शोधावे लागते. त्यात हा बाहेरील गाड्यांचा महालोंढा. मारुती मंदिरपासून सुरू झालेला हा जनांचा सागर इतका अफाट होता की, याची शिरगणती झाली, तरी राणेच निवडून आले असा निष्कर्ष अनेक भाजपच्या नेत्यांनी काढला होता.
या महायात्रेतील वैशिष्ठ्य होते ते राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत आणि किरण सामंत यांचे. ही जागा शिंदे शिवसेनेलाच मिळाली पाहिजे यासाठी उदय सामंत प्रचंड आग्रही होते. उदय सामंत यांचे बंधुराज किरण सामंत यांनी गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण मतदारसंघाची बांधणी केली होती. नारायण राणे यांनीही त्यांना अनुकूलता दर्शविली होती. चिपळूण ते दोडामार्गपर्यंत प्रत्येक गाव आणि वाड्या-वाड्यांपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्याचे काम केले होते. निवडणुकीची तयारी तर इतकी काटेकोर आणि नेटकेपणाची होती की फक्त नाव जाहीर होण्याचा अवकाश, सांमंताच्या एका नजरेच्या इशाऱ्याने शेकडो कार्यकर्ते सर्व यंत्रणेसह कामाल लागणार. अखेरच्या क्षणापर्यंत ह्या किल्ल्यासाठी दिल्लीच्या तख्तासमोर सामंत लढत होते. फडणवीसांच्या भेटीला विशेष विमानाने नागपूरला गेले. बंद खोलीत बहुत चर्चा झाल्या; मात्र येथील कोकण्यांनी अशा काही चाव्या सरकवल्या की, निर्णयाचा टप्पा थेट अमितजी शहा यांच्या टेबलावर स्थानापन्न झाला. यात रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने, माजी आमदार प्रमोद जठार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा रोल फार महत्त्वाचा मानला जातो आणि अगदी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या क्षणी किरण सामंत यांचे आघाडीवर असणारे नाव बाजूला होत नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. यांत किरण सामंत आणि उदय सामंत यांचा मोठेपणा इतका की त्यांनी आपण राणेंसोबत सर्व शक्ती पणाला लावू, असे जाहीर करत महायुतीचा धर्म पाळण्याचे अभिवचन देत स्वतः फॉर्म भरण्याच्या त्या जनयात्रेत सहभागी झाले.
अगदी सारी गणीते कशी जुळून आली, राणे कुटुंबीयांच्या मनासारखी… कडवे भाजप कार्यकर्त्यांनी म्हणे नाके मुरडली; पण भाजप हा फारच शिस्तीचा पक्ष, एकदा दक्ष म्हटले की दक्षच त्यांत फरक नाही. रत्नागिरीतील पटवर्धन, परुळेकर ते माने सारे गट-तट एकत्र येऊन फॉर्म भरण्याच्या यात्रेत सहभागी झाले. अशा अत्यंत आनंददायी, आशादायी आणि उल्हासित वातावरणात निवडून येण्याची गॅरेंटी असताना राजस्थानच्या सभेने या आनंदाच्या वातावरणात खडा टाकल्याची वेदना येथील कार्यकर्ता सोसत आहे.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात १३ लाख ६७ हजार ३६१ मतदार आहेत. यांत महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणारा हा लोकसभा मतदारसंघ देशाच्या पश्चिम किनाऱ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकवस्तीचा अभ्यास केल्यास येथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. या मतदारसंघात जवळपास दीड लाख मुस्लिम मतदार आहेत. पंतप्रधानांच्या एका वक्तव्याने या समाजाला भाजपपासून थेट अलग करण्याची प्रक्रिया तर होणार नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी इतक्या जाहीरपणे असा उल्लेख करावा, हे हिंदू-मुस्लिम हजारो वर्षांच्या सलोख्याचे नाते जपणाऱ्या या प्रदेशाला धक्कादायक आहे. कोकणच्या परंपरा एकमेकांशी गुंतल्या आहेत. येथील हिंदू, मुस्लिम भाईचारा, विलक्षणीय सलोखा आणि एकमेकांप्रती आदर दर्शविणारा आहे. हातीस येथील पीर शेख बाबा यांचा दर्गा येथील मानकरी भंडारी समाजाचे नागवेकर एक फार मोठी दीर्घ परंपरा, अशी शेकडो उदाहरणे आहेत. आज पंतप्रधानांच्या वक्तव्याने एक वेदनेची कळ ह्या हृदयांतून उमटलीच आणि त्याची वेदना अन्य समाजाला आणि विशेषतः स्त्रियांना ही झाली. का असे बोलावे पंतप्रधानांनी? आमच्या महागुरूंनी, हा अस्वस्थ करणारा प्रश्न थेट राणे यांच्या निवडणुकीवर इफेक्ट करणारा ठरणारा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button