जोरदार शक्तिप्रदर्शनाने नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आज आपला अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी शहरातील मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळला असून भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रासप, मनसेसह रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांची भव्य रॅली जयस्तंभच्या दिशेने निघाली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम, लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, सहप्रमुख बाळ माने, शिवसेना नेते किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, आरपीआय, रासप, रयत क्रांती या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील मुख्य मार्गाची एक बाजू पूर्ण बंद करण्यात आली होती. जयस्तंभ येथे विविध जोशपूर्ण गाणी लावून माहोल करण्यात आला
रॅली जयस्तंभ येथे आल्यानंतर भाजपा नेते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) नेते किरण सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.



