जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो : नारायण राणे
रत्नागिरी : ‘माझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आज एवढ्या रणरणत्या उन्हातही आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलात. या रॅलीत सहभागी होऊन महायुतीचा उमेदवार म्हणून मला जो पाठिंबा दिलात, जे सहकार्य केले हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. तुमच्या या उत्स्फूर्त पाठिंब्याने लोकसभा निवडणुकीतील माझा विजय निश्चित झाला आहे. मी अडीच ते ३ लाख मताधिक्याने निवडून येईन, असा विश्वास महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. ते म्हणाले, ‘महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम अशा सर्वच महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मला पाठींबा दिला आणि या लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.



