डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरून जामियामध्येही राडा; 4 विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

जेएनयूनंतर, पीएम मोदींवर बीबीसी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगबाबत जामिया विद्यापीठातही गोंधळ झाला आहे. जामिया विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंग प्रकरणी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (25 जानेवारी) सांगितले की, आज बीबीसीच्या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगवरून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जामिया युनिव्हर्सिटीच्या चीफ प्रॉक्टरच्या आदेशानुसार बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगपूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामिया विद्यापीठातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रिनिंग न करण्याबाबत सांगण्यात आले होते.विद्यापीठ प्रशासनाने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, परवानगीशिवाय विद्यार्थ्यांची बैठक किंवा कोणत्याही चित्रपटाच्या स्क्रिनींगची परवानगी दिली जाणार नाही.यामध्ये हितसंबंध गुंतलेल्या लोकांना/संस्थांना शांततापूर्ण शैक्षणिक वातावरण खराब करण्यापासून रोखण्यासाठी विद्यापीठ सर्व उपाययोजना करत आहे. असे करणाऱ्या आयोजकांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
जेएनयूमध्येही झाला होता राडा…काल संध्याकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून राडा झाला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री नऊ वाजता या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगची घोषणा केली होती. मात्र, स्क्रीनिंगपूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील लाइट बंद करण्यात आली होती.प्रशासनाने वीज आणि इंटरनेट खंडित केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांनी नंतर आंदोलन केले आणि दावा केला की ते मोबाईल फोनवर डॉक्युमेंट्री पाहत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यादरम्यान दगडफेकही झाल्याचं सांगण्यात येत आहे.



