लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदारांनी हक्क बजवावा –जिल्हाधिकारी – एम देवेंदर सिंह

रत्नागिरी दि. २5 :-
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जागरुक नागरिक होऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
पटवर्धन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन २०२३ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. मतदार दिनानिमित्त यावेळी शपथ घेण्यात आली.
जिल्हाधिकारी म्हणाले भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि भारत देश घडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्ती रत्नागिरी जिल्हयातील आहेत. त्यामुळे या जिल्हयातील एक जागरुक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. लोकशाहीमध्ये मतदानाने मतदारांना आपला लोकप्रतिनिधी ठरविण्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकांना आपला मतदानाचा हक्क बजवावा. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालयातल विद्यार्थ्यांशी संवाद साधत मतदानाचे महत्व पटवून दिले आणि हे महत्व इतरांना पटवून द्या असे आवाहन सुध्दा त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव, ए.एन. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये मतदानाचे महत्व विषद केले.
जिल्हयामध्ये मतदार नावनोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. साक्षरता क्लब नोडल ऑफीसर आणि विविध क्षेत्रातील निवडण्यात आलेल्या आयकॉन्सचा यावेळी सत्कार करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयानी रांगोळी, चित्रकला, भिंतीपत्रक, निंबध, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात केले होते. या स्पर्धेमधील विजेते, उपविजेतांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला



