VIT Semicons चा २४,४३७ कोटींचा मेगा प्रकल्प रत्नागिरीत, लवकरच उद्घाटन?

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देणारा महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील झाडगाव येथे साकारण्यात येणार आहे. VIT Semicons Park Private Limited या कंपनीतर्फे उभारला जाणारा हा प्रकल्प राज्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठा चालना देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता असून, या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी राज्य सरकार व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
जानेवारी २०२५ मध्ये दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र शासनाने VIT Semicons बरोबर २४,४३७ कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला होता. या करारानुसार या प्रकल्पामुळे सुमारे ३३,६०० रोजगार संधी निर्माण होतील, ज्याचा फायदा स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात मिळेल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रकल्पाची किंमत ११,५५० कोटी रुपये असणार आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर हब म्हणून पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त होत असून, प्रकल्पाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आणि उद्घाटनानंतर आणखी तपशील जाहीर केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.



