मुख्य बातमीशैक्षणिक

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या धर्मशास्त्रविषयक प्रकल्पाला मंजूरी

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांच्याद्वारे अष्टादशी परियोजनेअंतर्गत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राला ‘अन्तर्विद्याशाखीय धर्मशास्त्रविषयक संशोधन’ Interdisciplinary Research in Dharmaśāstra हा प्रकल्प प्राप्त झाला असून या प्रकल्पासाठी चार लाखांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्राचीन भारतीय धर्मशास्त्राच्या विविध पैलूंचे सखोल अध्ययन व संशोधन करणे हा आहे.

या प्रकल्पाचे संपूर्ण कार्य भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे केले जाणार असून या प्रकल्पाचे प्रमुख पर्यवेक्षक म्हणून भारतीय दर्शन विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना हे काम पाहणार आहे. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे कार्यान्वयन होणार आहे.

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी धर्म शास्त्र विषयाबाबत विपुल संशोधन करत धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ तयार केला. भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्या हा महान कार्याची प्रेरणा घेऊन हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या प्रकल्पाचा उद्देश प्राचीन भारतीय धर्मशास्त्राच्या विविध पैलूंचे सखोल अध्ययन व संशोधन करणे, तसेच त्याचे आधुनिक संदर्भात पुनरावलोकन करणे आहे. या प्रकल्पांतर्गत धर्मशास्त्राच्या विविध अंगांचे अध्ययन आणि संशोधन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये स्मृती, पुराणे, आणि अन्य प्राचीन धार्मिक ग्रंथांचा समावेश असेल. या प्राचीन ग्रंथांचे आधुनिक सामाजिक, नैतिक, आणि विधी संबंधित संदर्भात विश्लेषण करण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्राचीन धर्मशास्त्राचा अभ्यास आणि त्याची आधुनिक जीवनशैलीत उपयुक्तता यावर विशेष भर दिला जाईल. शाळा, महाविद्यालये, आणि विद्यापीठांमध्ये नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा विकास होईल. तसेच, आंतरराष्ट्रीय विद्वानांसोबत सहकार्य आणि संवाद वाढेल.

“धर्मशास्त्रातील आंतरविषयी संशोधन” प्रकल्पामुळे भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल आणि समाजाच्या नैतिक व सांस्कृतिक विकासासाठी मौल्यवान योगदान दिले जाईल.

“धर्मशास्त्रातील आंतरविषयी संशोधन” प्रकल्पामुळे प्राचीन भारतीय धर्मशास्त्राचे समग्र अध्ययन होईल आणि विविध शैक्षणिक व संशोधन संस्था यामध्ये सहभागी होतील. हा प्रकल्प भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राच्या गहन अध्ययनासाठी नवी दालने उघडेल.

– डॉ. मधुसूदन पेन्ना

प्रकल्पाचे प्रमुख पर्यवेक्षक, अधिष्ठाता, भारतीय भारतीय दर्शन विभाग कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button