वादळ पेल्यातच राहू दे!!

– अभिजित हेगशेट्ये
पावसाळ्यात रस्त्यांना पडणारे भले मोठे खड्डे, त्यात दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू , हात-पाय मोडणे, गाड्या नादुरूस्त, चिखलाचे साम्राज्य आणि यांतून सर्वसामान्य नागरिकाला सोसाव्या लागणाऱ्या पराकोटीच्या हाल-अपेष्टा. यामुळे सर्वसामान्य रत्नागिरीकर अत्यंत त्रस्त झाला आहे. या सोबतच पाणी प्रश्न, कचरा प्रश्न, पार्किंग प्रश्न हे गेल्या दोन दशकांतील मुलभूत प्रश्न तेथेच आहे. सततच्या मिळणाऱ्या आश्वासनांवर विश्वास ठेवून एक दिवस नक्कीच या मुलभूत समस्या सुटतील या आशेवर तो पूर्ण एक दशक चातकासारखी अपेक्षा करत आहे. २०२४ हे वर्ष मोठ्या अपेक्षा घेऊन आले होते; मात्र पावसाचा पहिला थेंब पडला आणि गुळगुळीत डांबर विरघळू लागले. यामुळे संतप्त रत्नागिरीकरांनी या विरोधात जिल्हाधिकारी यांना जाब विचारू, आंदोलन उभारू, प्रसंगी रस्त्यावर उतरू म्हणत एका संवाद सभेचे आयोजन केले होते.
मारुती मंदिर येथील हॅाटेलमध्ये आयोजित ही सभा सुरू होण्यापूर्वीच तथाकथित सामंत समर्थकांनी २०० लोकांच्या समुहाने एक तास अगोदरच या हॅालला ताबा घेत प्रथम आलेले “आम्ही रत्नागिरीकर” चे निमंत्रक विजय जैन यांना चहुबाजूने घेरत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. त्यांना स्टेजवर आणत त्यांना धक्काबुक्की केली. जैन यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष शरदपवार गटाचे नेते मिलींद कीर होते. समर्थकांनी प्रचंड हुल्लडबाजी आणि हंगामा केला. ना. उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या कोट्यवधींच्या कामाचा पाढा वाचला.
दोनशे समर्थकांचा जमाव त्यांत माजी नगरसेवक आणि सर्वाधिक महिलांचा भरणा होता. मीटिंगला नेहमीप्रमाणे ५-१० मिनिटे उशीराने येणाऱ्या रत्नागिरीकरांसाठी हॅालचा दरवाजा बंद आणि आत प्रचंड दादागिरी आणि दहशतीचे वातावरण, जैन हे “आरटीआय” कार्यकर्ते आहेत. ना. सामंत यांच्या अनेक घोषित कामांची, निधी खर्च आणि प्रत्यक्ष कामांची माहिती अधिकाराखाली काढलेली माहिती त्यांच्यापाशी आहे. सोशल मीडियावर टाकत ते पोलखोल करत असतात. नुकताच ना. जयंत पाटील यांनी विधानसभेत “रत्नागिरी डांबर घोटाळा” बॅाम्ब टाकल्याने तर जैन हे सामंत समर्थकांच्या रडारवर असल्याचे बोलले जात होते. याची परिणीती या मॅाबलॅंचिंगप्रसंगी आढळली.
जैन यांना “बोल आता बोल “ म्हणत समर्थक ढकलत होते; मात्र विजय जैन या कार्यकर्त्याचे विशेष कौतुक आहे. त्यांनी गांधीवादाचा मार्ग पत्करला आणि निर्भयपणे अत्यंत करारी नजरेने ठाम पाहिले. शेकडोचा जमाव असताना जराही डगमगला नाही. अशा वातावरणात “आम्ही रत्नागिरीकर” सभा घेऊ शकत नाही, असे त्यांनी ठणकावले. त्यानंतर सामंत समर्थकांनी सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. या ठरावाला जैन यांना पाठींबा देण्यास सांगितले. त्यांवर जैन यांचे उत्तर सर्व उपस्थितांना घाम फोडणारे होते. हा शेकडोचा जमाव एक प्रकारे अंगावर धावून येत आहे. तार स्वरात ओरडत आहे. जबरदस्ती करत आहे; मात्र विजय जैन खरा “निर्भय बनो” चळवळीचा अस्सल कार्यकर्ता… त्यांनी सांगितले, “मला ठार मारलेत तरी मी पाठींबा देणार नाही.”
सामंत समर्थकांनी अशाप्रकारे हुल्लडबाजी करणे, रत्नागिरीकरांना बोलून न देणे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे, यापुढे ठोकून काढू अशा जाहीर धमक्या देणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. सांमत समर्थकांच्या या गुंडशाहीचा रत्नागिरीकर तीव्र निषेध करत आहेत. पोलीस यंत्रणाही प्रसंगांचे पूर्ण रेकॅार्ड असताना हुल्लडबाजांना आश्रय देत विजय जैन आणि मिलींद कीर यांना पोलीस स्थानकात बोलवून त्यांना नियमभंगाची नोटीस देतात, हा सारा अजब न्याय .
खरं तर दादागिरी, दहशत, गुंडगिरी ही विशेषणे उदय सामंत यांच्या राजकीय वाटचालीला जोडली गेली नव्हती. राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे, गद्दारीचे आणि अन्य आरोप प्रत्यारोप होणे आजच्या काळात राजकीय सर्व्हायवलचा एक भाग आहे. सांमत एक संयमी राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा हल्ले झाले. त्यांच्या कारवर हल्ला झाला; मात्र अशा वेळी त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. अशी पार्श्वभूमी असताना इतकी असुरक्षितता आणि अस्वस्थता का वाटावी?
या घटनेनंतर एक महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती माजी खासदार नीलेश राणे यांची. या घटनेचा निषेध, मत प्रकटीकरण, सभा घेण्याचा अधिकार, तर बिहार होईल इतपत ठीक होते; मात्र सामंत समर्थक जमावात सर्वाधिक मुस्लिम होते हे त्यांचे विधान फार धोकादायक आणि अती संवेदनशील आहे. या घटनेला धार्मिकतेचे वेष्ठण जोडण्याचा हा प्रयत्न संभाव्य धार्मिक तणाव उचकवण्याचे संकेत देत आहे. यापूर्वी राणे यांनी जनावराच्या मृत शरीर यावरून हिंदू आक्रोश मोर्चा काढत रत्नागिरीचे वातावरण पेटविण्याचा प्रयत्न केला; मात्र सक्षम रत्नागिरी पोलीस अधिक्षक यांच्या समयसुचकतेने ती परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली गेली.
सामंत समर्थकांनी “आम्ही रत्नागिरीकर” सभा उधळून लावण्याचा डाव का खेळावा याचे आश्चर्य वाटते, कारण यांत असणारे ज्येष्ठ नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राजनजी शेट्ये या शहरातील प्रत्येक नागरिकाशी जोडलेले आहेत, संयमी आहेत आणि नागरिकांचे वास्तव प्रश्न जाणून आहेत. येथे जमलेले सारेच संयमी नेतृत्व होते. आता “उडीदामागे चार दाणे” असणार तसे काही टपोरे असतील ही, महिलातही गेली २०-२५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे होते. त्यामुळे असे का घडावे यांचा सामंत यांनी शोध घ्यावा…
सामंत समर्थकही रत्नागिरीकरच आहेत. शाळेपासून महाविद्यालयपर्यंत एकत्र वावरले आहेत. एकमेकांचे कौटुंबिक संबंध आहेत. गेल्या अनेक पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. रोटी-बेटी व्यवहार आहेत. रत्नागिरीकरांचा गणेशोत्सव आणि रमझान यांची नाती रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट आहेत. हातीसच्या हुरुसाचे मानकरी नागवेकर हे त्याचे पिढ्यानपिढ्याचे प्रतिक आहे. यापूर्वी या सामाजिक ऋणानुबंधाना आरएसएस वृत्तीने १९८६ साली गणपती मिरवणूक वाद पेटवून दंगली भडकवण्याच प्रयत्न झाला; मात्र येथील हिंदू-मुस्लिम भाईचारा यांनी वातावरण पुन्हा पहिल्यासारखे संतुलित आनंददायी सहजीवनाचे केले. आज या संधीचा फायदा घेत रत्नागिरीकरांच्या मनात धर्मांधतेचे विष पेरण्याचा प्रयत्न होत असेल, तर रत्नागिरीकरांनी सावधान होण्याची गरज आहे. या शक्तींना येथे प्रवेश देता कामा नये. आपले मतभेद आपले वाद आपण मिटवू या! सामंत यांनी आपल्या समर्थकांना समज देणे गरजेचे आहे.
हे पेल्यातील वादळ पेल्यातच राहू दे !!!!!


