आदमी बुलबुला है पानी का…!!!

– अभिजीत हेगशेट्ये
आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतहा पर
टूटता भी है, डूबता भी है
फिर उभरता है, फिर से बहता है
न समुंदर निकल सका इस को
न तवारीख तोड पाई है
वक्त की हथेली पर बहता
आदमी बुलबुला है पानी का……!!!
गुलजार यांची ही शायरी आजच्या राजकीय परिस्थितीत अगदी प्रत्येकाला आपली वाटावी इतकी चपखल बसत आहे.
बचेंगे तो जितेंगे…..जिंदगी पाने के लिये, जिंदा रहना जरुरी है….!!
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार, कडवा शिवसैनिक, रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे मागील तीन टर्म प्रतिनिधीत्व करणारे आमदार राजन साळवी यांची परिस्थिती अशी झाली आहे. भविष्यात जिंकण्यासाठी किमान जिवंत राहणे तर गरजेचे आहे.
चहुबाजूने कोंडीत पकडून जेरीस आणण्याचे कुटील नितीचे तंत्रज्ञान भाजपने राजकारणात अधिक प्रभावीपणे वापरले आहे. प्रेम आणि राजकारण यात सर्व काही माफ असते, अशा इंग्रजी म्हणीचा पुरेपूर वापर आजच्या राजकारणात पहायला मिळतो. भारतीय संविधानातील लोकशाहीच्या राजकारणात काही विधीनिषेध, संकेत, संहिता, पथ्य, सुसंस्कृतता, अहिंसा आणि विरोधकांचा सन्मान या गोष्टी पाळणे याचे संकेत आहेत; मात्र लोकशाहीच्या मार्गाने सत्तेचा सारीपट हाती आल्यावर हे सारेच संकेत धुडकावून लावायचे आणि आपल्या मनमानीचा अजेंडा राबवायचा हाच आजचा अजेंडा आहे. वैचारिक द्वंद्वाच्या पलीकडचा हा संघर्ष आणि लढाई सुरू होते ते विरोधक अथवा प्रतिपक्षाला पूर्णतः संपवून टाकायचे, नेस्तनाबूत करावयाचे, उध्वस्त करायचे अगदी त्याचे नामोनिशाण ठेवायचे नाही या हुकुमशाही वृत्तीकडे. सजग आणि सृजनशील लोकशाहीत विरोधी विचार, वेगळा विचार हा वैचारिक प्रगल्भता आणि चर्चांना सकारात्मक मानला जातो. सत्ताधारी पक्षांना विरोधकांची गरज आणि विरोधही महत्त्वाचा आणि सकारात्मक पातळीवर आवश्यक असतो. यातूनच जनहिताचे आणि देशहिताचे, त्याहीपुढे जात मानवाच्या कल्याणाचे निर्णय होत राहतात; मात्र मला विरोध सहन न होण्याची मानसिकता ही माझ्या मनमानीला हुकुमशाहीच्या पटलावर घेऊन जाते. जेथे विरोधक हा शब्दच नाही. फक्त मी आणि मीच… त्यातून विरोधकाला पूर्ण संपवूनच टाकायचे, त्याचा आवाज दाबून टाकायचा… या प्रक्रिया विविध यंत्रणांच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्याचे व्हिक्टीम होतात. त्यांना जगणे अशक्य होते.
शिंदे सरकारच्या नव्या फार्मेशनमध्ये राजन साळवी हा त्यांच्या हक्काचा माणूस होता; मात्र अनेक प्रयत्न होऊनही राजन साळवी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले अखेरपर्यंत. याचा त्रास त्यांच्या कुटुंबाला प्रचंड प्रमाणात झाला. एसीबीच्या चौकशी पथकाने त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या घरातूनच बाहेर काढले. मुलाची, पत्नीची अगदी खिशातील पाकीटातील ५० रुपयांची ही चौकशी करून त्यांना पार हैराण केले.
राजन साळवी हा एक सामान्य कुटुंबातून राजकारणात नगरसेवक ते आमदार असा आलेला कार्यकर्ता. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक सर्वसामान्य शिवसैनिकांसारखाच अत्यंत कडवी निष्ठा असणारा कार्यकर्ता. बाळासाहेबांच्या शिवसेनेची हीच खरी शक्ती होती. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनीही ते नाते तितक्यात कौटुंबीकतेने जपले. राजन साळवी यांना हार्ट ॲटॅक आला त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना एअरलिफ्ट करत मुंबईत हलविले आणि त्यांची काळजी घेतली. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत राजन साळवी चौथ्यावेळी अत्यंत ताकतीने लढले; मात्र आर्थिक सत्तेपुढे त्यांचे प्रयत्न कमी पडले. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाशी आणि मतदारसंघातील कुटुंबाशी जोडलेला हा कार्यकर्ता; मात्र राजकारणात असूनही मोठे आर्थिक गणित जमवू न शकल्याने मंत्रीपद आणि आर्थिक बलाढ्यतेच्या स्पर्धेत पिछाडीला राहिलेला.
राजन साळवी यांच्या उबाठा सोडण्याच्या निर्णयाचा परिणाम कोकणातील ठाकरे गटाच्या शिवसेनेत मोठा होणार हे निश्चित. जिगरबाज नेता राजन साळवी या बलाढ्य भांडवलशाही विरोधात टिकू शकणार नाही, तर आमची काय कथा? असे सर्व सामान्य शिवसैनिकाला वाटणे साहजिकच आहे. याची साखळी थेट ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीपर्यंत पोहोचली आहे. त्यातही नुकतेच भाजपचे कोकणातील मंत्रीमहोदयांनी थेट जाहीर करून टाकले महाविकास आघाडीच्या एकाही सरपंच कार्यकर्त्याला एकही रुपयाचा विकास निधी देणार नाही. जो आमचा सभासद होईल त्यालाच निधी… पुन्हा बॅास वरती आहे. इतकी थेट स्पष्टता वजा धमकीच म्हणावी असा अजेंडा… यांत आपले इतक्या वर्षांतील गावातील, वॉर्डातील अस्तित्वाचे काय? असा प्रश्न सर्वसामान्व कार्यकर्त्याला अस्वस्थ करत राहतो. त्याच्या छोट्या जगातल्या अस्तित्वाचीच लढाई तर आहे.
काँग्रेसचा काळ वेगळा होता. लोकशाहीचा सन्मान होता, विरोधकांना मान होता. त्यांच्या मतांची दखल घेतली जात होती. पंडीत जवाहरलाल नेहरु ते इंदिरा गांधी ते मनमोहन सिंग ते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विरोधकांचा सन्मान केल्याचे, त्यांना मोठेपणा दिल्याचे आणि त्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा आदर केल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र आज विरोधकच औषधाला ठेवायचा नाही अशा वेळी वाहत्या गंगेपासून दूर राहण्यापेक्षा… कडवी वैचारिक लढाई लढत आपले आयुष्य पणाला लावण्यापेक्षा त्यात डुबकी मारावी असा विचार सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.
एका मेगा इव्हेंटमध्ये संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने त्यांचे चिरंजीव रोहन बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम असे अनेकजण या महाकुंभमेळ्यात डुबकी मारणार आहेत; मात्र या मेगा प्रवेशात राजन साळवी यांचा प्रवेश अलग का? तो मुंबईत ठाण्यातील विशेष कार्यक्रमातच का झाला? हे प्रश्न अनुत्तरीत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मनात राजन साळवी यांच्याबद्दल अशी कोणती विशेष बाब आहे जी कोकणच्या राजकारणात नवा आयाम आणू इच्छिते???
आदमी बुलबुला है पानी का… फिर उभरता है….!!!


