मुख्य बातमी

रत्नागिरीतील पतितपावन मंदिरामध्ये कोणत्याही जिर्णोद्धाराची आवश्यकता नाही : अंकुर अनंत कीर

रत्नागिरी : श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज १०० वर्षांनंतरही दर्जेदारपणे व दिमाखदार पद्धतीने उभ्या आहेत. त्यामुळे माझ्या मालकीच्या या पतितपावन मंदिरामध्ये कोणत्याही जिर्णोद्धाराची आवश्यकता नाही.

याबाबत आपला हेतू चांगला असला, तरी काही लोकांकडून आपल्याला चुकीची माहिती देऊन आपली दिशाभूल करून शासनाचा निधी न्यायप्रविष्ठ असलेल्या ठिकाणी केला जाण्याची शक्यता आहे. आपण या विषयी कोणतीही प्रकीया राबवू नये अन्यथा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्या करीता आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन अंकुर अनंत कीर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वःखर्चाने रत्नागिरी येथे बांधलेल्या पतितपावन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची बातमी रत्नागिरी येथील वृत्तपत्रांमधून तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे.

याबाबत आम्ही आपले निदर्शनास वस्तूस्थिती आणून देऊ इच्छितो की, दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी वीर सावरकर यांच्या विनंतीवरून सन १९२९ साली शेवडे यांच्याकडून गाडीतळ, रत्नागिरी येथील २१ गुंठे जागा खरेदी करून त्यावर सर्व जातींमधील स्पृश्य-अस्पृश्यांचे दर्शनासाठी ७१ हजार ५७२ रुपये स्वःताच्या खासगीतून खर्च करून देशातील पहिले पतितपावन मंदिर व शेजारील धर्मशाळा सन १९३१ साली बांधल्या आणि भागोजीशेठ कीर हयात असेपर्यंत पतितपावन मंदिराची दिवाबत्ती पासून सहभोजनाचा सर्व खर्च भागोजीशेठ कीर त्यांच्या खासगी उत्पन्नातून स्वतः करीत असत, याबाबतची नोंद भागोजीशेठ कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद आहे.

२४ फेब्रुवारी १९४४ रोजी श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या निधनानंतर त्यांच्या खासगी जमिनी, मिळकती आणि मंदिर स्थळे सन १९४७ सालापासून मुंबई हाय कोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांच्या ताब्यात होत्या. त्याचा निकाल सन २००४ साली लागला व या सर्व खासगी जमिनी, मिळकती आणि मंदिर स्थळे त्यांच्या वंशजांच्या ताब्यात देण्यात आल्या.

यातील काही मंदिरे व जमिनी मुंबई हाय कोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांच्या ताब्यात असताना काही लोकांनी बेकायदेशीररित्या विकल्या व काही ठिकाणी बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन केले; परंतु पतितपावन मंदिर व परिसरातील बांधकामे आणि त्याखालील जागा ही मुंबई हाय कोर्टाच्या कोर्ट रिसीव्हर यांच्या आदेशाने श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांना देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा नातू म्हणून त्याची मालकी या आदेशाप्रमाणे माझ्याकडे आहे.

श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज १०० वर्षांनंतरही दर्जेदारपणे व दिमाखदार पद्धतीने उभ्या आहेत.

त्यामुळे माझ्या मालकीच्या या पतितपावन मंदिरामध्ये कोणत्याही जिर्णोद्धाराची आवश्यकता नाही. आपण या विषयी कोणतीही प्रक्रिया राबवू नये, अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्या करीता आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन अंकुर अनंत कीर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाणे येथे देखील सादर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button