मुख्य बातमी

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी विनायक राऊत यांनी घेतली रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू केली जाईल, असे महाप्रबंधकांकडून ठाम आश्वासन

रत्नागिरी : दादर ते रत्नागिरी तसेच रत्नागिरी ते दादर ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. मीना यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. मीना यांनी चांगला प्रतिसाद देत लवकरच दादर – रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ठाम आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी श्री. मीना यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, आपणाला माहीतच आहे की, कोकण रेल्वेच्या निर्मितीपासून असंख्य असे कोकण रेल्वेचे पॅसेंजर जे कोकणवासीय मुंबई आणि मुंबई उपनगर विशेषतः विरार, वसई, बोरीवली, दहिसर, मीरा-भाईंदर या पश्चिम उपनगरातून तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे, भांडुप येथून दादर ते रत्नागिरी पर्यंत कोकण रेल्वेच्या अनेक स्टेशन पर्यंत प्रवास करत असतात. तसेच रत्नागिरीहून सुद्धा मुंबईला येणारे लोक हे या पॅसेंजरने दादर पर्यंत येत असतात. एक अत्यंत चांगली अशी सुविधा रेल्वेने कोकणच्या मध्यमवर्गीय जनतेला उपलब्ध करून दिली होती. ज्या लोकांची कुवत एक्सप्रेस किंवा मेल ट्रेनने जाण्याची नाही ते सर्व सदर पॅसेंजरने प्रवास करत होते. ही पॅसेंजर बंद झाल्यामुळे त्या सर्व प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून आर्थिक नुकसानही त्यांना होत आहे. त्याचबरोबर या पॅसेंजरवर अवलंबून असणारे आणि ज्यांना रोजगार मिळणारे असे असंख्य छोटे छोटे विक्रेते हे देखील त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे.

आपण ज्या वेळेवर दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुटत होती, त्याच वेळेवर दादर ते गोरखपुर आणि दादर ते बरेली अशा गाड्या सोडण्याचा आपण निर्णय घेतला आहे असे समजते. दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करुन त्याऐवजी दादर ते गोरखपुर आणि दादर ते बरेली अशा गाड्या सुरु करणे म्हणजे समस्त कोकणवासियांवर अन्यायकारक ठरेल. दादर-रत्नागिरी पॅसेंजर दररोज सुरू करावी अशी आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. त्याचबरोबर पुन्हा दादर ते रत्नागिरी पॅसेंजर चालू करावी ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि अनेक स्टेशनवरील असणाऱ्या प्रवासी संघटना यांची मागणी असून आपण तातडीने दादर-रत्नागिरी आणि रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर ट्रेन चालू करावी जी पूर्वी पासून चालू होती, अशी मागणी विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली.

या भेटीदरम्यान श्री. राऊत आणि मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. मीना यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला चांगला प्रतिसाद देत लवकरच दादर – रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात येईल असे ठाम आश्वासन रेल्वेच्या महाप्रबंधकांकडून देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button