चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्वीकारताना सरकारी वकिलाला पकडले

चिपळूण : आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले.
चिपळूण येथील ओयासीस हॉटेल येथे गुरुवारी (९ जानेवारी) संध्याकाळी ७.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले असून, चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश देवराव जाधव विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ (खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी ५ लाख रुपयांची मागणी केलेली लाच रक्कम होती आणि स्वीकारलेली लाच रक्कम १,५०,००० रुपये होती.
याबाबत सविस्तर असे की, यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने ही केस राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहात होते.
२६ डिसेंबर २०२४ व ३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल, असे प्रयत्न करेन, जास्त उलट तपास न घेता महत्त्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ९ जानेवारी २०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करून लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.



