पवारांचा झंझावात…

ज्यांना मोठे केले, सन्मानित केले, सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हाती भविष्याचे समाजकारण, राजकारण करण्यासाठी दिल्या, त्यांनीच लालसेपोटी अटीतटीच्या प्रसंगात साथ सोडत खोक्यांच्या मागे धाव घेतली. याचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा ध्यासच माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी घेतला असून त्यातील एक आमदार शेखर निकम सध्या त्याच्या निशाण्यावर आहेत. याचा प्रत्यय खा. पवार यांच्या कोकण दौऱ्यात आला.
वय वर्षे ८४, पण उत्साह पंचवीशीतला. अनेक आजारांनी ग्रासले आहेत; मात्र देश आणि राज्याला वैचारिक अधःपतनापासून आणि सामाजिक, राजकीय सलोखा राखण्यासाठी कुरुक्षेत्रावर गांडीव धनुष्य हाती घेऊन देशाचे आणि राज्याचे वैचारिक नेतृत्व करण्यासाठी शरद पवार नावाचा योध्दा रणांगणात उतरला आहे. याची अनुभूती तमाम कोकणवासीयांना परशूराम भूमीत आली आणि सारा कोकणच नवोन्मेषाने रोमांचित झाला. आदल्याच दिवशी आरोप आणि आरोळ्या ठोकणारे कोणत्या गल्लीत गायब झाले त्याचा पत्ताही लागला नाही.
कऱ्हाड मार्गे महामार्गाने ना. शरद पवार कोकणात उतरले तेच मुळी कोकणातील अस्थीपंजर, विदीर्ण रस्त्यांचे ऐश्वर्य अनुभवत आणि कोयना वाशिष्ठीच्या साक्षीने आणि कोयना ऊर्जा प्रकल्पातील सकारात्मक प्रचंड ऊर्जा घेऊनच. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत कोकणातील चिपळूण प्रांत हा त्यांना सर्वाधिक जवळचा वाटत राहीला. ज्येष्ठ संपादक पत्रकार निशिकांत जोशी आणि शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांच्यावर त्यांचा विशेष लोभ होता. त्यातही गोविंदराव निकम हे त्यांच्या कुटुंबातीलच एक होते. गोविंदराव निकम यांचे जि. प. अध्यक्ष, राज्य बॅंक अध्यक्ष ते खासदार आणि सह्याद्री शिक्षण संस्थेची भव्य उभारणी यात ना. शरद पवार यांचे योगदान अभूतपुर्व आणि शब्दातीत आहे.
मा. खा. गोविंदराव यांच्यानंतर शेखर निकम यांना राजकारणात स्थिरता आणि आमदार करण्यात ना. शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा. अशा आपल्या मुलासमान असणाऱ्या शेखरने सत्ता आणि संपत्तीच्या आशेने अत्यंत कठीण काळात साथ सोडून जावी हे ना. पवार यांच्या मनाला फार लागून राहीले आहे. महाराष्ट्रात शेकडो तरुणांना त्यांनी उभे केले आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी विचारच दिल्लीश्वर आर्थिक खरेादी-विक्रीच्या माध्यमातून गाडत असतील, तर ते कदापी शक्य होणार नाही त्यासाठी लढले पाहिजे या ध्येयापोटी आज ना. पवार साहेब या रणांगणात उतले आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सोबत अशी गद्दारी केली, फसवणूक केली त्यांना योग्य समज देणे हा त्यांचा सध्या कार्यक्रम आहे. या करेक्ट कार्यक्रमासाठी त्यांचा चिपळूर दौरा फारच महत्त्वाचा होता.
बहाद्दूर शेख नाक्यातील सहकार भवनमध्ये सकाळी ७.४५ ला पवार साहेबांचा चिपळूणवासीयांना भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू झाला. पवार साहेबांना भेटण्यासाठी मान्यवर आणि कार्यकर्त्यांची जणू झुंबडच उडाली होती. यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यापासून अनेकजण आले होते. त्यांनंतर मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक केंद्रात छोटासा कार्यक्रम होता. येथे पवार साहेबांचा सत्कार करण्यात आला आणि कोकणच्या तमाम मुस्लिम समाजाने त्यांच्यासोबत जाण्याची ग्वाही दिली.
चिपळूण येथील पवार साहेबांची जाहीर सभा सकाळी ११ वाजता होती. रविवारी सकाळी सभा त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यातच आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार शेखर निकम यांच्यासाठी चिपळूण दौरा झाला होता. पुरग्रस्त चिपळूला कोट्यवधींच्या निधीचे आमिष दाखवत त्यांनी जोरदार आतषबाजी केली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता वाढली होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही सुरुवात मानली जात होती. या सभेला आलेला उत्स्फूर्त जनसमुदाय हे आश्चर्यच होते. येथील आमदार शेखर निकम यांचे गेल्या पाच वर्षांतील काम निश्चितच उत्तम आहे. लोक त्यांच्यासोबत आहेत आणि आज त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजितदादांची साथ करत थेट ना. पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. असे असताना ना. पवार यांच्या सभेला किती लोक येणार हा प्रश्न होता? मात्र साऱ्या गर्दीचे रेकॅार्ड तोडणारी ही सभा होती. किमान २० हजारांपेक्षा अधिक लोक पवार साहेबांना ऐकण्यासाठी आले होते. सभेचे आयोजन करताना जो मंडप उभारला होता त्या क्षमेतेच्या दुप्पट लोकांनी अभूतपुर्व गर्दी केली होती. सध्या राजकीय परिस्थितीवर पवार साहेब काय बोलतात हे ऐकण्यासाठी लोक फार उत्सुक होते आणि यांत तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
वयोवृध्द असतानाही जिगर आणि उत्साह तरुणाला लाजवणारा हेच तर खा. पवार यांचे वैशिष्ठ्य आहे. ते चिपळूणच्या भूमीवर उतरले तेच शेखर निकम यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करत. आपल्या भाषणात कै. गोविदंराव निकम यांच्यासोबतच्या जिव्हाळ्याच्या संबंधांबद्दल सांगितले आणि पुढे हेही सांगितले की पुढची पिढी वेगळी आहे; मात्र त्याबबत नाराजीचा सूर न लावता त्यांनी त्यांचा उमेदवार प्रशांत यादव यांचे नाव उद्याचा आमदार म्हणून अप्रत्यक्षपणे घोषित केले. आपल्या मिश्किल शैलीत ते म्हणाले, काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात. काहीजण गेले म्हणून प्रशांत सारखा सहकार क्षेत्रात कार्यरत असणारा उत्तम कार्यकर्ता मिळाला. वशिष्ठीच्या डेअरीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठे सहकाराचे जाळे कोकणात उभारले आहे हे काम सोपे नाही.
चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांत विस्तारलेला आहे. चिपळूण शहर, तालुका सोबत संगमेश्वर तालुक्यातील आरवली-देवरुख ते आंगवली असा महत्त्वाचा टापू यात येतो. या पट्ट्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मोठी ताकद आहे. शेखर निकम यांच्या विजयात त्यांचा मोठा सहभाग होता. त्याचबरोबर चिपळूण पट्ट्यात आमदार भास्कर जाधव यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळेच भास्कर जाधव या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. शिवसेनेच्या फुटीत शिंदेगटात येथील माजी आमदार चव्हाण गेल्याने त्याना आता संधीच राहिली नाही.
आमदार शेखर निकम पुन्हा निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. लाडकी बहीण ते अनेक योजनांतून ते आणि निधी गावोगाव पोहोचला आहे; मात्र पवार करिश्मा या मतदारसंघावर मोठा परिणाम करणार असे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत कोकणात यावेळी फारमोठे बदल घडण्याचे संकेत सुरू आहेत. अनेक प्रस्थापितांना सुरुंग लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पवार फॅक्टर त्यातील महत्त्वाचा रोल असणार आहे.


