एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या सुहाना सोलकरला मेहेंदी कला प्रकारात सुवर्णपदक

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या सुहाना सोलकर हिने मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सवात मेहेंदी या कला प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५७ व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात ऑगस्ट महिन्यात उत्साहात झाली होती. यात संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता.
दि. २८ ऑगस्टपासून या महोत्सवाच्या अंतिम फेरीला विद्यापीठात सुरुवात झाली असून हा युवा महोत्सव ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यात मेहेंदी या कला प्रकारासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या सुहाना सोलकर हीची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत सुहाना हिने आपल्या कलेचा आविष्कार दाखवत सुवर्णपदक पटकावले.
सुहाना हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे यांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



