स्वा. सावरकर नाट्यगृहात आज घुमणार ‘शतसंवादिनीं’चा स्वर
१०० हून अधिक संवादिनीवादक एकाच रंगमंचावर ; गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दीनिमित्त हार्मोनियम सिंफनी

रत्नागिरी : संवादिनीगंधर्व म्हणून ओळख असलेले स्वर्गीय पंडीत गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज (२१ सप्टेंबर) सायंकाळी ६.३० वाजता ‘शतायुषी गोविंदराव’ हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर वि. दा .सावरकर नाट्यगृहात होणार आहे. यामध्ये रत्नागिरी व मुंबई येथील १०० हून अधिक हार्मोनियमवादक एकच वेळी एकाच रंगमंचावरून ‘शतसंवादिनी’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे गोविंदरावांना आदरांजली वाहणार आहेत. हार्मोनियम वाद्यामध्ये पहिल्यांदाच हार्मोनियम सिम्फनी सादर होणार आहे.
सहयोग आणि चैतन्यस्वर रत्नागिरीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात मुंबईमधील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक, संगीतकार अनंत जोशी यांच्या संगीत संयोजनाखाली रत्नागिरीतील विजय रानडे, संतोष आठवले, महेश दामले, मंगेश मोरे, श्रीधर पाटणकर, चैतन्य पटवर्धन, हर्षल काटदरे, चंद्रकांत बांबर्डेकर हे संवादिनीवादक आणि त्यांचे शिष्य सहभागी होणार आहेत. आदित्य पानवलकर, प्रथमेश शहाणे, प्रणव दांडेकर हे तबला व पखवाजसाथ, तर शिवा पाटणकर आणि अद्वैत मोरे हे तालवाद्याची साथ करणार आहेत.
कार्यक्रमात काही शास्त्रीय रचनांसोबत अभंग, गजर, ठुमरी आदी प्रकार संवादिनीवर सादर केले जाणार आहेत. तसेच पं. गोविंदरावांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग आणि त्यांच्याबाबत मान्यवरांचे मनोगत असलेली ध्वनिचित्रफीतही पाहायला मिळणार आहे. निबंध कानिटकर आणि दीप्ती कानविंदे आपल्या निवेदनातून गोविंदराव पटवर्धनांचे चरित्र उलगडणार आहेत. कार्यक्रमासाठी ध्वनिसंयोजन एस कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांचे, तर रंगमंच व्यवस्था अमरेश सावंत यांची आहे.
कार्यक्रमासाठी जाई काजल, अनबॉक्स रत्नागिरी, सविता ट्रस्ट, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, कॅप्सन, आहार व मेजवानी रेस्टॉरन्ट आणि गणेश अॅग्रो टुरिझम आदींचे प्रायोजकत्व लाभले आहे.
या कार्यक्रमाची तिकिटे इट्स माय शो या सोशल साईटवर उपलब्ध असून थेट तिकीट विक्री २० सप्टेंबरपासून नाट्यगृहावर सुरू झाली आहे. संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



