मुख्य बातमी

जिल्ह्यात पर्सनेट मच्छिमारीचा श्री गणेशा

केवळ ५० टक्के नौका समुद्रात

रत्नागिरी : कोकणात किनारपट्टीवर गेल्या तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते; मात्र पर्सनेट, फिशिंग ट्रॉलर यांना मासेमारीसाठी १ सप्टेंबरची वाट पाहावी लागते. ती प्रतिक्षा आता संपली असून रविवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. मात्र खराब वातावरणामुळे केवळ ५० टक्केच नौका समुद्रात झेपावल्या आहेत.

मागील महिन्याभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये येणार्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागला. या स्थितीमध्ये रविवारपासून पर्ससीन नेटद्वारे सुरु होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामाला सामोरे जावे लागणार आहे. मच्छिमाराला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य हवामान अन् वातावरण, त्याच्या जोडीला समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा करंट यांचा अंदाज घेत मच्छिमार बांधव हातामध्ये जाळी घेत समुद्रामध्ये झेपावला आहे.

रत्नागिरीतील मिरकरवडा बंदर जेटीवर दरदिवशी मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तसेच पर्ससीन नेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिक होड्या, बिगरयांत्रिक होड्या अशा सर्वच नौका मासेमारी करतात. मच्छी व्यवसायातून वर्षाला १०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची याठिकाणी उलाढाल होते. या वर्षीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाले आहेत. होड्यांवरील खलाशीही बंदरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे.

मासेमारासाठी सद्य:स्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आहे. समुद्रातील पाण्यालाही चांगलाच करंट आहे. या सा]र्या प्रतिकूल स्थितीचा अंदाज घेऊन पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे.

शासकीय नियमानुसार १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. समुद्री वातावरण, वारे आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन सागराला श्रीफळ अर्पण करून अनेक मच्छिमारांनी मासेमारीला सुरुवात केली. १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा बंदी कालावधी मागील काही वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला आहे. हर्णे, जयगड, रत्नागिरी, साखरीनाटे यासारख्या किनारपट्टीवरील लहान-मोठ्या सुमारे ५० बंदरात मासेमारीची प्रत्यक्ष उलाढाल असते. जिल्ह्यात हजारोहून अधिक कुटुंब मासेमारीवर अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button