पारावरच्या गप्पा

पुतळे बोलू लागले

– बाबूराव रोखठोक

(स्थळ : थिबा पॅलेस गार्डनची मध्य रात्र, मिट्ट अंधार दाटलेला, तुफानी पाऊस कोसळत आहे. समोरचा अरबी समुद्र या पावसांच्या लहरीत गडप झालेला, पश्चिमेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यासोबत पावसाच्या तडाखेबंद धारांचा मारा आणि सोबत येणारा अरबी समुद्राच्या तुफानी लाटांची रोरवणारी गाज. या वातावरणात अखंडपणे पोलादी बाणा राखत तुफानाला सामना करत उभा असणारा छत्रपती शंभूराजांचा पुतळा आज किंचित थरथरला…. आणि विठूरायाच्या पुतळ्यांनी त्याला साद घातली) 

विठूराया : शंभू राजे आपण असे अचानक थरथरत आहात… आपल्यासारखा या महाराष्ट्र देशाचा पोलादी पुरुष जर थरथरू लागला, तर या तमाम मराठीजनांनी पहायचे कोठे? उठा!! उठा!! त्या समशेरीवरील पकड घट्ट करा पाहू!!

शंभूराजे : विठू राया…. काय सांगू कथा…. यावादळाची…थरथरणे हे आमच्या रक्तात नाही. या मऱ्हाठी साम्राज्याच्या, मायभूमीच्या अणू-रेणूत नाही. आपणच साक्षीदार आहात आमच्या पराक्रमाचे! बुऱ्हाणपूरच्या पोलादी गुहेत शिरून औरंगजेबाला पळता भुई करणारे आम्ही शिवछत्रपतींचे वारसदार… या अरबी समुद्राच्या तुफानाला समशेरीच्या टोकावरूनच परतवून लावू अशी आमची मर्दानगी!!

विठूराया : जाणून आहोत आपली कर्तबगारी आणि शूरवीरता… म्हणूनच साद घातली!! माझ्या रयतेच्या राजाची तलवार अशी का थरथरावी!!!

शंभूराजे : काय सांगू विठूराया…. आपुल्या चरणी काय लपवावे… आपल्या भक्तीत तुकोबांनी सांगितलेच आहे… “मरणाही आधी राहिलो! मग केले मनी होते तैसे!  आता तुम्ही पहा आमुचे नवल! नका वेचू बोल वायाविन!” तशी परिस्थिती आहे आजच्या या युगात…. फार अकल्पित आणि भीषण घडत आहे. बाजार…. सारा बाजार करून टाकला यांनी या देशाच्या इतिहासाचा…. आमच्या दैदिप्यमान इतिहासाला पार मातीत गाडण्याचा संकल्प तर यांनी केला नाही ना? अशी शंका येते. आजच्या राजशिष्टाचाराचे पर्वलीचे शब्द आहेत. भ्रष्टाचार… लूबाडणूक आणि स्वैराचार…

विठूराया : राजे.. राजे.. इतकी उद्विग्नता आणि निराशा योग्य नाही. आपण या तरुणाईच्या सळसळत्या रक्ताचे आणि धडाडीचे प्रेरणास्थान आहात.

शंभूराजे : हो आहोत की होतो? म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या छत्रपतींनी त्यांचे मेहूणे सखुजी गायकवाड यांना नैतिक भ्रष्टाचार केल्याप्रकरणी हात कलमची शिक्षा सुनवली, रयतेचे राज्य निर्माण करत हिंदवी साम्राज्य या भारतभूमीला दिले. त्यांचा फक्त नावाचा वापर यांना हवा आहे. त्यांचा अत्यंत तकलादू पद्धतीने उभारलेला राजकोट मालवणचा पुतळा ज्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान करतात तो पत्त्यासारखा कोसळतो आणि या राज्याचे मंत्री महोदय म्हणतात ४५ किमी सोसाट्याचा वारा होता. काय पाहतो आहोत आम्ही!!! विठूराया तू आहेस रे साक्षीदार… महाराजांच्या ८० मैल वेगाने धावणाऱ्या ”विश्वास” घोड्याच्या वेगाचा आज तो विश्वासच हे शासनकर्ते गमावून बसले.

विठूराया : पांडुरंग… पांडुरंग… हे अनाकलनीय अविश्वसनीय वाटते… या महाराष्ट्र जगतात राम सुतार, रवींद्र मेस्त्री, उत्तम पाचारणे यांसारखे जगविख्यात शिल्पकार- मूर्तिकार असताना हे शक्यच नाही.

शंभूराजे : हो… मला असेच वाटते. प्रतापगडावरील छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा तर तब्बल सात दशकांपूर्वी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी बसविला. आजही तो स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. मालवण राजकोटचा पुतळा उभारताना म्हणे कोणी जयदीप आपटे या आपल्याच माणसाला हा पुतळा बनविण्याचे कंत्राट दिले. पंचवीशीतल्या जयदीप आपटे याला एक – दोन फुटाचे पुतळे बनविण्याचा अनुभव. त्याने थ्रीडी प्रिटींग माध्यमातून काही मॅाडेल केली. कोट्यवधी रुपये खर्च केले म्हणतात. हे सारेच विचित्र आणि महाराजांच्या प्रतिमेचा घोर अपमान करणारे आहे. बहुदा सुरत लूटल्याचा बदला तर घेत नाहीत अशाही चर्चा करतात काही राजकीय नेते…

विठूराया : पांडुरंग… पांडुरंग…. मी या माळनाक्याच्या मध्यभागी गार्डनमध्ये उभा आहे… माझ्या पायाखालची वीट सध्या तरी भक्कम आहे. सुरूवातीला भक्तांचा महापूर आला माझ्या पुतळा उभारणीत. आता माझ्याकडे कोणी पाहतही नाही. माझे स्थान भक्तगणांनी त्या चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरात उभारले, वीटेवर मी उभा आहे; मात्र या माळनाक्यावर मला फार अस्वस्थता वाटू लागली आहे.

माझे एक भक्त कुसुमाग्रज यांची मला कविता आठवते…

मध्यरात्र उलटल्यावर, शहरातील पाच पुतळे,

एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले…

ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो, फक्त माळ्यांचा!

शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा!

आंबेडकर म्हणाले , मी फक्त बौध्दांचा!

टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा!

गांधीजीनी गळ्यात गहिवर अवरला,

आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान!

एकेक जात जमात तरी, तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र, फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!!

शंभूराजे : खरं आहे! पण या मान्यवरांचे पुतळे तरी मजबूत, भक्कम होते. आम्हाला तर शंका आहे आमचे पुतळे किती मजबूत आहेत माहीत नाही! काहीजण येथे येतात, चर्चा करतात आणि म्हणतात आम्ही फायबरचे आहोत, तर काही म्हणतात पातळ पत्र्याचे. जात- पात आणि सरकारी भिंती तर नाहीत आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न या राज्य करणाऱ्या महामानवांनी केला आहे… पांडुरंग…. पांडुरंग….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button