पारावरच्या गप्पा

कोकणचे बॅनर वॅार! दिल्लीशी जी हुजूर!

(स्थळ : कोकणातील सर्वाधिक पुरातन आणि नामांकित महाविद्यालयातील स्टाफ रूम, प्रा. सुहास बनसोडे आणि प्रा. केतन लिमये यांच्यातील चहासोबत रंगलेली मैफल)

प्रा. केतन लिमये : सर तुम्हाला आठवतं दोन दशकापूर्वीचा काळ. जून महिना म्हणजे प्रवेशासाठी महाविद्यालयात विद्यार्थी, पालक यांची कशी झुंबड उडायची. स्टाफ रूममध्ये बसण्यासाठी जागा मिळत नसे. प्रत्येक पालक आपल्या पाठीवर तासनतास वाट पाहत राहायचा. आपण ही त्यांना टंगवत रहायचे.. जितके टंगवत राहत होतो तितकी महाविद्यालयाची आवक वाढत होती. अगदी आर्ट्सचा प्रवेशही देणगीशिवाय सोडला नाही आपण… पण आज पहा… चिटपाखरू नाही.
प्रा. सुहास वानखेडे : लिमये सर आपण म्हणता हे अगदी तंतोतंत वास्तव आहे. पण याला जबाबदार कोण? आपणच प्राध्यापक मंडळी. या बाजाराची सुरुवातच आपण केली. काय केले आपण या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आपले योगदान कोणते? याचे परीक्षण आपणच करण्याची गरज आहे. खरं तर आपल्यालाच या मुलांकडून ज्ञान शिकण्याची वेळ आली आहे आणि कोरोना काळात तर आपली गरजच संपली.
प्रा. लिमये : मी हे मान्य करणार नाही. प्राध्यापक म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी घ्यायला नको. मुख्य मुद्दा आहे या शासनाचा. त्यांनी वारेमाप कॅालेज उघडण्यास परवानग्या दिल्या आणि आता जागोजाग इमारतींचे खंडहर होत आहेत. नवी पोरं म्हणतात आर्ट्स, कॅामर्सला जाऊन उपयोग काय त्या डिग्रीचा? आता काय बोलणार यांच्यासमोर? काल एक पोरगा म्हणत होता पदवीधरची निवडणूक झाल्यावरच म्हणे कॅालेज ॲडमिशन करेन… आता बोला…
प्रा. वानखेडे : ( जोरदार हसू लागतात)….
प्रा. लिमये : अहो हसताय काय? आपल्या व्हाईट कॅालर प्रोफेशनचेच यांनी पार हसू करून टाकले आहे.
प्रा. वानखेडे : त्यावर उपाय आहे, सरळ राजकारणात उतरायचं… आता पदवीधरची निवडणूक आहे. तुम्ही जिल्हा प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी आहात, वरती आणि त्याच्याही वरती तुमचेच सरकार आहे. होऊ द्या उमेदवारी जाहीर… हाऽऽऽहाऽऽऽऽ
प्रा. लिमये : वानखेडे सर तुम्ही तर माझी चेष्टाच सुरू केलीत… अहो राजकारण हा काही आपला प्रांत नाही… त्या गुंड-फुंड गवार लोकांशी ओळख दाखविणेही अगदी अंगावर शहारा आणतं… नको… नको… ती संगतही नको… आपली प्राध्यापकी बरी… आखणी दोन वर्षाने रिटायर्ड झालो की, सरळ अमेरिकेतील मुलाकडे जाऊन रहाणार… हे राजकारणाचे झंगटच नको आपल्या मागे…
प्रा. वानखेडे : पहा… पहा… राजकारणाबाबत तुमचा असा तुच्छतादर्शक दृष्टीकोन अगदी अस्पृष्यतेचा, हेच चुकीचे आहे. पोलिटीकल सायन्स विषय शिकविणाऱ्यांनी असे बोलून कसे चालेल? गेली ३० वर्षे तुम्ही पोलिटीकल सायन्स शिकवत आहात. शेकडो विद्यार्थी आज राजकारणात आले असतील. अगदी सरपंच, नगरसेवक ते जि.प. पदाधिकारी असतील आणि महत्त्वाचा भाग तुमचा पगार, पेन्शन याचे धोरणच राजकारणी ठरवत आहेत. त्या निर्णय प्रक्रियेत जावे असे का वाटत नाही तुम्हाला? कशी बदलणार राजकारणाची दिशा?
प्रा. लिमये : वानखेडे सर… आम्ही झळ सोसली आहे या राजकारण्यांच्या संगतीची. काय सांगू? परवाच्या लोकसभा निवडणुकीचं पाहिलत ना? केवढी अटीतटीची निवडणूक. सिंधुदुर्गचे नेते खा. नारायण राणे यांच्या नावातच दबदबा आहे. लोकांची खूप कामं करतात असे अनेकजण म्हणतात; परंतु कोकणच्या मुलभूत बदलासाठी त्यांनी कोणते काम केले असा मीच मला प्रश्न करतो त्यावेळी उत्तर सहज काही सापडत नाही; पण त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक लाखाचे मताधिक्य मिळवत निवडणूक जिंकली याचे फारच आश्चर्य वाटले. म्हणे पैशाचा महापूर होता… आजच्या निवडणुकीत ते अपरिहार्यच तर आहे. यात कुठे सर्वसामान्य माणूस भाग घेणार आणि टिकणार तरी काय? अगदी देशात ही बघा… घराणं… पैसा… हेच राजकारणात येऊ शकतात… टिकतात आणि निर्णय प्रक्रियेत तेच असतात आम्ही फक्त पुस्तकातील पोलिटीकल सायन्स शिकवायचे… ते वास्तवापेक्षा खूपच वेगळे असते. जॅार्ज ॲारवेलने लिहून ठेवले आहे. “ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स…”
प्रा. वानखेडे : याच लोकसभेच्या ‘बॅनर वॅार’ची सध्या तुफान चर्चा आहे. तुमच्या पॅालिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही केस स्टडी घेऊ शकता…
प्रा. लिमये : काय म्हणता? काय आहे ‘बॅनर वॅार’? माझ्या कानावर नाही..
प्रा. वानखेडे : तेच तर म्हणतो आहे. ग्राऊंड रिपोर्ट? पोलिटीक्स पहा… त्याच काय आहे, लोकसभेत भाजपचे खा. नारायण राणे जरी ४०-५० हजारच्या मताधिक्याने निवडून आले, तरी त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नऊ हजार मते राऊतांपेक्षा कमी पडली. सामंत बंधूंनी त्यांना साथ दिली नाही, असा त्यांचा समज आहे. यातून आता ना. सामंत इथून कसे निवडून येतात याचे थेट आव्हानच त्यांनी दिले आहे.
प्रा, लिमये : म्हणजे किरण सामंतांचे अचानक बोर्ड बदलणे.. नॅाट रिचेबल होणे… वगैरे…
प्रा. वानखेडे : अगदी बरोबर… याच्या तक्रारी थेट शहांपर्यंत गेल्या म्हणे.. परंतु सध्या एनडीएच्या सरकारात शिंदेचे ७ खासदार फार महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांनी थेट मंत्रीपदच दूर ठेवल्याची चर्चा येथील गोटात आहे.
प्रा. लिमये : ते ‘बॅनर वॅार’चे काही सांगत होतात…
प्रा. वानखेडे : हो… हो… खा. नारायण राणे यांचा अत्यंत रुबाबदार फोटो असलेला सोबत पट्टेरी वाघ आणि
“बाप बाप होता है!,
झुंड में तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है!”
असा बॅनर उदय सामंत यांना थेट खिजविण्यासाठी रत्नागिरीत लावण्यात आला. आता उदय सामंत यांची फौजही काही कमी नाही. त्यांनी खा. नारायण राणे यांना थेट अंगावरच घेतले. कणकवलीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच राणेंच्या बालेकिल्यात मोठ्ठा बॅनर झळकला. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत किरण सामंत यांचा फोटो पट्टेरी वाघाचा जबरदस्त आकर्षक क्लोजअप… आणि टायटल…
“वक्त आने दो जबाब भी देंगे, और हिसाब भी देंगे”
प्रा. लिमये : बापरे ऽऽऽऽ हे तर भयानकच आहे. दंगलच भडकण्याची चिन्हे आहेत ही… केंव्हाही स्फोट होऊ शकेल…
प्रा. वानखेडे : सामंतांचा हा बॅनर म्हणजे… जखमेवर मीठ चोळणाराच होता आणि तोही राणेंच्या बालेकिल्यात… हे धाडसच कसे होऊ शकते. आता काही तरी जबरदस्त राडाच होणार म्हणून सर्व यंत्रणा सुसज्ज तयारी होत्या. परंतु प्रतिक्रिया पुन्हा बॅनरनेच आली आणि विजयाचा गुलाल उधळणारा राणे गटांचा बॅनर झळकला.
“हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने भी नही देंगे।
तुम्हारे ही इलाकें मे आके तुम्हे ही जबाब देंगे…”
प्रा. लिमये : आयला… ही तर पाकिस्तानला घुसकर मारेंगे स्टाईलच… सॅारी माझा ही शब्दांवरचा ताबा गेला… सर, काय हे राजकारण? आणि पुढची पिढी काय घेऊन जाणार? कोठे बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांची प्रसन्न विद्वत्ता प्रचूर संवाद शैली आणि आता हे काय ऐकावे लागते… म्हणून म्हणतो, बाबा ते राजकारण नको… पण…. वानखेडेवर… हे अचानक हिंदी भाषेत का बॅनर लागले…
प्रा. वानखेडे : मोठ्याने हसत… बॅनर दिल्लीच्या अमीतभाईंपर्यंत पोहोचला पाहिजे… त्यांची नजर गेली तरच पदरात काही पडणार ना. दिल्लीशी जी हुजूर… सारीच गंम्मत आणि मज्जा…

– बाबूराव रोखठोके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button