मुख्य बातमी

ऑलिम्पिकमध्ये सहभागी भारतीय चमूला ‘कोकण कोस्टल मॅरेथॉन’च्या अनोख्या शुभेच्छा 

रत्नागिरी : कोकण कोस्टल मॅरेथॉनतर्फे शहराजवळील झरीविनायक मंदिर (भाट्ये) येथे आयोजित केलेल्या सामूहिक प्रॅक्टिस रनच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.

रविवारी (२८ जुलै) सकाळी ६:३० वाजता श्री झरीविनायक गणेशाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन ही ऑलिम्पिक शुभेच्छा रन सुरू झाली. वय वर्षे ८ ते ७३ या वयोगटांतील जवळपास ५३ जण यामध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून जवळपास २५० किलोमीटरहून अधिक अंतर धावून पार केले आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या.

फिटनेस टुरिझम हा विषय हाती घेऊन मागील ४ वर्षांत कोकणात विविध उपक्रम सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत. “कोकण कोस्टल मॅरेथॉन” हा त्यातील एक अभिनव उपक्रम. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या बरोबरीने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन देखील या उपक्रमांचा एक भाग आहे.

यामध्ये जास्तीत जास्त कोकणातले लोक सहभागी व्हावेत यासाठी टीम “केसीएम”च्या माध्यमातून प्रॅक्टिस रन तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून ग्रुप राईड देखील आयोजित केल्या जात आहेत.

सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनने आयोजित केलेल्या या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. ऑलिम्पिक शुभेच्छा रनमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटुंना लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे चहा आणि अल्पोपहाराची सुविधा देण्यात आली.

ही ऑलिम्पिक शुभेच्छा रन यशस्वी करण्यासाठी ऍडव्होकेट सचिन नाचणकर, डॉक्टर राज कवडे, एसआर सौ. आरती दामले, एसआर डॉक्टर नितीन सनगर, एसआर महेश (बॉबी) सावंत, एसआर विनायक पावसकर, लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी, ला. पराग पानवलकर, एसआर ला. ओंकार फडके, ला. प्रसाद हातखंबकर, जोशी फूड्सच्या सौ. कांचन चांदोरकर, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, लोहपुरुष समीर धातकर, गजानन भातडे, अविनाश फडके, सौ. राधा बसनकर, सौ. मानसी सचिन मराठे, विक्रांत प्रसादे, प्रफुल्ल शिर्के, नारायण पाटोळे तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संचालिका सौ. तेजा देवस्थळी यांनी विशेष मेहनत घेतली.

पावसाळ्यातील, हिवाळ्यातील, उन्हाळ्यातील कोकण एक चांगले ब्रॅण्डिंग करून जागतिक पटलावर पोचावे आणि कोट्यावधी लोक टुरिस्ट म्हणून कोकणात यावेत हा सुहेतू या सर्व उपक्रमांमागे आहे. यावर्षीपासून या सर्व उपक्रमांना कोकण कनेक्टिव्हिटी मुव्हमेंट (केसीएम) असे संबोधले जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत सायक्लोथॉन, मॅरेथॉन तसेच लांब पल्याची अल्ट्रा मॅरेथॉन हे प्रमुख उपक्रम आयोजित केले जाणार आहेत असे यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button