मुख्य बातमी

राजापूरमध्ये स्वीपअंतर्गत मतदान जनजागृती बोट रॅली

राजापूर : विधानसभा मतदारसंघांमध्ये शुक्रवारी (३ मे) साखरी नाटे येथील डोंगरी बंदरावर स्वीपअंतर्गत मतदान जनजागृती बोट रॅलीचे आयोजन केले होते.
या बोट रॅलीसाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या मतदान टक्केवारीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने १०० टक्के सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
साखरी नाटे या महसुली गावाची एकूण लोकसंख्या ४ हजार ५०० च्या जवळपास आहे. त्यापैकी ३ हजार ८०० मतदार आहेत. या गावामध्ये एकूण २०० बोटी असून, या माध्यमातून गावातील १०० टक्के लोक मच्छिमारी हा व्यवसाय करतात. मच्छिमारीच्या अनुषंगाने बहुतांश लोक समुद्रात जात असल्याने या लोकांचा मतांच्या टक्केवारीवर परिणाम होत होता. मतांच्या टक्केवारीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रांताधिकारी श्रीमती माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले (राजापूर) यांनी मतदान जनजागृती बोट रॅलीचे नियोजन केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, साखरी नाटे मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेड साखरी नाटे या संस्थेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, देवाचे गोठणे, आडिवरे व मिठगवाणे बीटमधील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी नाटे व तलाठी उपस्थित होते. या बोट रॅलीमध्ये प्रत्यक्षात २० बोटींनी सहभाग घेतला. यावेळी मेघनाथ गोसावी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या टीमने मतदान जनजागृतीसंदर्भात पथनाट्य सादर करून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button