अशा लाल मातीतराजकीयलोकसभा २०२४

किरण सामंत ठरणार ‘गेम चेंजर’

– अभिजित हेगशेट्ये

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराने संपूर्ण दक्षिण ढवळून निघत आहे. भाजपचे विद्यमान केंद्रीय लघु उद्योग मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरेंपासून अमित शहा यांना प्रचाराच्या रणांगणात उतरविले आहे. त्यांचे चिरंजीव नीतेश राणे तीन लाखांच्या मतांनी विजयी होणार अशी गॅरेंटी देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्या गल्ली-मोहल्ला अलोट प्रतिसादाच्या प्रचारसभांनी पुरता मतदारसंघच काबीज केल्याचे चित्र उभे राहत आहे. यांवर अखेरचा प्रहार करण्यासाठी राणे यांनी आता थेट भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अति भव्य सभा रत्नागिरीच्या अतिभव्य मंडपात आयोजित केली; मात्र या वातावरणात या मतदारसंघातील तिसरी शक्ती म्हणून परिचित असणारे शिंदे शिवसेनेकडून इच्छूक असणारे किरण सामंत यांनी अचानक आपले बंधू महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांचे फोटो कार्यालयाबाहेरून काढत, थेट वेगळी वाट निवडल्याने आधीच संकटात असणारे कमळ रत्नागिरी लोकसभा मतदारसघांत धोक्याच्या सीमेवर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत हे शिवसेनेच्या धनुष्य या चिन्हावर २०१४ आणि २०१९ साली निवडून आले. यावेळी भाजप-शिवसेना युती होती. त्यांच्यासमोर आवाहन होते ते नीलेश राणे यांचेच. तशी राणे आणि राऊत यांचा या लोकसभा मतदारसंघातील सामना तिसऱ्या वेळी आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या विनायक राऊत यांना ४ लाख ९३ हजार ८८ मते मिळाली होती, तर नीलेश राणे ( काँग्रेस) यांना ३ लाख ४३ हजार ३७ मते पडली होती. म्हणजेच राऊत जवळपास दीड लाखांच्या फरकाने निवडून आले. त्यांनतर राणे यांनी कॉंग्रेस सोडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. यावेळी नीलेश राणे यांना फक्त २ लाख ७९ हजार ७०० मतांवर समाधान मानावे लागले आणि राऊत तब्बल ४ लाख ५८ हजार २२ मते मिळवत पावणेदोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. यावेळी कॉंग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ६३ हजार २२९ मते मिळाली. आज विनायक राऊत त्यांच्या पूर्वीच्याच शिवसेना पक्षात आहेत; मात्र नीलेश राणे यांच्याऐवजी त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणेच या निवडणुकीच्या रिंगणात असून, यावेळी त्यांचा थेट तिसरा पक्ष भाजप आहे. राणे यांची या मतदारसंघातील व्यक्तिगत ताकद ही जवळपास ३ लाख मतांची अधिक त्यांना भाजप आणि नव्याने तयार झालेले शिंदे गट आणि अजित दादा गट यांचे सहकार्य त्यांना किती मिळणार आणि या वातातरणात कोकणातील जनता त्यांना किती स्विकारणार यावर त्यांचे विजयाचे महत्त्व अवलंबून आहे.
आज या मतदारसंघाची विधानसभा पातळीवर मतदारांचा कल घ्यायचा झाल्यास चिपळूण येथे अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम, रत्नागिरी शिंदे सेना गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत, कणकवली विधानसभा नीतेश राणे (भाजप), सावंतवाडी विधानसभा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असे चार मतदारसंघातील आमदार त्यांच्यासोबत आहेत; मात्र नीतेश राणे यांचा कणकवली मतदारसंघ सोडता शिवसेना आणि राष्ट्रवादीतून फुटीर होत भाजपच्या नव्या राजकीय समीकरणात बाहेर पडलेल्या या आमदारांना त्यांच्या मतदारांचा पाठींबा किती यावरच भवितव्य ठरणार आहे. विनायक राऊत तिसऱ्या वेळी निवडणूक लढताना त्यांच्यासोबत राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळचे आमदार वैभव नाईक हे निष्ठावान शिवसेनेचे आमदार या फुटीच्या वादळात आपली मुळे घट्ट रोवून उभे आहेत. तळागाळातील बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जोडल्याचे भावनात्मक चित्र त्यांना मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादातून दिसत आहे.
उमेदवारी अर्ज भरताना हजारोंचा जनसमुदाय नारायण राणे यांनी रत्नागिरीच्या रस्त्यावर उतरविला होता. स्टार प्रचारक म्हणून माजी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्वतः नारायण राणे यांनी पूर्ण मतदासंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही आपल्या हाती अजून पाहिजे ते लागत नाही या जाणीवेतून त्यांनी
राजकीय धुरंधर आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाच थेट रत्नागिरीत बोलविले. हजारोंचा जनसमुदाय सभेला हजारो गाड्यांतून सिंधुदुर्गपासून रायगड, मुंबईच्या प्रदेशातून आला. या सभेने फार मोठ्या बदलाच्या आणि चमत्काराच्या आशा होत्या; मात्र रत्नागिरीत प्रथमच आलेले अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची नकली सेना हीच टेप पुन्हा लावत ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना हे सारे ‘औरंगजेबाचे फॅन क्लब’ म्हणून टीका करत राणे यांच्या मुस्लिम फॅन मतदारांना दूर सारले. नारायण राणे यांची कोकणच्या राजकारणातील गेल्या ३५ वर्षांची कारकिर्द आहे. यात आमदार ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता अशी विविध उच्च पदे विविध राजकीय पक्षातून सन्मानित करण्यात त्यांचे अग्रणी नाव आहे. त्यांच्या पक्षीय आणि सामाजिक राजकारणात कधी जात, धर्म हा भेदाभेद आला नाही. मुस्लिम कुटुंबांशी आणि या समाजासोबत त्यांचे अत्यंत आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. या मतदारसंघातील जवळपास दीड लाख मुस्लिम मतदारांमधील काही मतदार हा त्यांच्या हक्काचा आहे; मात्र त्यांना ‘औरंगजेबच्या फॅन क्लब’मध्ये समावेश करत शहांच्या सभेने त्यांचे नुकसान तर होणार नाही ना, अशी चर्चा आहे.
या मतदारसंघात पारंपरिक समाजवादीनंतर कॉंग्रेस आणि नंतर मागील दोन वर्षांपासून शिवसेनेच्या असलेल्या या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांनी सुरू केली होती. तसे त्यांनी जाहीर केले होते आणि वरिष्ठ पातळीवर त्यांना तसे अश्वासनही मिळाले होते. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केल्यावरही किरण सामंत यांचे महायुतीतील उमेदवारी तिकीट कायम मानले जात होते; परंतु भाजपच्या अधिक जागांच्या ताणलेल्या भूमिकेत शिंदे शिवसेनेने १३ खासदारांच्या बदल्यात १५ जागा मिळविल्या. त्यात ठाणे-कल्याण ही जागा मिळविली; मात्र हे करताना रत्नागिरीचा बळी दिला आणि तो अखेरच्या क्षणापर्यंत विनाकारण ताणत ठरवून दिल. ही भावना किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांच्या मनावर खूप खोलवरचा ओरखडा ओढून गेली आहे. शहा यांनी येथील भेटीत किरण सामंत यांना मदत करण्याचे आवाहन पुन:पुन्हा केले असले, तरी याचे प्लॅनिंग तेथेच झाले याची अचूक जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी थेट धनुष्यबाणच नाकारले. आपल्या कार्यालयाचा नक्षाच बदलून टाकला. याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
आज विनायक राऊत यांच्यासाठी एका बाजूला राजकीय प्रक्षेपाच्या बाहेर असणारा बुद्धीजीवी मतदार ‘निर्भय बनो’च्या हजारोंच्या सभा घेत थेट भाजपविरोधात इंडिया आघाडीला पर्यायाने विनायक राऊत यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. या सभांना लोक स्वतःचे पैसे देऊन हजारोंच्या संख्येने येत आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी, कणकवली येथे अभूतपूर्व गर्दीत झालेल्या सभा आणि विनायक राऊत यांच्या गावोगाव होणाऱ्या सभा शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावोगाव होणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादातील सभा हवेचा रोख वेगळाच सूचित करत आहेत. देशातील वातावरणाला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मुद्देसूद आणि आक्रमक शैलीने जी प्रखरता आणि प्रगल्भता आली आहे, त्यासमोर पंतप्रधानांची मांडणी जातीय आणि धर्माच्या समीकरणाच्या पुढे सरकत नाही. अशा अटीतटीच्या वातावरणात रत्नागिरीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व किरण सामंत यांचे कमळ नाकारण्याचे धोरण हे या निवडनूकीचा ‘गेमचेंजर’ ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button