आर्टिकलराजकीयलोकसभा २०२४

अमित शहांच्या दौऱ्याचे फलित काय?

– कोमल कुळकर्णी-कळंबटे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार), रासप, रिपाई, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहांनी ३ मे रोजी रत्नागिरी दौरा केला. अमित शहांनी प्रथमच रत्नागिरी आणि पर्यायाने कोकणाचा यानिमित्ताने दौरा केला. तसे बघायला गेले तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजपच्या नेत्यांचे मुंबईसह महाराष्ट्राशी लागेबांधे होते. बाळासाहेबांच्या भेटीसाठी अनेक मातब्बर नेतेमंडळी मातोश्रीवर येत. त्याला युतीतील तर नाहीच, पण विरोधी पक्षातीलही कोणताच नेता अपवाद ठरला नाही. बाळासाहेबांचे व्यासपीठावरील विचार कितीही हिंदुत्त्ववादी, जहाल, स्पष्ट आणि परखड असले, तरी राजकारणापलीकडे त्यांचे जपलेले ऋणानुबंधही तितकेच महत्त्वाचे आणि जगजाहीर होते. त्यातही शरद पवार यांच्याशी बाळासाहेबांचे असलेले घनिष्ठ संबंधही लक्षवेधी होते.
विचार पटतात, मते जुळतात, एकमेकांच्या मुद्द्यांचे विश्लेषण करता येते या आणि अशा काही गोष्टींवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांनी एकत्र येत १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली युती केली. ही युती २०१४ साली तुटली आणि हे पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले, मात्र त्यानंतर पुन्हा विचारधारेला महत्त्व देऊन परत एकत्र येऊन सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली; पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये पुन्हा वितुष्ट आले आणि शिवसेनेने पुन्हा युती तोडली ती कायमचीच. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. २०१९ साली शिवसेनेने आपला संसार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीसोबत मांडला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली. कोणत्याच पदाचा, आमदारकीचा, खासदारकीचा थेट अनुभव नसताना मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आहे ती जबाबदारी शिरी पेलून ती अडीच वर्षे इमाने इतबारे निभावली देखील. नेमके त्याचदरम्याने संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले होते; मात्र त्याही परिस्थितीत संपूर्ण यंत्रणा योग्य पद्धतीने राबवत जनतेचा विश्वास कमावला, हीच त्यांची मिळकत होती.
या मिळकतीच्या जोरावर पुढील दोन वर्षेही अशीच निघून जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंना येत असतानाच कुठेतरी माशी शिंकली (ती माशी का शिंकली हे आजतागायत न उलगडलेले कोडेच आहे म्हणा, असो) तर एक एक करत काही आमदार ‘नॉट रिचेबल’ होऊ लागले आणि मग त्यांचे फोन लागले ते थेट गुवाहाटीला… तब्बल ४० आमदारांना फोडत भाजपने डाव साधला आणि शिवसेना शिंदे गट असे नामकरण करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अर्धवट राहिलेला संसार पूर्ण केला. हे करत असताना मात्र शिवसेनेचे नाव, चिन्ह एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांनाही उद्धव ठाकरे यांच्यापासून हिरावून घेत त्यावर शिंदे शिवसेनाच खरी असा दावाही केला.
ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडींचा मात्र मतदारांवर विपरीत परिणाम होत होता. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात. ह्या मतदारसंघात पूर्वीपासूनच शिवसेनेचे निर्विविद वर्चस्व आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे ह्या मतदारसंघातील मतदार मात्र हा सगळा स्वार्थाचा, हव्यासाचा, पदाच्या लालसेचा खेळ विषण्ण होऊन पाहत होते. आता दोन वर्षांनतर गृहीत धरलेल्या या सर्व मतदारांना आपले अस्तित्व दाखवून द्यायची वेळ आली आहे आणि मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून देतील यात काही शंका नाही. कधीकाळी सख्खे भाऊ असलेले हे दोघे हे दोन्ही पक्ष आता पक्के वैरी झाले. इतके की आता तर कोणत्याही राजकीय व्यासपीठावरून एकमेकांची उणीदुणी काढून, जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडता येतील तेवढ्या त्या झाडण्यात दोघेही धन्यता मानायला लागले आहेत. आता तर गेल्या दोन वर्षांत प्रचाराची पातळीही इतकी खाली गेली आहे की ‘भीक नको पण….’ अशी वेळ मतदारराजावर आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील गेल्या काही महिन्यांतील उलाढालींचा विचार करता शिवसेनेशी (उद्धव ठाकरे) आजही प्रामाणिक असलेल्या आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, या मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत या शिलेदारांना आपला बालेकिल्ला अभेद्य असल्याची प्रचिती आली आहे आणि याची थोडीबहुत कल्पना महायुतीलाही आली आहे. याची दोन मुख्य कारणे म्हणजे फितूर झालेले विद्यमान पालकमंत्री आणि दुसरे म्हणजे किरण सामंत यांना आशेवर ठेवून आयत्यावेळी नाकारली गेलेली उमेदवारी. कितीही नाही म्हटले तरी किरण सामंत समर्थकांमध्ये ही सल आजही बघायला मिळते आणि म्हणूनच महायुतीकडून नारायण राणे यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंडळींच्या प्रचारसभांचा धडाका लावला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे तर गेले काही दिवस या मतदारसंघात ठाणच मांडून बसले आहेत. या सर्वांवर कडी म्हणजे ३ मे रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरीत झालेली सभा.
प्रथमच रत्नागिरीत आलेल्या केंद्रीय गृहमत्र्यांकडून काहीतरी खुमासदार ऐकायला मिळेल, चांगल्या घोषणा होतील आणि माध्यमांना चांगले खाद्य मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र ‘उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली आहे’ हे सांगण्यासाठी अमित शहांना रत्नागिरीत यावे लागत असेल, तर विनायक राऊत आणि पर्यायाने उद्धव ठाकरे आपली अर्धी लढाई तिथेच जिंकलेत असा सूर एकूणच सभेनंतर ऐकायला मिळाला. अमित शहा यांनी जवळपास २५ मिनिटे भाषण केले. या संपूर्ण भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांना तब्बल १२ मिनिटे टार्गेट केले. त्यातही उद्धव ठाकरे यांना जास्तच. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‘औरंगजेब फॅन क्लब’ असे संबोधून मुस्लिम मतदारांचाही रोष त्यांनी ओढवून घेतला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कोकणात मतांच्या धृवीकरणाची शहांनी घातलेली साद किती पथ्थ्यावर पडेल हे काळच सांगेल. आधीच किरण सामंत यांचे घोंगडे शेवटपर्यंत भिजते ठेवून आयत्यावेळी नारायण राणे यांना पुढे केल्यामुळे नाराज असलेल्या मतदारांची संख्या अधिक असतानाच मुस्लिम मतदारांवरही परिणाम करणाऱ्या ‘स्टेटमेंट’मुळे अमित शहा यांनी केलेल्या रत्नागिरी दौऱ्याचे नेमके फलित काय, असा प्रश्न उरतो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button