मुख्य बातमी

मतदानासाठी ७ मे रोजी भर पगारी रजा

जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश

रत्नागिरी : मंगळवार (७ मे) रोजी प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३५ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, ‘रत्नागिरी जिल्हा हा रायगड व रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे व दोन्ही मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३५ब नुसार भरपगारी रजा देय आहे.’
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी, कर्मचारी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना ७ मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती, अटीस अधिन राहून देय आहे. हा आदेश शासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना, दुकाने, कंपनी, अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. या आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे १३५ ब (२) नुसार कारवाईस पात्र राहतील. हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतू रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button