मुख्य बातमी

सामाजिक कार्यकर्त्या आसावरी शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, रत्नागिरी महिला सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक संचालक सौ. आसावरी सुहास शेट्ये (वय ६४ वर्षे) यांचे आज (२६ एप्रिल) सकाळी पुणे येथे निधन झाले.

आसावरी शेट्ये या रत्नागिरीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. मुंबई दूरदर्शनवर कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात आल्या. कालांतराने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. आपला शिक्षकी पेशा संभाळतानाच विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. बालरंगभूमीसाठी त्यांनी काम केले. रत्नागिरीत मुलांसाठी नाट्य शिबिरांचे आयोजन करणे, बालनाटकांचे दिग्दर्शन, संयोजन करून त्यांनी रत्नागिरीत बालरंगभूमीची चळवळ पुढे नेण्यात मोलाची कामगिरी बजावली. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील स्थानिक कार्यकारिणीच्या त्या सदस्य होत्या. महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठी त्यांनी काम केले.

सामाजिक कार्यकर्त्या आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आसावरी शेट्ये यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button