राहुल कळंबटे यांच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या एका बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील सहकार नगर येथील राधाकृष्ण रेसिडेन्सीतील रहिवासी स्वरूप मिरजुळकर यांची मुलगी स्वर्णी हिच्या पहिल्या वाढदिनी राहुल कळंबटे यांनी अथक १७ तासांत तिचे थ्रीडी रांगोळीतून हुबेहूब चित्र साकार केले. या रांगोळीचे फोटो राज्यभरातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही व्हायरल झाले. त्यामुळे या थ्रीडी रांगोळीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे ‘नववी नॅशनल ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन २०२४’ स्पर्धा घेण्यात आली. यात देशातील ३५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले होते. राहुल कळंबटे यांनी स्वर्णी हिच्या थ्रीडी रांगोळीचा फोटो स्पर्धेसाठी पाठविला. या थ्रीडी रांगोळीने या स्पर्धेतही बाजी मारत कळंबटे यांना देशात चौथा क्रमांक मिळवून दिला.



